Friday, October 21, 2022

हाती ज्यांच्या शून्य होते १०



 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक   :-१०

४} पुस्तकाचे नाव      :-  हाती ज्यांच्या शून्य होते

५)एकूण पृष्ठ संख्या :-  २३२

मूल्य        २००    :- ₹  फक्त


पुस्तक परीक्षण 

हाती ज्यांच्या शून्य होते


     प्रत्येक मानवाला एक सुंदर आयुष्य मिळालेलं असतं आणि ते आयुष्य आपण आपल्या परीने जगत असतो कधी कधी आपण खूप आनंदात असतो आणि कधी कधी आपण खूप नैराश्यात जातो आणि हे जीवन नकोसं होतं. नैराश्यात गेलेल्या प्रत्येकासाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे कारण या पुस्तकाचे नावच अगदी समर्पक आहे हाती ज्यांच्या शून्य होते. अरुण शेवते यांनी या पुस्तकाचं संपादन केलं आहे. एकूण २१ पाठांमध्ये हे पुस्तक विभागलेले आहे. त्या पाठांनाही समर्पक शीर्षके देण्यात आलेली आहेत.

अनेक मोठ मोठ्या लेखकांनी या पुस्तकात आपल्या आवडीच्या कर्तृत्ववान अशा व्यक्तींचा परिचय करून दिलेला आहे.

    पुस्तकात लिहिलेल्या प्रत्येक भागामध्ये एका दैदिप्यमान मानवाचे दर्शन आपल्याला होतं. हाती ज्यांच्या शून्य होते या पुस्तकाचे लेखन करण्यासाठी वि.ग .कानेटकर ,के .जे .पुरोहित, लता मंगेशकर, ग .दि. माडगूळकर, गुलजार, सुधीर फडके ,निळू फुले, शामला शिरोळकर, दारासिंह, मनमोहन सरल, एन. डी. पाटील, कुमार केतकर, चार्ली चापलीन, सुशील कुमार शिंदे, दिनकर पंड्या, स्टीव्ह जॉब्स, मुकेश माचकर या लेखकांनी या पुस्तकात जीवनात घडलेल्या प्रसंगांचे लेख लिहिलेले आहेत . या पुस्तकातील सर्वच लेख वाचनीय आणि प्रेरणादायी आहेत प्रत्येक लेखासाठी समर्पक शीर्षक दिलेल दिसून येतं.

       पोस्टमास्तर ते  राष्ट्राध्यक्ष, नावाड्याचा मुलगा राष्ट्रपती होतो, खाटीक खाण्यात ते नाट्यगृह, मुक्काम कोल्हापूर ,मंतरलेले दिवस, मोटार, गॅरेज आणि गाणे, चहाभाजीचा व्यापार ,अकरा वर्ष माळी होतो ,विष्णुपंत :छत्रे ग्रँड इंडियन सर्कस, आखाडा आणि कुस्ती ,हुसेन चा शंभर कोटीचा प्रवास ,नांगर, कंदील आणि रयत, ग्रेटा कार्बो नावाचे वादळ, मी, कोर्टाच्या आवारात, नांगर कारखान्याचा जन्म ,साखर कारखान्याची उभारणी, रिलायन्स ची निर्मिती, चुका कराल तरच घडाल, सकाळी केव्हातरी उजाडेल, शून्यातून प्रगती अशी प्रेरणादायी नावे प्रत्येक लेखाला दिलेली आहेत. काही लेखकांनी दुसऱ्याच्या जीवनातील प्रसंग लिहिलेले आहेत .तर काही लेखकांनी स्वतःच्या जीवनातील आत्मकथनपर प्रसंग या पुस्तकात वर्णन केलेले आहेत. खूप सुंदर आणि प्रेरणादायी असे पुस्तक आहे. या पुस्तकाची अर्पणपत्रिकाच अरुण शेवते यांनी आपल्या आईला समर्पित केली आहे .ते म्हणतात "माझी आई अनुसयाबाई दिगंबर शेवते लग्नानंतर दहा वर्षांनी सातवीची परीक्षा दिली शून्यातून स्वतःचे घरटे उभारलं." आपल्या आईच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग त्यांनी दिला आणि इतरांना त्यातून प्रेरणा घेण्याची एक नवीन ऊर्जा त्यांनी दिली.

       आपल्या मनोगतात ते म्हणतात ,"कर्तृत्ववान माणसाचे वैभव दिसते. त्या ऐश्वर्याच्या मागे दडलेला अंधार कुणाला दिसत नाही. अंधाराला छेद देऊनच माणसे मोठी होतात." जीवनात मोठ्या मोठ्या झालेल्या कर्तृत्ववान माणसांच्या आयुष्यातील प्रसंग या पुस्तकात दिलेले आहेत हे पुस्तक वाचून नैराश्यात गेलेल्या प्रत्येक माणसाला आयुष्यात येऊन काहीतरी करण्याची उर्मी उत्पन्न होईल.

     पहिल्या प्रसंगात अब्राहम लिंकन यांची माहिती दिली आहे. पोस्टमास्तर ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्यापर्यंतचा प्रवास त्यांचा मांडलेला आहे .त्यांनी गुलामांना स्वातंत्र्य मिळवून दिले याचे वर्णन केले आहे.

ए.पी.जे. अब्दुल कलाम

वडील नावाडी होते.

विद्यार्थिदशेत असताना ते रेल्वे स्टेशनवर वर्तमानपत्र विकत होते.

ते शास्त्रज्ञ झाले.

भारताचे राष्ट्रपती झाले.


शेक्सपिअर

खाटीकखान्यात नोकरी करत होते. रात्री नाट्यगृहाच्या आवारात घोडागाडी सांभाळता सांभाळता एका नाटककाराचा जन्म झाला.


लता मंगेशकर

वडील वारल्यावर त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी कोल्हापूरला स्टुडिओत नोकरी केली. कष्टात दिवस काढले. घर सांभाळले. विविध भाषेत पन्नास हजार गाणी म्हटली. भारतरत्न हा त्यांना सर्वोच्च किताब मिळाला.


ग. दि. माडगूळकर

मॅट्रिक नापास झाल्यांवर उदबत्त्या विकल्या. अनवाणी आयुष्य जगले. त्यांनी गीतरामायण लिहिले.


गुलजार

फाळणीनंतर दिल्लीला आले. दिल्लीहून मुंबईला आले. मोटार गॅरेजमध्ये काम करायला सुरुवात केली. बिमल रॉय भेटले. मोटार गॅरेजमधले आयुष्य फिल्म इंडस्ट्रीत आले.


सुधीर फडके

चहा भाजीचा व्यापार करत होते. प्रारंभीच्या काळात त्यांना पोटासाठी बाद्यं विकावी लागली. भटकंतीतून त्यांनी सूर शोधला. ते गायक झाले, संगीतकार झाले.


निळू फुले

पुण्याला कॉलेजमध्ये अकरा वर्षं माळी होते. झाडांची निगराणी करता करता ते राष्ट्रसेवादलाच्या पथकात सामील झाले. नटसम्राट निळू फुले महाराष्ट्राला माहीत झाले.

विष्णूपंत छत्रे

घोड्याच्या पागांमध्ये चाबूकस्वार म्हणून तीन रुपये पगारावर नोकरी करत असताना स्वतःच स्वतःचा मार्ग शोधला. भारतातील पहिली ग्रेड सर्कस निर्माण केली.


दारा सिंह

पंजाबमधल्या एका सामान्य खेड्यात आखाड्यात कुस्ती खेळत होते. रानात गुरं चरायला घेऊन जात होते. गुरांना सांभाळता सांभाळता त्यांना कुस्तीची आवड निर्माण झाली. जगभर कुस्त्या जिंकल्या. चित्रपटात कामे केली. राज्यसभेत खासदार म्हणून जाताना त्यांच्या मनात एकच भावना असते- एका खेडेगावात आखाड्यात कुस्ती खेळणारा मुलगा खासदार झाला.


एम. एफ. हुसेन

मुंबईच्या फुटपाथवर सिनेमाची पोस्टर्स रंगवली. पुढच्या आयुष्यात त्यांची शंभर चित्रे शंभर कोटींना विकली गेली. भारतात चित्रकलेच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला गेला.


कर्मवीर भाऊराव पाटील

कंदील आणि नांगराचे विक्रेते होते. कंदील नांगर विकता विकता त्यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण केली.


ग्रेटा गार्बो

गरीब शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला. तेराव्या वर्षी गरिबीमुळे शाळा सांडावी लागली. दुकानात सेल्सगर्ल म्हणून नोकरी करत असतांना अचानक • हॉलीवूडचे दरवाजे उघडले.


चार्ली चॅपलिन

प्रचंड गरिबी अनुभवली. विद्यार्थीदशेत फुले विकण्यापासून अनेक कामे केली. आपल्या विनोदाने जगभरच्या लोकांना हसवले.


सुशीलकुमार शिंदे सोलापूरला कोर्टात शिपाई होते. कोर्टाच्या आवारात त्यांनी आयुष्याचा अर्थ शोधला. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

लक्ष्मणराव किर्लोस्कर दहा वर्ष ड्रॉईंग टिचर होते. त्यांनी नांगराचा कारखाना निर्माण केला.


यशवंतराव गडाख

अहमदनगर जिल्ह्यात घोडेगावला शिक्षक होते. मुलांना फळ्यावर मुळाक्षर शिकवता शिकवता त्यांनी शाळेच्या बाहेरचे जग बघितले. वयाच्या पंचविशीत सोनईला मुळा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली.


धीरुभाई अंबानी

वडील प्राथमिक शिक्षक होते. सासरे पोस्टमन होते. भाऊ रेशनिंग ऑफिसात नोकरीला होता. स्वतः ते पेट्रोल पंपावर क्लार्क म्हणून तीनशे रुपये पगारावर नोकरी करत होते. अशा वातावरणात त्यांनी स्वतःचे औद्योगिक साम्राज्य निर्माण केले.


स्टीव्ह जॉब्स

कोकच्या रिकाम्या बाटल्या विकून जेवणासाठी पैसे मिळवावे लागले. जगातल्या मोठ्या कॉम्प्युटर कंपन्यांपैकी एक ' अॅपल'ची स्थापना केली.


