Tuesday, August 11, 2020

Activities Z P School Biramanewadi during the lockdown period 2020

 

Activities in my school during the lockdown period
Activities in my school during the lockdown period

मोबाईल मित्र

आमच्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याचा बराचसा भाग हा दुर्गम आणि डोंगराळ आहे . मार्च महिन्यात अचानक कोरोना महामारी मुळे सर्वांनाच लॉक डाऊनचा सामना करावा लागला . जास्त परिणाम घरातल्या चिमुकल्यांवर झाला आणि आपल्या शाळांवर ! शिक्षक आणि विद्यार्थी यांची ज्ञानाची नाळ तुटली गेली .शहरातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाली .शहरात सहसा प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच पण आमच्या खेडेगावातील मुलांचे शिक्षण कसं होणार ? माझ्या शाळेतल्या सर्वच पालकांकडे स्मार्टफोन नाहीत . ज्यांच्याकडे फोन आहेत त्यांची ऑनलाइन शिक्षण सुरू झाले पण अजूनही बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडे फक्त साधे फोन आहेत फक्त कॉल करून मला माझ्या विद्यार्थ्यांशी बोलता येत होतं . पण मला त्यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे समोरासमोरच संभाषण करणं आवश्यक वाटत होतं .

 आपल्या बाईंचा चेहरा समोर दिसल्यावर विद्यार्थ्यांना जो आनंद होतो ना तो अवर्णनीय असतो माझ्या शाळेतला एक विद्यार्थी खूपच गरीब परिस्थिती मध्ये आहे त्या मुलाची आई वडील पांचगणीतील एका हॉटेलवर कामाला आहेत आणि त्या हॉटेलमध्ये ते दोघे जण राहतात .बिरामणेवाडीत तो आजीकडे शाळेसाठी राहत होता .पण तो लॉक डाऊनमुळे  आई-वडिलांकडे हॉटेलवर राहिला गेला . माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला की त्याचा अभ्यास कसा घ्यायचा मग त्या हॉटेलमध्ये काम करण्याऱ्या स्वयंपाक करणाऱ्या कुकचा  स्मार्टफोन अभ्यासासाठी त्या विद्यार्थ्याला मिळवून देण्यात आला . दररोज सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास स्वयंपाकी स्वतःचा फोन विद्यार्थ्याला देऊ लागला अशा रीतीने त्या स्वयंपाक  करणाऱ्यालाच त्या विद्यार्थ्याचा *मोबाइल मित्र* केला तसेच गावांमधील एका विद्यार्थिनीला तिच्या मुंबईवरून सुट्टीला आलेल्या नातेवाईकांना मोबाईल मित्र करून ऑनलाइन शिक्षण प्रवाहात सामील करून घेतलं मोबाईल मित्र बनवले . मोबाईल मित्र या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मला समक्ष पाहून अध्यापन करता आले . मुले  मोबाईल मित्र व माझी ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेत वाट पाहू लागली . मोबाईल मित्र या उपक्रमामुळे पालकांना आपली मुले शिक्षणापासून वंचित न राहता ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात याचा आनंद झाला कोणत्याही संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण झाली त्यामुळे माझा हा उपक्रम बघून अनेक मोबाईल मित्र विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले . विद्यार्थी अगदी सहजपणे स्मार्टफोन हाताळू  लागली त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसांडुन वाहु लागला .

 नियमितपणे दिलेला अभ्यास आनंदाने करू लागली सर्व विषयांचा अभ्यास मला घेता येऊ लागला मोबाईल मित्र मुळे माझे शिक्षण छान सुरू झाले . सर्व विद्यार्थ्यापर्यंत मला पोहचता आले . काही शिक्षकांना माझ्यासारखी अडचण येत असेल तर त्या मुलांच्या आईवडिलांशी संपर्क करून त्यांच्या जवळपास स्मार्टफोन असणाऱ्या व्यक्तिला संपर्क करून मोबाईल मित्र उपक्रमाची माहिती देऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन आपण करू शकतो . आपल्या पण जवळपास असे काही विद्यार्थी असतील तर आपण पण त्यांचा मोबाईल मित्र बनून त्यांच्या शिक्षणात भाग घेऊ शकतो . राष्ट्र उभारणीत तुमचा सहभाग अमूल्य ठरेल .

मुख्याध्यापक
सौ अंजली शशिकांत गोडसे
शाळा बिरामणेवाडी
 ता. जावली  जि. सातारा