सुनील दत्त

रेडिओ सिलोनवर अभिनेत्यांच्या मुलाखती घेत असतानाच चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. अभिनेता व राजकारणी म्हणून समृद्ध आयुष्य जगले.


जॉनी वॉक

बस कंडक्टर होता. प्रवाशांची तिकीटे फाडता फाडता त्याच्या सिनेमाची तिकीटे लोकांनी घ्यायला सुरुवात केली. एका तिकीटाचा प्रवास दुसऱ्या तिकीटावर स्थिरावला.


महेमूद

ड्रायव्हर होता. चलती का नाम गाडी, सबसे बडा रुपय्या त्याने म्हणायला सुरुवात केली. आणि गाडीचे व्हील हातातून केव्हा निसटून गेले ते स्वतःलाही समजले नाही.

या सर्व मोठ्या माणसांच्या हाती शून्य होते. त्यांनी अथक परिश्रमाने शून्यातून विश्व निर्माण केले. अनवाणी आयुष्याला आकार दिला. परिस्थितीशी झगडत संघर्ष करणाऱ्या माणसांपुढे आदर्श ठेवला.


प्रत्येक लेखकाची आपली स्वतःची अशी लेखन शैली दिसून येते. आपल्या भावभावना जीवनातील प्रसंग अगदी हुबेहूब रेखाटलेले आहेत. हे पुस्तक वाचून एवढ्या मोठ्या माणसांच्या किती बिकट प्रसंग आलेले असतील हे समजून येते. वयाच्या प्रत्येक पायरीवर असणाऱ्यांसाठी हे पुस्तक प्रेरणादायी आहे. प्रत्येक घटना, प्रसंग आपल्या आयुष्याशी निगडित आहे असे वाचताना वाटते. या पुस्तकात आलेल्या सर्व माणसांच्या हातात शून्यच होता. शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती या पुस्तक वाचनातून मिळते.

        पुस्तकाची बांधणी छान आहे. पुस्तकाचे मुखपृष्ठ खूप सुंदर आहे .त्यावर पुस्तकात असलेल्या महान व्यक्तींची छायाचित्र दिलेली आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर प्रत्येकाच्या आयुष्यात एवढी मोठी व्यक्ती असून ते नक्की कोणतं काम करत होते याची एका ओळीत माहिती दिली आहे. त्यामुळे पुस्तक पाहता क्षणी ते वाचण्याचा मोह होतो. मुखपृष्ठाची मांडणी सतीश भावसार यांनी केलेली आहे पुस्तकाचे प्रकाशन स्वतःच अरुण शेवते यांनी केलेलं आहे .ऋतुरंग प्रकाशन गोरेगाव मुंबई या प्रकाशन संस्थेने या पुस्तकाचं प्रकाशन केलं आहे. या पुस्तकाची २५ वी आवृत्ती जानेवारी २०१३ ला आलेली आहे. पुस्तकाची एकूण पृष्ठ संख्या २३२ आहे. सर्वांनी वाचाव असं हे पुस्तक आहे. प्रत्येकाच्या संग्रही ठेवावं असं पुस्तक आहे.


संपादन :-अरुण शेवते

प्रकाशन :-ऋतुरंग प्रकाशन गोरेगाव मुंबई

मुखपृष्ठ व मांडणी :-सतीश भावसार

किंमत:- दोनशे रुपये


Thursday, June 9, 2022

पसरणी गावची गौरव गाथा 9



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

३} पुस्तक क्रमांक     :-  9

४} पुस्तकाचे नाव      :-  पसरणी गावची गौरव गाथा

५ } लेखक         :- श्री.शिवाजीराव शिर्के

६} प्रकाशक              :-प्रवीण प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 प्रथमावृत्ती

८} एकूण पृष्ठ संख्या :-  104

९} मूल्य        150       :- ₹  फक्त


 *पसरणी गावची वाचता गौरव गाथा* 

 *तिच्या चरणी होतो माझा लीन माथा*


सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णा नदीच्या मुशीत वसलेलं पसरणी हे माझं माहेर . नावाप्रमाणेच चौफेर पसरलेलं आणि वस्ती केलेलं पसरणी हे गाव . घरांची वस्ती चहुबाजूने पसरली तशीच पसरणी च्या नावाची कीर्तीही सार्‍या जगतात पसरलेली आहे . अजूनही मराठी लोकसंस्कृतीत जागरण आणि गोंधळ घालताना पसरणीच्या भैरीदेवाला आठवणीने जागराला बोलवलं जातं आणि या गीताचे सारे श्रेय पद्मश्री आदरणीय शाहीर साबळे यांना दिलं जातं .

हे झालं लोकसंस्कृती आणि शाहीरीचं तसेचं आधुनिक बांधकाम क्षेत्रात पद्मश्री बी .जी. शिर्के यांचं नावही मोठ्या गौरवाने आणि अभिमानाने घेतले जात . हे नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभा राहतो तो म्हणजे  अभिमानाचा आणि शौर्याचा, कर्तुत्वाचा, कीर्तीचा.

 *मा* मातृत्वाचं आणि पितृत्वाचं लेणं

जिथल्या कुशीत मिळतं ते ठिकाणं

 *हे* हेवा वाटतो प्रत्येकिला आपल्या बालपणीच्या आठवणींचा

 *र* रमतं जिथं मन आणि मिळतो चार दिसांचा विसावा असं हळवं घर


 पसरणी गावची गौरव गाथा हे पुस्तक आदरणीय शिवाजीराव शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे तसं बघायला गेलं तर  गावचा सारा इतिहास आणि गौरव ग्रंथ याला म्हणावे लागेल. अजूनही या पुस्तकात दिवसेंदिवस अनेक हिरे मानके जोडली जातील. असाच गौरवशाली इतिहास या गावाचा आहे .सुरुवातीलाच या पुस्तकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत. हा गौरव ग्रंथ लिहिण्यासाठी पसरणी गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांनी मदत केली त्यांनाही मानाचा मुजरा याठिकाणी करण्यात आलेला आहे.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर  गावचे आराध्य दैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा सुंदर फोटो तसेच श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीची प्रतिमा याठिकाणी छापलेली आहे .गावातील साजरे होणारे उत्सव यांच्या प्रतिमाही पुस्तकात  दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकांचा संक्षिप्त परिचय देण्यात आलेला आहे .हे पुस्तक प्रवीण प्रकाशन शिवसुमन फुगेवाडी पुणे या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये एकूण 27 प्रकरण केलेली आहेत आणि त्यामध्ये  गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, ठिकाण, महात्म्य, इतिहास यांचा इतिवृत्तांत देण्यात आलेला आहे.

पसरणी गावाचा नकाशा सुरुवातीला त्या पुस्तकात देण्यात आलेला आहे यामुळे पसरणी गावाचे पर्यटन करताना कोणती स्थळ कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला समजून येते. या गौरव ग्रंथाला प्रस्तावना आदरणीय जगन्नाथ बाबुराव मुळीक सर यांनी आपल्या खास शैलीत दिलेली आहे. तसेच सुप्रसिद्ध लेखक व निवेदक आदरणीय  श्रीकांत चौगुले यांनी या पुस्तकासाठी आपला अभिप्राय लिहिलेला आहे.

सातारा जिल्ह्यात, वाई तालुक्यात असलेलं पसरणी हे माझं गाव, सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं गाव. ऐतिहासिक इतिहासाने गाजलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, छत्रपती शाहु महाराजांनी, नबाब, रघुनाथ स्वामीला वास्तव्याला दिलेलं, आणि कृष्णा नदीचा परिसर लाभलेलं, सृष्टी सौंदर्याने बहरलेलं माई पसरणी गाव मला फार, फार मनापासून आवडते.

प्राचीनकाळी विराटनगरी, दक्षिण भारताची काशी अशी वाई प्रसिध्दीस आलेले शहर  छ. शाहु महाराजांचे मातब्बर सरदार भिकाजीराव रास्ते यांनी • कृष्णातीरावर अनेक मंदिर बांधून पवित्र केलेले शहर. वाई शहराच्या पश्चिमेस ५ किलोमीटर अंतरावर पसरून वस्ती केलेलं पसरणी हे गाव. गावाला व गावच्या वैभवाला इतिहास आहे. गावामधील बहुसंख्य शेतकरी शेतात घरे बांधून वस्ती करून राहिलेले आहेत. गावांत रघुनाथ स्वामींनी बांधलेला रामाचा मठ आहे. गावाशेजारीच काही अंतरावर नबाबाचा बंगला आहे. या बंगल्यातून तो ४२ गावांचा कारभार पाहत होता. आता तो धोम धरणग्रस्तांनी विकत घेऊन त्यात ते राहत आहेत.


पसरणी गावाजवळच असणाऱ्या सोनगिरी व गाव डोंगराच्या घाटातून महाबळेश्वर, पांचगणीला जाणारा रस्ता आहे. वाई शहराची हद्द संपली की, पसरणी घाटाला सुरूवात होते. सुरूवातीलाच पसरणी घाट, वेडी वाकडी वळणे, “वाहने सावकाश हाका!" असा बोर्ड वाचावयास मिळतो. घाट पार करीत असतांना मध्यंतरी बुवासाहेबाचे मंदिर लागते. देवास नमस्कार करून रुपया, आठ आणे

टाकून प्रवासी पुढे प्रवासाला निघून जातात. या बुवासाहेब देवाबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते. एक इंग्रज आपल्या घोड्याच्या बग्गीमधून पैसे, दागिने, अनेक मौल्यवान वस्तू घेऊन महाबळेश्वरला चालला होता. त्याने या देवास लाथ मारली आणि पुढे प्रवास करू लागला. घाटातील मोठ्या मोरीजवळ येताच आकाशांत अचानक पावसाचे ढग जमा होऊन जोराचा पाऊस झाला व त्यात तो वाहून गेला. त्याच्या अनेक वस्तू अजूनही सापडतात, असे जुने, जाणकार लोकांकडून सांगितले जाते.


पुढे गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर सपाट मैदान लागते. यास “थापा” असे नाव आहे. या थाप्यावरून वाई शहर आणि कृष्णानदीचे पात्र, पांडवगड, तसेच धोम धरणाचा सुंदर जलाशय, चमकणाऱ्या मोत्याप्रमाणे दिसतो. पसरणी गावातील घरे काड्यापेट्या विस्कटून टाकल्या प्रमाणे दिसतात. ऊसाची शेती निळसर, लाल तुऱ्यांनी खुलून दिसते. हिरवी, पिवळी भात खाचरे, हिरवेगार डोंगरातून शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटा दिसतात. "महाराष्ट्राचे काश्मीर" 'म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वरचा भाग लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळेच हा परिसर प्रत्येकाच्या मनाला खिळवून ठेवतो.


पसरणी गावाशेजारील गाव डोंगरामध्ये मी लहानपणी शाळेत असतांना शेळ्या, गुरे, बैले चारावयास घेऊन जात होतो. त्यावेळी प्राथमिक शाळा ही माझ्या घराशेजारीच गोपाळराव पानसे यांच्या वाड्यामध्ये भरत होती. नंतर ती मारुती मंदिराशेजारी भरू लागली. कालांतराने गाव ओढ्याजवळच गावकऱ्यांनी मोठी वास्तू बांधली. त्यांत १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत शाळा भरते. हनुमान मंदिरा पाठीमागे बारवेची विहिरीच्या ठिकाणी काळभैरवनाथ प्रगटले अशी आख्यायिका आहे.

एवढं सुंदर वर्णन आदरणीय शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या गावाबद्दल केले आहे .याच पुस्तकात माझे आजोबा शिर्के भाऊ आणि पणजोबा यांचीही शौर्यगाथा लिहिली आहे.


१)पसरणी गावची पूर्वपीठिका


२)गावची मंदिरे-इतिहासाच्या पाऊलखुणा


३)काळभैरवनाथाचे माहात्म्य ४)निसर्ग सौंदर्य लाभलेले पसरणी गाव


५)माझे गाव पसरणी-बी.जी. शिर्के 


६)शोध आदर्श व्यक्तिमत्त्वांचा (गावची व्यक्तिमत्त्वे) 


७) क्षेत्र पसरणी काळभैरवनाथ माहात्म्य

८) पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे पसरणी गाव


९) पसरणी गावचा सांस्कृतिक इतिहास १०) पसरणी गावची भैरवनाथ यात्रा


११) पसरणी गावचे उज्वल भविष्य


१२) हिंदू-खाटीक यांचे भैरवनाथ श्रध्दास्थान


१३) माझ्या आठवणीतील पसरणी गाव


१४) पसरणी गावची कहाणी


१५)श्री क्षेत्रपाल भैरवाचे वैभव


१६) पसरणी ग्रामपंचायत माहिती


१७) गावातील पतसंस्था, ट्रस्ट, संस्था


१८) विकास सेवा सोसायटी- गावच्या विकासाची गंगोत्री १९) पसरणी गावची माहिती - काव्यात


२०) महाराष्ट्र राज्य माहिती


२१) गावची आदरणीय प्रभावी व्यक्तीमत्त्वे


२२)एक सत्यशोधकी कार्यकर्ता-वरखडे गुरूजी 

२३) प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व- प्रदीपकुमार महांगडे


२४) पसरणी गावची ठळक वैशिष्टे


(२५) गावचा अभिमान-अभिनेत्री अश्विनी महांगडे


२६) पसरणी गावच्या यात्रेचं महत्व


२७)भैरवनाथ विद्यालय पसरणी जन्मकथा

एवढी विस्तृत माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे ही सारी माहिती संकलित करण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे या सर्वांचे शेवटी विशेष आभार मानण्यात आलेले आहेत यामध्ये गावातील सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे खरोखरच अभी अभिमान वाटावा अस माझं माहेर आणि असं हे पुस्तक साहित्य नगरी प्रसिद्ध होईल आणि गौरव गाथा दस देशातून सदोदित निनादत राहील सर्वांनी वाचावे समजून घ्यावं असे हे पुस्तक मी वाचलेले पुस्तक आणि थोडक्यात त्याचे परीक्षण याठिकाणी केले माझ्या परीक्षणापेक्षाही खूप मोठं गाव आणि त्यातील माणसं . या सर्वांना  पुन्हा एकदा माझा हृदय पुर्वक मानाचा मुजरा.

🌹 *माहेर माझं पसरणी*🌹


माझ्या माहेराची वाट

झाडी हिरवीगार दाट

आठवते मला नित्यरोज

माहेराची रम्य पहाट


   पाखरांची होते किलबिल

   मंदिरात ढोलताशांचा नाद

   घरोघरी प्रज्वलीत चूल

   मंजूळ वारा घालतो साद

 

माझ्या माहेराला आहे

कृष्णाबाईचा भव्य काठ

साऱ्या जगतात आहे

माझ्या माहेराची मान ताठ


   चौफेर पसरली आहे

   माझ्या माहेराची अमृत वाणी

   त्यावरूनच नाव गावाचे

   निसर्गरम्य माझी पसरणी

 

माझ्या माहेराला आहे

मोठा ऐतिहासिक वारसा

दिमाखात उभा आहे

नबाबाच्या बंगल्याचा आरसा


   उद्योगपती शाहीरांनी

  पसरवली माहेराची किर्ती

  दोन पद्मश्री असलेले

  पहिल गाव माझं सत्कारमूर्ती


पांचगणी महाबळेश्वरला जाणारा

भव्य दिव्य पसरणी घाट

माझ्या माहेराचा दाखवतो

सुखसमृद्धिचा थाट


  साऱ्या पंचक्रोशीत भरतो

  माहेराचा मोठा दसरा

  नाथसाहेबांच्या भक्तीरसात

  आनंदून जातो गावसारा


माझ्या गावची यात्रा

जपे साहित्य संस्कृतीचा वारसा

नव्या युगातील घडतो तिथे

मायावी नगरीचा जलसा


   परक्या मुलुखात राबतो

   माहेराचा माझ्या कष्टकरी हात

   वाट पाहतो त्यांची

  जन्मदायी माता आणि तात


लक्ष ठेव साऱ्या गावावर

जागृत देवा माझ्या भैरोबा

सुखासमाधानाने नांदू दे

घराघरातील घरोबा


   पून्हा पून्हा जन्मा यावे

   पसरणीआईच्या काळया कुशीत

    जीवन आपले सार्थ करावे

   जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात


✍🏻 *अंजली गोडसे( शिर्के)*✍🏻

       *मर्ढे ( सातारा)*


शिक्षण 8



 

१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  8

४} पुस्तकाचे नाव      :-  #शिक्षण #मनीष #सिसोदिया

५ } अनुवाद          :-  राहुल केशव कदम

६} प्रकाशक              :- मनोविकास प्रकाशन पुणे

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  148

९} मूल्य        170  ₹  फक्त


माणूस जन्माला आल्यापासून शिक्षणाशी आपली नाळ जुळलेली असते नव्हे तर आपण गर्भातच शिकत असतो.शिक्षण मग ते शाळेतील असो नाहीतर जीवनाच्या प्रवासातील अनुभवाचे शिक्षण

शिक्षण ही अविरत चालणारी प्रक्रिया आणि आपण आजन्म विद्यार्थीच असतो.

शिक्षण हे दिल्लीचे शिक्षण मंत्री आदरणीय मनीष सिसोदिया यांनी लिहिलेलं आणि राहुल केशव कदम यांनी अनुवादित केलेलं पुस्तक हातात पडलं आणि शिक्षण ही एक किती व्यापक कल्पना असते याची प्रचिती आली आदरणीय मनीष सिसोदिया यांनी शिक्षणमंत्री म्हणून राबवलेले माझे अभिनव प्रयोग या पुस्तकात आपल्याला प्रत्येक पानावर  पाहायला मिळतात. शिक्षण हे पुस्तक पुण्याच्या मनोविकास प्रकाशन चे अरविंद घनश्‍याम पाटकर यांनी 22 जानेवारी 2021 रोजी प्रकाशित केलेले आहे आदरणीय मनीष सिसोदिया साहेबांनी हे पुस्तक समर्पित करताना आपल्या सरकारी शाळेतील शिक्षकांना खूप मोठे स्थान दिलेले आहे ते म्हणतात या समर्पण पत्रिकेत


 *अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या दिल्लीच्या सरकारी शाळांमधील सर्व शिक्षकांना समर्पित* 


म्हणजेच आमच्या सरकारी शाळेतील शिक्षक ही एक ध्येयवेडे काम करतात आणि एक शिक्षण मंत्री अशा शिक्षकांना आपलं पुस्तक समर्पित करतो ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे.

आपल्या मनोगतात ते म्हणतात राजकीय इच्छाशक्ती नियोजन आणि अविरत प्रयत्न असेल तर शिक्षण क्षेत्रात चमत्कार होऊ शकतात याचे उत्तम उदाहरण म्हणजे दिल्लीची शिक्षण पद्धती.

या पुस्तकात त्यांनी दोन भाग केले आहेत पहिल्या भागात शिक्षणाची पायाभरणी आणि दुसऱ्या भागात शिक्षण बनावं जीवनाचा पाया असे दोन भाग केले आहेत सुरुवातीला दिल्ली एक आशा या प्रकरणात त्यांनी ही संकल्पना राबवण्यात पूर्वी दिल्लीतील शिक्षण पद्धती कशी होती आणि सध्याची शिक्षण पद्धती कशी आहे याचे सखोल मार्गदर्शन केले आहे आणि थोडक्यात आढावा या ठिकाणी दिलेला आहे ते या ठिकाणी म्हणतात शिक्षकांच्या सहकार्याशिवाय त्यांना कार्यप्रवण बनवल्याशिवाय आणि त्यांना प्रेरित केल्याशिवाय शिक्षणक्षेत्रात कोणताही बदल करणे शक्य होणार नाही.

शिक्षणाची पायाभरणी या घटकात सुरुवातीला त्यांनी दिल्लीतील शाळांची इमारती त्यांचं रूप पालटण्यासाठी अंदाजपत्रक तयार केलं आणि ही एक महत्त्वपूर्ण  निर्णायक घटना या ठिकाणी घडलेली आहे आपले खर्च एक चतुर्थांश रक्कम शिक्षणासाठी राखून ठेवण्याचे धाडस करणारे हेच देशातील बहुदा पहिलेच सरकार होते.

पायाभूत सुविधांचा श्रीगणेशा या ठिकाणी घालण्यात आला आणि सर्वप्रथम वर्गखोल्या क्रीडांगणे प्रयोगशाळा आणि ग्रंथालयाचे सद्यस्थितीची माहिती करून घेऊन त्यांचा विकास या ठिकाणी करण्यात आला. स्वतःचे घर बांधताना जसे आपण लक्ष घालतो तसे लक्ष लक्ष त्यांनी सरकारी शाळांच्या बांधकामात ते घालत होते आणि अर्थातच त्यांच्या मनातील भावना ही जवळपास तशीच होती सरकारी शाळांचा रूप त्यांनी बदलून टाकलं.

आव्हान परंपरेला छेद देण्याचं यामध्ये  मुलांसाठी मुलांचा विकास होण्यासाठी त्यांच्याशी क्षमतेनुसार वेगवेगळे गट तयार करण्यात आले आणि यामध्ये वाचन अक्षमता आणि मूलभूत गणित याचे आकलन कसे होईल यासाठी विविध उपक्रम राबविण्यात यावी यासाठी प्रतिभा ,निष्ठा, नवनिष्ठा असे गट तयार करण्यात आले. वाचनासाठी आणि गणितीय मूलभूत क्रियांसाठी उपक्रम राबवले .  वेगवेगळे अतिशय उच्च दर्जाचे उपक्रम त्यांनी राबवले. खरोखरच छोट्या छोट्या गोष्टीतून मोठ्या स्वप्नांना गवसणी घालणे शक्य होते हे त्यांनी या विविध उपक्रमातून दाखवून दिले.

मुख्याध्यापक शाळेचा कप्तान यामध्ये ते म्हणतात विमानात पायलटची भूमिका असते तीच भूमिका आज शिक्षणक्षेत्रात प्रत्येक शिक्षक पार पाडत असतो .त्यामुळे जसा नेता तशी प्रजा .यासाठीच मुख्याध्यापकांच सक्षमीकरण करणं खूप गरजेचं वाटत होतं आणि यासाठी त्यांनी मुख्याध्यापकांना प्रशिक्षित करायचं ठरवलं.  त्यांना उत्तम प्रशिक्षण देऊन सक्षम मुख्याध्यापक म्हणून तयार केलं .सगळ्यात महत्त्वाचं दिल्लीतील शाळेचे मुख्याध्यापक हे एक तर केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यूपीएससी त्या पदाची परीक्षा उत्तीर्ण होऊन आलेले आहेत किंवा त्यांना उपमुख्याध्यापक पदावरून पदोन्नती मिळाली आहे .एवढे सक्षम मुख्याध्यापक त्या ठिकाणी होते .आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण प्रशिक्षण त्यांनी मुख्याध्यापकांना देऊ केले या त्यांच्या प्रयत्नांमुळे काही सरकारी शाळांना सर्जनशील नेतृत्व मिळालं. त्यांनी पुढे जाऊन या उमलत्या कळ्यांना सुजाण आणि सुशिक्षित नागरिक बनवण्याचे व्रत हाती घेतले.

शिक्षक विश्वासाची पुनर्स्थापना यामध्ये त्यांनी प्रेरक शिक्षकांचा शोध घेतला.  ज्यांनी आपला जिद्द आणि उत्साह दाखवला त्यांना प्रेरक शिक्षक करून विशेष प्रशिक्षण देण्यात आले .या प्रेरक शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना इतर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना विविध उपक्रमांची माहिती करून देणे हे काम केलं.प्रेरक शिक्षक आपलं अनुभव सांगताना म्हणतात प्रवाहाच्या विरूद्ध पोहणे स्वतःला सिद्ध करावयाचे असते त्यांनी अशा अडचणींची पर्वा करून चालत नाही.

पालक एक महत्त्वपूर्ण घटक मुलांच्या शिक्षणाबाबत पालक आणि शिक्षक हे जणू दोन धुवा सारखे असतात त्यामुळे शिक्षकांबरोबरच पालकांचाही विकास करणं खूप गरजेचं आहे आणि ही गरज ओळखूनच शाळा व्यवस्थापन समित्या त्यांनी अधिकच सक्षमा बनवल्या.त्यांची निवडणूक लावली आणि लोकशाहीच्या तत्त्वावर शाळा व्यवस्थापन समित्या व त्यातली सदस्य यांची निवड होऊ लागली. शाळेतील पालकांचा सहभाग वाढवला. यासाठी त्यांनी मेघा पीटीएम पालक शिक्षक महामेळावा आयोजित केला.  महामेळाव्याचे विविध अनुभव त्यांनी विस्तृत  या ठिकाणी सादर केलेले आहेत.

या पुस्तकाचा दुसरा भाग म्हणजे शिक्षण बनावं जीवनाचा पाया.

यामध्ये जीवन विद्या शिबीर सहजीवनाची शैक्षणिक प्रारूप या संकल्पनेची रचना करण्यात आली यामध्ये वीस वर्षांच्या प्रवासानंतर मुलांकडून काय अपेक्षा आहेत त्यांना कोणत्या रुपात पाहणे आवडेल हे ध्येय निश्चित करणं आवश्यक होतं आणि या सर्वांचा विचार मान्य करून हे जीवन विद्या शिबीर आयोजित करण्यात आले.

आनंद वर्गाची भन्नाट कल्पना 

यांचा दिल्लीच्या सरकारी शाळेतील आनंद वर्ग दिल्लीतच नाही तर देशभरात प्रसिद्ध झाला आहे या शाळेतील एक विद्यार्थी दररोज एक तास नेमकं काय शिकतात हे या आनंद वर्गातून आपल्याला समजेल अशा प्रकारचे आनंद वर्ग मुलांची मानसिकता सकारात्मक आणि सर्जनशील करतात या आनंद वर्गाचे अनेक चांगले परिणाम दिसून आले आणि त्या अनुभवांची ही मांडणी याठिकाणी करण्यात आलेली आहे .या आनंद वर्गाची बीजे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एकत्र चर्चेत राहून तयार केली आहेत .या आनंद वर्गाचा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे होता.

यामध्ये

1 सजग ध्यानधारणा

 2 विद्यार्थ्यांना अधिक जबाबदार आणि प्रगल्भ बनवण्यासाठी सांगितलेल्या प्रेरणादायी कथा

3 विद्यार्थी स्वतःचे विचार आणि प्रतिक्रिया वैज्ञानिक दृष्ट्या समजू शकतील असे उपक्रम

असा हा आनंद वर्ग दररोज आठ लाख विद्यार्थी घेत होते ही खचितच साधी बाब नव्हे यामधून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा आणि ज्ञानप्राप्तीचा विचारदेखील सर्वांनाच रोमांचित करतो.

उज्वल भविष्याची नांदी या आपल्या शेवटच्या प्रकरणात ते म्हणतात की मी आजवर या केलेल्या सर्व नवनवीन उपक्रमांची उज्वल नांदी येत्या काही दिवसात सर्वांनाच पाहायला मिळेल .नुसती नोकरी करण्यासाठी शिक्षण नको तर इतरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यास शिक्षण आपण घेतलं पाहिजे . या विचारातूनच त्यांनी नवउद्यमी मानसिकता अभ्यासक्रम अनेक तज्ञ आणि मान्यवरांच्या चर्चेतून तयार केला . वर्गाच्या चार भिंतीच्या बाहेरील या जगाची ओळख होण्याच्या दृष्टीने इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना हा अभ्यासक्रम लागू करण्यात आला . रोजगाराच्या वाटा या अभ्यासक्रमातून भावी पिढीसाठी निर्माण झाल्या. ही तर फक्त सुरुवात आहे अजून पुढच्या काही दिवसात याचं खरं स्वरूप या शिकलेल्या मुलांच्या तून आपल्याला दिसून येईल. या सार्‍या उपक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी त्यांना सहृदय पूर्वक मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश मानायला ते विसरले नाहीत .आपल्या शेवटच्या प्रकरणात ज्या अनेक छोट्या मोठ्या हाताने त्यांना मदत केली त्या सर्वांचे ऋणनिर्देश त्याठिकाणी मांडलेले आहेत. खरोखरच शिक्षण माणसाला प्रगल्भ आणि सुसंस्कारित करत असतं या त्यांच्या विविध उपक्रमांत बरोबरच त्यांना आपल्या सरकारी शाळेत देशभक्ती शिकवणारा अभ्यासक्रमही सुरू करावयाचा आहे आणि लवकरच ते आपल्या शाळांमधून हा अभ्यासक्रम सुरू करतील .दिल्लीच्या सरकारी शाळांमधून शिकणारे हे असंख्य विद्यार्थी उद्या भारताचे एक उत्तम आणि सुसंस्कारीत नागरिक झाल्या शिवाय राहणार नाहीत. प्रत्येक शिक्षक, पालक, विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी यांनी या पुस्तकाचं वाचन करून आपल्या चिमुकल्या मुलांचे भवितव्य उज्वल कसं होईल याचा विचार करून विविध उपक्रम राबवले पाहिजेत. ज्या ज्या वेळेस ज्या ज्या ठिकाणी उज्वल आणि उत्क्रांती करणारा घडतं तिथं आपण आपली सदिच्छा भेट देऊन काहीतरी आपल्या भविष्यासाठी अनुभवांची शिदोरी घेतली पाहिजे. तेव्हा नक्की हे पुस्तक वाचा. 

या पुस्तकात एकूण 148 पृष्ठ असून या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ अतिशय सुंदर आहे. सर्वसामान्य घरातील मुलं या मुखपृष्ठावर हसताना आणि एक नवी आशा निर्माण करताना दिसत आहेत .मनाला भावणारे आणि प्रफुल्लित करणारं असे हे मुखपृष्ठ शिक्षणक्षेत्रातील प्रत्येकालाच नवी उभारी देणार अस आहे.

अशी वेगवेगळी पुस्तकं वाचूया आणि आपला देश सुसंस्कारित घडवूया.

धन्यवाद🙏🏻🌹🌹✒️📚


 *सौ.अंजली शशिकांत गोडसे                             मर्ढे सातारा*

चैतन्यवेल 7

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  7

४} पुस्तकाचे नाव      :-  चैतन्यवेल

५ } कवी           :-  मनोज अग्रवाल

६} प्रकाशक   :- साहित्य प्रसार केंद्र नागपूर

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021  

८} एकूण पृष्ठ संख्या :-  86

९} वाड् मय प्रकार    :- कवितासंग्रह

१० } मूल्य     :- ₹ 120 फक्त


मनमंदिरात स्फूर्तीचा झरा अखंड पाझरत असेल तर आपल्या जीवनात आपल्या कार्याचा चैतन्यवेल सतत बहरत राहतो. असाच जीवनरूपी प्रवासात बहरणारा ,फुलणारा वेल,नव्या उमेदीची पालवी फुटलेला तुम्हा आम्हा सर्वांना आनंदित करणारा चैतन्य वेल आपल्या शब्दातून मनोज अग्रवाल यांनी अतिशय सुंदर रित्या शब्दबद्ध केला आहे. मुखपृष्ठाकडे पाहिलं की आपल्या मनात चैतन्याचे धुमारे फुटू लागतात आणि नकळत आपण त्यावर विराजमान होऊन एका वेगळ्याच सृष्टीत निघून जातो. चैतन्यवेल काव्यसंग्रह वाचताना माझीही अशीच अवस्था झाली होती.


वाहतील नवस्फूर्तीचे वारे तेजाळतील नवतेज तारे निवळूनी विकार सारे उन्नत मार्ग उमगेल धरूनी धीर थोडा चैतन्यवेल स्फुल्लिंगेल


आपल्या पहिल्याच चैतन्य वेल या कवितेतून अतिशय मनाला प्रेरणा देणारे या काव्यपंक्ती आहेत .कितीही निराशजनक परिस्थिती असली तरीही पुन्हा एकदा नवस्फूर्तीचे वारे फिरणार आहेत असा आशावाद कवी या ठिकाणी दाखवत आहे.


महती नितळ प्रेमाची असे असीम अमर्यादित द्वेषास जिंकावे प्रेमाने असू द्यावे प्रेम सदोदित


स्वच्छ आणि नितळ प्रेम कस असावं याची अनुभूती प्रेम सदोदित या आपल्या कवितेतून देताना कवी असं म्हणतोय कितीही राग आला तरी त्या रागाला प्रेमाने जिंकून घ्यावं घ् आणि आपले प्रेम हे सदोदित ठेवावं. कारण प्रेम हे कसं नातं हे किती कधीच विसरल जात नाही. राग क्षणाचा असतो पण प्रेम हे युगांतराचं असतं.


अडीच अक्षरे प्रेमाची 

व्यापती आसमंत सारे 

स्थानोस्थानी अस्तित्व प्रेमाचे न सुटले चंद्र-तारे


प्रेमाच्या या कचाट्यातून निसर्ग चंद्र तारे हि सूटले नाहीत आपण तर सर्वसामान्य माणसं. प्रेम फक्त प्रेयसीने प्रियकराचा नसून साऱ्या सजीव सृष्टी वर आपण करत असलेल्या प्रेमाची परिभाषा आपल्या शब्दातून याठिकाणी मनोज यांनी मांडलेली आहे.


असण्याने सुस्त वाढे अस्वस्थता 

आळशी मन वाढवी अस्थिरता

 देतात कष्ट मान-सन्मान 

होई कष्टकरी सुजन ,महान


आपल्या कष्ट या कवितेतून कष्टाचे मोल अतिशय सुंदर शब्दात रेखाटताना मनोज जी म्हणतात आळशी असलं की आपलं मन अस्थिर होतं आणि आपण सतत प्रयत्नात आणि कामात व्यस्त असलो की हे कामच आपल्याला मान सन्मान देत राहतं आणि जो कष्ट करतो तोच महान बनतो.


निनादेलं उजाळा कर्तुत्वाचा घेऊनी कार्यसिद्धी चा वसा सोबत ज्योती चिकाटीची प्रत्यक्ष स्मृतींचा अमीट ठसा


प्रयत्न ,चिकाटी, कष्ट, जिद्द याच गोष्टींना नेहमी यश चिकटलेले असतं. कर्तुत्व मोठ होण्यासाठी त्यामागं केलेल्या कष्टाची परिसीमा आठवावी लागते .कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही .त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत. आपल्या कवितेतून अतिशय सुंदर त्यांनी त्यांच्या स्मृतींचा  ठसा उमटवलेला आहे.


आपल्या शेवटच्या कवितेतून मृत्यूविषयी लिहताना ते म्हणतात मृत्यू एक अटळ सत्य आणि हा मृत्यू कधी ना कधीतरी आपल्यासमोर उभा राहणार आहे .त्यामुळे हे जीवन नश्वर आहे या ठिकाणी आपले जीवन सुंदररित्या जगून आपल्या शब्दांचा ठसा आपल्यामागे आपण सोडून गेलं पाहिजे.

जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूपच विशाल आहे त्यांच्या लेखणीस माझ्या हृदयस्थ शुभेच्छा🙏🏻✒️ अशीच तुमची लेखणी बहरत जावो.📚✒️


        शब्दांकन✒️

सौ .अंजली शशिकांत गोडसे

       मर्ढे सातारा.



हिरवी पाती 6

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  6

४} पुस्तकाचे नाव      :-  हिरवी पती

५ } कवी  :- रवींद्रकुमार लटींगे

६} प्रकाशक  :- ग्राममित्र प्रकाशन कराड

७} प्रकाशन वर्ष  :- 2021 

८} एकूण पृष्ठ संख्या :-  72

९} वाड् मय प्रकार :- कवितासंग्रह

१० } मूल्य   :- ₹ 111 फक्त


वाऱ्यावर डुलणारी

उनाड हिरवी पाती 

निसर्ग मानवाचे 

सांगती अतूट नाती


.निसर्गाच्या छायेत आपण सतत रहात असतो.निसर्गाचे आणि आपले नाते अतूट आहे.निसर्गाच्या नाशाला सुरुवात झाली की, आपल्याही नाशाला सुरुवात होते. भिंतीवरचा रंग पुसला जातो. मनावर उमटलेला निसर्गाचा गर्द हिरवा रंग कधीच पुसला जात नाही. उलट वय वाढत जातं तसा तसा हा रंग अधिकच गडद होत जातो.


 अनेक शब्द आपल्या विस्मरणात जातात. पण हिरवा बोलीचा शब्द ओठावर आला की मनासमोर हिरवे गर्द रान दिसते. पाऊस पडत असताना आपण आपल्यालाच विसरत जातो. संध्याकाळी दिवेलागण मनाला हुरहुर लावून जाते. निसर्ग आपल्या तनामनात रुंजी घालत असतो. असाच सुंदर हिरवा निसर्ग आपल्या काव्यातून रवींद्रकुमार  यांनी रेखाटलेल्या आहे .


प्रत्येक पानापानावर जणूकाही ही झाडे शब्दांच्या रूपाने बोलकी होऊन आपल्याशी बोलत आहेत आणि एक अनोखा संवाद  आपल्याशी करत आहेत असा भास झाल्याशिवाय राहत नाही.


वार्‍याच्या स्पर्शाने मोहरायायचं 

पावसात सखे चिंब भिजायचं निसर्गाशी भ्रमंतीच नातं जपायचं 

जीवनात पाण्यावाणी प्रवाहित राहायचं


या पाझर तलाव आपल्या कवितेतून  सरांनी अतिशय सुंदर निसर्ग आणि जीवन यांचं नातं रेखाटलेले आहे. पावसात चिंब भिजायचं चिंब भिजताना सोबत मात्र सखी  आणि मग सखी सोबत आपलं जीवन या पाण्यासारख प्रवाहित करायचं .एवढा समर्पक अर्थ आपल्या काव्यपंक्तीतून या ठिकाणी त्यांनी रेखाटला आहे निसर्गप्रेमींना आकर्षित करना सातारा जिल्ह्यातील फुलांनी बहरलेला कास पुष्प पठार त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेला आहे ते म्हणतात .


कातळ फुलोत्सवाची 

नजाकत भारी 

रूप दिसती 

देखणं पठारावरी 


असं देखणं रुप कास पठाराचे त्यांनी आपल्या काव्यातून रेखाटलेले आहे म्हणजे एका कवीला झाडात कविता दिसते, फुलात कविता दिसते, मातीत कविता दिसते कारण कविता ही त्याच्या सुरुवातीला हृदयात असते. असाच हा बहुताली बहरणारा निसर्ग सरांच्या हृदयातही बहरलेला आहे त्यामुळे त्यांनी बहरलेल्या फुलांचा कुंचला करून आपल्या निसर्ग लेखणीतून सारा नजारा शब्दबद्ध करून आम्हा रसिक आणि वाचक प्रेमींसाठी आपल्या पुस्तकरूपी ठेव्यातून बहाल केला आहे .

धुक्यात हरवली वाट 

ती शोधायला लागलो 

पुढं पुढं शोधता वाट 

मीच धुक्यात हरवलो 


आदरणीय सरांचं असं निसर्गात हरवून जाणं आपल्याला या काव्यसंग्रहात पानोपानी दिसतं आणि आपणही त्या शब्द धुक्यासंगे कधी हरवून जातो हे कळतच नाही .


  हिरवी पाती मधील कविता निसर्गाचे वेगवेगळे रूप आपल्याला दाखवतात. शांत वाहणारी नदी मात्र अतिवृष्टी मध्ये रौद्र रूप धारण करते आणि क्षणात सारं काही उद्ध्वस्त करते ही दोन्ही रूपं त्यांनी अतिशय समर्पक रीतीने आपल्या काव्यातून रेखाटली आहेत खरंतर ही त्यांच्या लेखणीची एक वैशिष्ट्यपूर्ण धाटणी आहे. त्यांच्या लेखणीला साक्षात निसर्गाचं वरदान लाभलेल आहे .अशीही हिरवीगार पाती सतत प्रफुल्लित आणि बहरत राहोत याच माझ्या शब्दफुलांच्या शुभेच्छा🌹🌷🌿🌴


शब्दांकन

सौ .अंजली शशिकांत गोडसे

            मर्ढे सातारा



Friday, April 1, 2022

माझे मातीतले पाय 5

 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य📚✒️


पुस्तक परिचय क्रमांक📗-5         *पुस्तकाचे नाव*

               *माझे मातीतले पाय*          

  *लेखक* 

 *प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर*                                                 

*परिचय कर्ता*- *सौ.अंजली शशिकांत गोडसे*

*मर्ढे सातारा*


प्रस्तावना


'माता' आणि 'माती' यांची बूज राखणाऱ्यांच्या अंगी 'प्रतिभा' ही प्रत्येक श्वासागणिक वाढणारी आणि बहरणारी असते. त्याचं 'प्रतिभे'च चित्र भावनारूपी शब्दांमधून व्यक्त होतं आणि त्यालाच कवितेचं देखणं रूप प्राप्त होतं. अशा अनेक काव्यरूपी शब्दमण्यांची एक भावनामय माळ तयार होते. त्या माळेचे आपण जेव्हा जेव्हा अंतःकरणापासून वाचन करतो त्यावेळेस आपल्या मनातील आंतरिक भावनेला साद घातली जाते. तेव्हाच त्यात प्रतिभा ओतप्रोत भरलेली असते. याप्रमाणेच 'माझे मातीतले पाय' या कवितासंग्रहातून कवी प्रा. अरूण कांबळे बनपुरीकर यांनी टिपलेल्या भावविश्वातल्या सुंदर कवितांची गुंफण केलेली आहे. 'ओढ' या कवितेमधून प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर व्यक्त होताना म्हणतात


'तुझ्या शहरीवासाच त्याचा नको रे सहवास


बरी माझी गां पांढरी


माझ्या मातीचा सुवास'


शहरापेक्षा आपलं गावं बरं! माझ्या गावच्या मातीचा येणारा सुवास हवाहवासा वाटतो प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांनी निसर्गातील विविध घटना आपल्या कवितेमधून दृश्य रूपात मांडल्या आहेत. कौटुंबिक नाते संबंधांवरचं त्यांचं काव्यही अतिशय सुंदर रेखाटलेले आहे. 'गावरान चव' या कवितेमधून व्यक्त होताना एका गरिबाच्या घरची ताजी भाजी कशी असते याचं सुंदर वर्णन करताना ते लिहतात -


"गरिबा घरची ताजी भाजी


तेलमिठाने मग जमून


जीभेवरच्या घासाला या


गावरान मग चव देते


शेती-भाती, आई-वडील, यांच्याविषयी लिहताना त्यांच्या मनातील भावनांचा बांध फुटतो आणि त्यातून त्यांची काव्यरूपी अश्रूफुले विविध छटांनी जन्म घेतात. वाचताना वाचकाच्या मनावर त्या भावनांचा आघात होतो. एवढं सामर्थ्य त्यांच्या

प्रतिभाशक्तीत सामावलेलं आहे.


'दुष्काळ' या कवितेमधून व्यक्त होतांना दुष्काळाच्या झळा एका शेतकऱ्याला किती दाहकरीत्या झोंबतात याच समर्पक वर्णन त्यांनी केलयं ते लिहतात.


"शेतात राबणारा बाप माझा


चारा छावणीत जातोय


गुरांना घालत चारा रोज


शिळ्या भाकऱ्या खातोय'


प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या कविता एकाच विषयावर केंद्रित न होता त्यांच्या लेखणीने अनेक विषयांना अगदी अलगद स्पर्श करून वाचकांना एक काव्यमैफिलीची सुंदर मेजवानीच दिली आहे.


सारं जग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे. पण कवीला मात्र हीच भाकरी भासते ते आपल्या 'भाकरीचा सूर्य' या कवितेमधून व्यक्त होताना म्हणतात.


'भाकरीचा सूर्य गोल


रोज धावतो वेगात


आणि भूक पेटते


काळजांच्या ढगात'


या ओळी वाचताना खरचं पोटाला तिढा पडल्याशिवाय राहात नाही, पावसावरही त्यांनी आपलं काव्य अतिशय समर्पक केलेले आहे. आपल्या 'जीर्ण झालो असलो तरी या काव्यातून त्यांनी जगण्याची उर्मी दाखवली आहे ते लिहतात.


'जीर्ण झालो असलो तरी


फांद्याचे ओझे झेलतो आहे


हिरवळ पाहून अवतीभवती हिरवळीस या भूलतो आहे.


प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या सर्वच कविता अप्रतिम आहेत आणि या कवितेंना प्रतिभेची उंची लाभली आहे. कवितांच्या रूपाने त्यांचं हळवं मनं, मातीतल्या माणसांविषयीचे प्रेम, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, समाजातील वास्तव त्यांच्या शब्दांमधून व्यक्त झालेलं दिसून येतं. सर्वच कविता अर्थपूर्ण असून रसिकप्रिय आहेत. स्वतः प्राध्यापक असूनही त्यांचे शब्द हे खोल गर्तेत न अडकता अगदी सहज-सोप्या भाषेत त्यांनी आपल्या कवितेचे आकर्षक पैलू निर्माण केले आहेत. 'माझ्या मातीतले पाय' या कवितासंग्रहाप्रमाणे त्यांच्या पायांनी मराठी साहित्याची वारी अखंडपणे चालू देत. त्यांचा कवितासंग्रह सर्व रसिकजनांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांची लेखणी उत्तरोत्तर बहरत जावो हीच शुभेच्छा !


 *माझे मातीतले पाय* 

 *समीक्षा प्रकाशन* 

 *पृष्ठसंख्या -९६* 

 *पुस्तकाची किंमत -१२० रुपये* 


✒️📚

सौ. अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

मर्ढे

सातारा



Monday, February 28, 2022

एक होता कार्व्हर 4


 


वाचन साखळी समूह

महाराष्ट्र राज्य

पुस्तक परिचय

*एक होता कार्व्हर* 📚📚

 *पुस्तक क्रमांक* 4

 *परिचय कर्ता*   *सौ.अंजली शशीकांत गोडसे शिर्के*

*मर्ढे सातारा*


  ✍🏻✍🏻


निसर्गानेच जन्म दिला

 अवघ्या मानवजातीला

 उच्चनीच तो भेद  कसला

 सारी लेकरं समान काळ्या मातीला


आपल्या अवतीभवती का निसर्ग सर्व सजीव सृष्टीचा निर्माता आहे निसर्गाने एक सुंदर असं निसर्गचक्र निर्माण केलं पण या मानवजातीने निसर्गाच्या विरोधात जाऊन प्रगती करण्यास सुरुवात केली आणि समस्त जीवसृष्टी तुला धोक्यात आणलं पण याच निसर्गाकडे चला म्हणणारे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांच्यासारखे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक वेगळाच ठसा समाजमनावर उमटवतात निसर्गाने कोणताही भेदभाव केला नसताना मानवाने मात्र उच्च नीच काळा गोरा असा भेदभाव करायला सुरुवात केली आणि मानव जातीतील माणुसकी संपायला लागलि पण याही संकटाशी सामना करत आपल्या कार्यकर्तृत्वाचा एक आगळा वेगळाच ठसा सर्व लोकांच्यावर आणि त्यांच्या मनावर उमटवणाऱ्या  जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांना मानाचा मुजरा🙏🏻🚩

कार्व्हरांसारख्या झाकल्या माणिकांना आपल्यासमोर घेऊन सर्वांना प्रेरणा देणारे आदरणीय लेखिका वीणा गवाणकर ताईंना त्रिवार अभिवादन तसेच ज्यांच्या मुळे या पुस्तक रूपी विचारांचा खजिना माझ्या हाती सुपूर्द करण्यात आला त्या प्राज परिवाराला शतशः नमन ! पुस्तक हातात पडले ते ग्यान प्रकाशन फाउंडेशन मुळे त्यांचेही मनस्वी धन्यवाद🙏🏻😊


कोणतेही पुस्तक हाती पडले की खजिनाच सापडल्याचा मला आनंद होतो एक होता कार्वर पुस्तक मी वाचलं होतं तरी पुन्हा पुस्तक हातात पडल्यावर ते झपाटल्यासारखे वाचून काढली एका काळ्या रंगाच्या मुलांने वर्णभेदाची चटके सोसून केलेले संशोधनाचे महान कार्य सर्वांनाच प्रेरणा देणारे आहे.

 *खरोखरच दिसण्यापेक्षा असणं महत्त्वाचं* या वाक्याची प्रचिती या चरित्र ग्रंथातून आपल्याला मिळते कार्व्हर यांचा सारा जीवन प्रवास थक्क करणार आहे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल असलेला आपला न्यूनगंड काढून आपल्या आवडत्या कार्यात आपण काम करतो ना तेव्हा तेव्हा इतिहास घडतो.


प्राज  परिवाराने काढलेली ही विशेष आवृत्ती खरोखरच सर्व बाबतीत सरस ठरली आहे मुखपृष्ठ मलपृष्ठ कागद छपाई यातील सुबकता खूप छान आहे जेव्हा आपल्यात

 जगापेक्षा वेगळं करण्याची धमक असते ना अशा सर्वांनी तर हे पुस्तक अवश्य वाचलच पाहिजे.


निसर्गाशी समरस झालेले कार्व्हर यांचे व्यक्तिमत्व निसर्गाकडे चला हा शुभ संदेश देत आहे मी जास्त बोलत नाही कारण तुम्हा सर्वांनी ते पुस्तक घेऊन आवर्जून वाचलं पाहिजे. एक होता कार्व्हर वाचुन अनेक कार्व्हर नव्या युगात जन्म घेतील निसर्गातील प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची दृष्टीत आपली नकळत बदलून जाते टाकाऊ म्हणून टाकून देणाऱ्या वस्तू मधून अनेक टिकाऊ पदार्थ वस्तू बनवण्याची मनोमन प्रेरणा जागृत होईल शाश्वत कृषी विकासाची प्रेरणा मिळेल प्राज परिवाराने अतिशय सुंदर प्रेरणादायी पुस्तकाची आवृत्ती काढून रसिकांना व नवीन संशोधकांना नवीन नावीन्यतेची दृष्टी दिली आहे

प्राज परिवाराचे संस्थापक आदरणीय डॉक्टर प्रमोद चौधरी साहेबांचे शतशः आभार तुमच्या प्रेरणेतूनच कृषी क्षेत्राला एक नवसंजीवनी मिळेल

शेवटी एवढचं म्हणेन


 *वाचावा  कार्व्हर*

*शोधावा कार्व्हर*

*स्मरावा कार्व्हर*

*घडावा कार्व्हर*

*काळ्या आईच्या लेकरात*

✍🏻✍🏻

 *सौ.अंजली शशीकांत गोडसे शिर्के*

*मर्ढे सातारा*

Monday, January 17, 2022

पौष पौर्णिमा विशेष🌿🌿


 

*आमचा देव पारधीला गेला* ⛳⛳
 *पौष पौर्णिमा विशेष* 🌝🌕


दक्षिण काशी वाई पासून अवघ्या तीन किलोमीटरवर अंतरावर असलेली *पसरणी* हे टुमदार गाव. पसरणी गावात दसरा आणि यात्रा दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करतात .पसरणी गावाच्या यात्रेपूर्वी म्हणजेच पौष  महिन्याच्या पौर्णिमेला गावात आणि गावाशेजारील आजूबाजूच्या गावातील  पौष पौर्णिमा म्हणजेच मुदी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. पौष पौर्णिमेलाच *शाकंभरी पौर्णिमा* असंही म्हटलं जातं .
पौष पौर्णिमा हा हिंदू दिनदर्शिकेत पौष महिन्यात पौर्णिमेला येणारा महत्वाचा दिवस आहे. या दिवशी हजारो भाविक पवित्र गंगा आणि यमुना नद्यांमध्ये स्नान करतात. पौष पौर्णिमा ग्रेगरियन दिनदर्शिकेत डिसेंबर-जानेवारी महिन्यात साजरी केली जाते. पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयाग संगम (गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम) येथे हिंदू भाविक दूरदूरहून येऊन पवित्र स्नान करतात.
पौष पौर्णिमा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि या दिवशी देशाच्या विविध भागातील हिंदू मंदिरांमध्ये विशेष विधी आयोजित केले जातात. या दिवशी देवी शाकंभरी (देवी दुर्गाचा अवतार) यांची पूजा केली जाते. नऊ दिवस चाललेल्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची समाप्तीही पौष पौर्णिमेने होते.
अशाप्रकारे ही पौर्णिमा सर्वत्र साजरी केली जाते म्हणजेच आपल्या गावरान भाषेत *पुसाचा महीना* म्हटलं जातं. यावेळेस शेतात रब्बी हंगाम असल्यामुळे हरभऱ्याचे पीक सर्वत्र घेतले जाते .यावेळेस पसरणीमध्ये काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये लाकडाचा देव प्रतीकात्मक स्वरूपात बनवला जातो. याच काळभैरवनाथ देवाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि पसरणी गावात शिवारात ज्याला खंडोबाचा माळ किंवा दरा म्हणतात याच शिवारात वाटेवर एक मोठ आंब्याचं झाड आहे त्याला देवआंबा म्हणतात. पौष पौर्णिमेला देव बसवला जातो म्हणून त्या आंब्याला *देव आंबा* म्हणतात हे माझ्या आईकडून समजलं कारण त्याच देव आंब्याच्या खाली आमचं शेत आहे ज्या शेताला आम्ही देवाची पटी असे म्हणतो. या मागचा इतिहास या मुळेच मला समजला. देव आंब्याचे झाड कोणीही तोडत नाही किंवा त्या झाडाचे आंबे ही तोडत नाहीत कारण तो देवाचा आंबा आहे. देवाचे या आंब्यावर एक महिना वास्तव्य असते. म्हणजेच आमचा देव शिकारीला त्यालाच पारधीला गेला असे म्हणतात .या दिवशी घरोघरी नैवेद्याला दही भात केला जातो. याच दही भाताचे मोदकाप्रमाणे मुदया केल्या जातात आणि त्यावर हरभऱ्याच्या पाल्याचा शेंडा रोवला जातो .अशा तयार केलेल्या मुदया घरोघरी शेजारीपाजारी वाटल्या जातात.हे वाटायचे काम घरातील लहान मुलांकडे असते. ही चिमुकली मुले मुदया वाटताना म्हणतात
 *दहीभाताचा काला वर हरभऱ्याचा पाला आमचा देव पारधीला गेला*
 आम्ही पण लहानपणी खूप मजा करायचो प्रत्येक घरातील मुदीची चव वेगवेगळी असायची . एक एक मुदी वाटताना हळूच आम्हीही एक मुदी तोंडात घालायचो .
देव पारधीला जाणे म्हणजे आमचा देव शेतशिवारात राहून गावावर येणाऱ्या अनिष्ट संकटाचे हरण करून गावाचे रक्षण करतो दृष्ट शक्तींची शिकार करतो अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे आंब्यावर बसलेला देव माघ पौर्णिमेच्या जिला आपण *नव्याची पुनव* असं म्हणतो त्याच्या आदल्या दिवशी माघ शुक्ल १४ चतुर्दशी ला वाजत गाजत मंदिरात आणला जातो माग पौर्णिमा मेला देवाला नवीन वस्त्र परिधान करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो . माघ पौर्णिमेच्या नंतर पाचव्या दिवशी *औदुंबर पंचमी* ला पसरणीच्या काळभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरी केली जाते .अशी ही माझ्या काळीज कप्प्यात राहणारी पौष पौर्णिमा.


✍🏻✍🏻⛳⛳

 ©️®️ *सौ.अंजली शशिकांत गोडसे शिर्के* 
 *मर्ढे सातारा*

Wednesday, January 12, 2022

काळजात घर करून राहिलेले काळे हात*


 

*काळजात घर करून राहिलेले काळे हात*


*काळजात घर करून राहिलेले काळे हात*


मानवाला ज्या वेळेस अग्नीचा  शोध लागला तेव्हापासून मानव आपले अन्न भाजून आणि शिजवून खाऊ लागला. हळूहळू मानवाची प्रगती होत गेली आणि अन्न शिजवण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या. 


*घरातील चूल आपल्या काळजात घर करून राहणारी आपली संस्कृती* मग ती दगडांची व विटांची , सिमेंटची असो....या चुलीशी आपली नाळ  जन्मजन्मांतरीची. कितीही आधुनिक साधनांनी आत्ताचे स्वयंपाक घर समृद्ध असले तरीही आईच्या हातांनी  बनलेली चुलीची श्रीमंती आणि त्या हातांची चव आत्ताच्या आधुनिक साधनांना येणार नाही.


 घरातील चूल काळजात घर करून राहिली.... अन् आत्ता  जुन्या चुली जाऊन नवीन गॅस घरी आले. आणि आज पुन्हा एकदा गॅस सोडून माणसे आवडीने चुलीवरचा खास स्वयंपाक खाण्यासाठी हॉटेल गाठू लागली. किंवा आपल्याच आसपास एखादी चूल करून कधीतरी त्याच्यावर स्वयंपाक करू लागली.


आज मी ही तशी चूल करून त्यावर स्वयंपाक केला.आणि ती चुलीवरची काळी झालेली भांडी घासताना माझे हात मात्र काळे झाले. त्या हातांना पाहून आईची आठवण माझ्या  हृदयात, डोळ्यात भरभरून आली. 

जिने या हाताला जन्म दिला आणि या हातांचे वैभव आणि आयुष्य घडवण्यासाठी आपल्या हातांची तमा न बाळगता आयुष्यभर झिजत राहिली,आपल्या या हातांच्या ओंजळीत आपली भाग्यरेषा लिहिली. थंडीच्या दिवसात जेव्हा आपली आई काळी भांडी घासायची, तेव्हा तिचे हातही असेच काळे व्हायचे. आम्ही लहान असताना, मोठे मोठ्या गमतीनं ते हात पहायचो त्यावेळेस त्या कष्टाचे मोल समजत नव्हतं. पण आत्ता ज्या वेळेस त्या कष्टाचे मोल समजतंय तर ती अनमोल आई आणि तिचे आईपण कुठेतरी हरवून बसले आहे....... ते कधीच परत न येण्यासाठी....... त्यामुळे त्या काळ्या हातांची लाज न वाटता त्या मागच्या प्रेमाचा अभिमान आणि स्वाभिमान वाटलाच पाहिजे......

✒️✍🏻

सौ.अंजली शशिकांत गोडसे मर्ढे सातारा

Tuesday, January 11, 2022

आत्मप्रेरणा 3


 

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य📚✒️

पुस्तक परिचय क्रमांक📗-४       

  *पुस्तकाचे नाव* *_आत्मप्रेरणा_* 📚✒️ 

 *लेखक श्री. लक्ष्मण जगताप* ✒️📚


 ⛳ *पुस्तक परिचय कर्ता सौ अंजली शशिकांत गोडसे मर्ढे सातारा* ⛳


 *हृदयी ज्यांच्या माणुसकीचा पाझर फुटत असतो त्यांच्या लेखणीतून आत्मप्रेरणेचे झरे निर्माण होत असतात.* याच आत्मप्रेरणेच्या झऱ्याचं पुस्तकरूपी अमृत सर्व वाचकांना आत्मप्रेरणा या पुस्तकातून प्राप्त झाले आहे. पुस्तकाचे कोणतेही पान उघडा आणि ते अमृतपान घ्या .अमृतपान घेतली की नैराश्याच्या तिमिरातून निघून आत्मविश्वासाच्या तेजाकडे आपण गरुड भरारी घेतो. आदरणीय लक्ष्मण जगताप सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेले हे पुस्तक निश्चितच सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. कोणतेही संकट आले अथवा  मन नैराश्याने व्यापून गेले असेल तर या पुस्तकाचे कोणतेही एक पान उघडा आणि वाचा. नक्कीच तुम्हाला तुमचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. पुस्तक हाती लागलं नव्हे तर स्वतः लक्ष्मण जगताप सरांनी हे पुस्तक मला भेट दिले आणि मी ते पुस्तक वाचून काढले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसताक्षणीच खूप आवडणारे आहे. पुस्तकांशिवाय माणसांचे जीवन मी म्हणते अधुरच आहे.पुस्तक आणि मानव एकरूप झाल्याचे आत्मप्रेरणा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर स्पष्ट होत आहे. आत्मप्रेरणा, मनगटातील ताकद ,अपयशाला तुडवत यशाचा रस्ता धुंडाळण्याची शक्ती, आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द सारं काही या पुस्तकातून आपल्याला प्राप्त होतं .दैनिक सकाळचे लेखक व संपादक श्री संदीप रामराव काळे यांनी अतिशय सुंदर आणि साजेशी प्रस्तावना आत्मप्रेरणा पुस्तकाला दिलेली आहे . सदर पुस्तकात एकूण 39 पाठरूपी  आत्मप्रेरणेचे झरे वाहताना दिसत आहेत.खाली दिलेल्या नावावरूनच त्यांचे शब्दवैभव आपल्याला समजून येते.

१. आत्मप्रेरणेचे झरे

२. मुलांशी संवाद साधूया

३. चांगुलपणा शोधूया.

४. व्यक्तिमत्त्वाचा आरसा

५. मन की शक्ती

६. होय, तुम्ही यशस्वी होऊ शकता

७. पहिला प्रभाव संभाषण

८. शब्दांच्या दुनियेत .

९. मोकळेपणाने बोला.

१०. हीच ती वेळ ....

११. जे देतो तेच परत येते.

 १२. मुलांचे संगोपन करताना

१३. तुलना नको प्रेरणा हवी.

१४. किमया प्रोत्साहनाची.

१५. जबाबदारी लहान वयातच देऊ.

१६. गगनभरारी स्वप्नांची.

१७. यशाचा मार्ग सवयीतून गवसतो

१८. अशक्य ते शक्य.

१९. लोक काय म्हणतील २०. यशाची गुरुकिल्ली.

२१. संघर्षातून उजळलेली रत्ने,

२२. मोठी माणसे मोठी का होतात?

२३. आनंदी जगणे  असते तरी काय ?

२४. गमक यशाचे.

२५. जगणे करुया टेन्शन फ्री

२६. अहंकार ठरतोय नात्यांतील दुरावा

२७. वेळेचे नियोजन.

२८. कौतुक आणि टीका. २९. मार्कांच्या पलीकडे.

३०. मोबाईल मुलांसाठी घातकच

३१. अतीलाड की प्रेम.

३२. मनाविरुद्ध एकदा वागून तर बघा एकटा येतो.

३३. राग.

३४. आयुष्यात यशस्वी होण्याचा राजमार्ग

३५. प्रेम..

३६. समंजसपणा हवाच

३७. सुख दडलंय तरी कशात

३८. ग्रेटाच्या ग्रेट वर्कला साथ देऊया

३९. सुटीचा आनंद घेण्यासाठी.

 ज्यावेळेस एखाद्या वाचकाला ज्ञानार्जनाची खूपच तहान लागलेली असेल त्या वेळेस त्याने या पुस्तकाचे कोणतेही पान उघडावे आणि आपली तहान भागवावी ते अमृतप्राशन करावं आणि कृतार्थ व्हावं .

पुस्तक वाचन केले की आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते.एका ठिकाणी जगतात सर अस लिहितात


 **सकाळी पडलेली सावली एका जागी राहत नाही.* 


 *त्याप्रमाणे माणसाच्या* 


 *आयुष्यात सुख, दु:खाचा खेळ चालूच राहतो. प्रश्न हा आहे हा खेळ आपण* *_खेळतो कसा याचा._* 


 *आनंदी जगायला खूप पैसा अथवा संपत्ती असावी असे नाही** 


 खरोखर आपल्या मनाला जर सकारात्मक विचारांची जोड  असेल तर कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण मोठ्या हिमतीने त्या प्रसंगाचा सामना करू शकतो. आपल्याला जर वाचन सुख हवे असेल तर आत्मप्रेरणा हे पुस्तक नक्कीच वाचलंच पाहिजे .

परिस  पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले हे पुस्तक आपल्या ध्येयाच्या वाटेवर आपल्याला नक्की घेऊन जाईल .आदरणीय लक्ष्मण जगताप सरांच्या लेखणीला त्रिवार सलाम ✒️🙏🏻

आत्मप्रेरणा या साहित्यकृतीच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐 तेव्हा सर्वांनी नक्की वाचा आत्मप्रेरणा. धन्यवाद🙏🏻📚

📚 *पुस्तकातील पृष्ठसंख्या* *१५२* 

📚 *पुस्तकाचे मूल्य* *१६० रुपये*


 *शब्दांकन* ✒️

 *सौ . अंजली शशिकांत गोडसे* 

 *मर्ढे सातारा*

Sunday, January 2, 2022

सावित्रीबाई फुले 2


 

*सावित्रीबाई फुले*📚✒️ 

 *लेखिका माधुरी साकुळकर* ✒️📚


 ⛳ *पुस्तक समीक्षा* ⛳


3 जानेवारी  सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय .आजच्या या दिनाचे औचित्य साधून एका सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले असे शीर्षक देऊन क्रांतीज्योतीला वाहिलेली शब्द पुष्पांजली पारखण्याचं भाग्य मला मिळालं यातच माझ्या जीवनाचं कृतार्थ झाले .


सावित्रीबाई फुले या माधुरी साकुळकर लिखित पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत . प्रत्येक प्रकरणात माधुरी ताईंनी त्यांचे लेखनशैलीतून स्वतःचे वेगळेपण जपले आहे . पहिले प्रकरण पार्श्वभूमी पासून सुरू होऊन ते शेवटचे प्रकरण अखेरचा श्वास इथपर्यंत सावित्रीबाईंचा सारा जीवनप्रवास आपल्या शब्दांतून त्यांनी अगदी ओघवता रेखाटला आहे .

 माधुरीताई म्हणतात एखाद्याच्या आयुष्यात इतके पदर ! इतके पापुद्रे ! एक सोलावा तर दुसरा पापुद्रा निघतो . ही सर्व काही अशक्यकोटीतलं ! ज्या काळी स्त्री शिक्षणाची उदासीनता होती त्या काळात समस्त महिला वर्गात सावित्रीबाईरूपी ज्ञानाची ज्योत महात्मा फुले यांनी स्वतःच्याच घरात लावली . याच ज्ञानज्योतीची आता घराघरात ज्योत पेटली  आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या तेजाने ती दिवस-रात्र अखंड तळपत आहे .मातीची पाटी आणि झाडाच्या फांद्यांची लेखणी करून शिक्षण वसा घेतलेल्या सावित्रीबाईंना साक्षात त्यांच्या कुंकवाचे आणि काळ्या आईचे भरभरून आशीर्वाद पाठीशी होते.


सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात खंडोजीराव आणि लक्ष्मीबाई नेवसे पाटील या उभयतांचे पोटी सावित्री हे कन्या रत्न जन्माला आले .लहानपणापासूनच धाडसी ,दणकट असणारी सर्वांची लाडकी सावू धीट आणि जिद्दी होती. वयाच्या नवव्या वर्षीच सावू १८४० साली  सौ.सावित्री ज्योतिबा फुले झाली. ज्योतीबांच्या संसारात रममाण होत सावित्रीबाई त्यांच्या साथीने ज्ञानाच्या अखंड महासागरात बुडून गेल्या . मातीवरची अक्षरे कधी हृदयात घुसून बसली हे कळलेच नाही .१८४०ते१८४८  या काळात त्या भरपूर शिकल्या. बहुश्रूत झाल्या. १८४८ साली पुण्यामधल्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली .पहिल्याच मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका म्हणून काम करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. भारताच्या इतिहासात भारतीय थोर आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले.

सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक कार्यामध्ये स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन इतरांच्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरला. शैक्षणिक कार्याबरोबरच सावित्रीबाई सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. यावर विस्तृत लेखन माधुरी ताईंनी आपल्या लेखणीतून केलेले आहे. सावित्रीबाई या बहुगुणी होत्या.काव्यफुलें आणि बावनकशी सुबोध रत्‍नाकर असे दोन कवितासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत.

काव्यप्रतिभा ही दैवी देणगी आहे आणि या देणगीच्या परिसस्पर्शाने काव्य निर्मिती होते ती तनमनापर्यंत पोहोचते.याच त्यांच्यातील दैवी देणगीचे दर्शन या त्यांच्या दोन्ही काव्यसंग्रहातून झाल्याशिवाय राहत नाही. काव्य कसे बहरते हे सांगणाऱ्या काही कविताही या संग्रहात आहेत ज्या रसिकांचे लक्ष वेधून घेतात. संसाराची वाट या कवितेत त्या ज्योतीरावांबद्दल म्हणतात 


 **माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद* 

 *जैसा मकरंद कळीतला** 


 याच कवितेत शेवटी त्या म्हणतात 


 *करून प्रपंच | आहे तो कठीण* 

 *बोलून हा शीण I जाईल का?* 


तसेच सावित्रीबाईंच्या पत्रांमधून त्यांची अभिव्यक्ती आपल्याला दिसून येते भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचे आदर्श सहजीवन तसे त्यांनी केलेला त्याग डोळ्यासमोर उभा ठाकतो .रुग्णांची सेवा करतच त्यांना मृत्यूने कवटाळले आणि एका क्रांती पर्वाचा अंत झाला . पण या ज्योतीने लावलेल्या ज्योतींनी सारा प्रदेश ज्ञान प्रकाशात लख्ख केलेला आहे .खरोखरच सावित्रीबाईं विषयी माधुरी ताईंनी  लिहिलेले हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवता येईल असंच आहे . सर्वांनी नक्की वाचावे असे हे आदर्शवत पुस्तक . माधुरीताईंच्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹 धन्यवाद🙏🏻🙏🏻

 *पुस्तकातील पाने १०५* 

 *पुस्तकाची किंमत ७० रुपये*

 *पुस्तक समीक्षण* ✒️📚

 *सौ. अंजली शशिकांत गोडसे* 

*मर्ढे सातारा*🌹🌹