Monday, January 17, 2022
Wednesday, January 12, 2022
काळजात घर करून राहिलेले काळे हात*
*काळजात घर करून राहिलेले काळे हात*
*काळजात घर करून राहिलेले काळे हात*
मानवाला ज्या वेळेस अग्नीचा शोध लागला तेव्हापासून मानव आपले अन्न भाजून आणि शिजवून खाऊ लागला. हळूहळू मानवाची प्रगती होत गेली आणि अन्न शिजवण्याच्या पद्धतीही बदलत गेल्या.
*घरातील चूल आपल्या काळजात घर करून राहणारी आपली संस्कृती* मग ती दगडांची व विटांची , सिमेंटची असो....या चुलीशी आपली नाळ जन्मजन्मांतरीची. कितीही आधुनिक साधनांनी आत्ताचे स्वयंपाक घर समृद्ध असले तरीही आईच्या हातांनी बनलेली चुलीची श्रीमंती आणि त्या हातांची चव आत्ताच्या आधुनिक साधनांना येणार नाही.
घरातील चूल काळजात घर करून राहिली.... अन् आत्ता जुन्या चुली जाऊन नवीन गॅस घरी आले. आणि आज पुन्हा एकदा गॅस सोडून माणसे आवडीने चुलीवरचा खास स्वयंपाक खाण्यासाठी हॉटेल गाठू लागली. किंवा आपल्याच आसपास एखादी चूल करून कधीतरी त्याच्यावर स्वयंपाक करू लागली.
आज मी ही तशी चूल करून त्यावर स्वयंपाक केला.आणि ती चुलीवरची काळी झालेली भांडी घासताना माझे हात मात्र काळे झाले. त्या हातांना पाहून आईची आठवण माझ्या हृदयात, डोळ्यात भरभरून आली.
जिने या हाताला जन्म दिला आणि या हातांचे वैभव आणि आयुष्य घडवण्यासाठी आपल्या हातांची तमा न बाळगता आयुष्यभर झिजत राहिली,आपल्या या हातांच्या ओंजळीत आपली भाग्यरेषा लिहिली. थंडीच्या दिवसात जेव्हा आपली आई काळी भांडी घासायची, तेव्हा तिचे हातही असेच काळे व्हायचे. आम्ही लहान असताना, मोठे मोठ्या गमतीनं ते हात पहायचो त्यावेळेस त्या कष्टाचे मोल समजत नव्हतं. पण आत्ता ज्या वेळेस त्या कष्टाचे मोल समजतंय तर ती अनमोल आई आणि तिचे आईपण कुठेतरी हरवून बसले आहे....... ते कधीच परत न येण्यासाठी....... त्यामुळे त्या काळ्या हातांची लाज न वाटता त्या मागच्या प्रेमाचा अभिमान आणि स्वाभिमान वाटलाच पाहिजे......
✒️✍🏻
सौ.अंजली शशिकांत गोडसे मर्ढे सातारा
Tuesday, January 11, 2022
आत्मप्रेरणा 3
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य📚✒️
पुस्तक परिचय क्रमांक📗-४
*पुस्तकाचे नाव* *_आत्मप्रेरणा_* 📚✒️
*लेखक श्री. लक्ष्मण जगताप* ✒️📚
⛳ *पुस्तक परिचय कर्ता सौ अंजली शशिकांत गोडसे मर्ढे सातारा* ⛳
*हृदयी ज्यांच्या माणुसकीचा पाझर फुटत असतो त्यांच्या लेखणीतून आत्मप्रेरणेचे झरे निर्माण होत असतात.* याच आत्मप्रेरणेच्या झऱ्याचं पुस्तकरूपी अमृत सर्व वाचकांना आत्मप्रेरणा या पुस्तकातून प्राप्त झाले आहे. पुस्तकाचे कोणतेही पान उघडा आणि ते अमृतपान घ्या .अमृतपान घेतली की नैराश्याच्या तिमिरातून निघून आत्मविश्वासाच्या तेजाकडे आपण गरुड भरारी घेतो. आदरणीय लक्ष्मण जगताप सरांच्या सिद्धहस्त लेखणीतून निर्माण झालेले हे पुस्तक निश्चितच सर्व वयोगटासाठी उपयुक्त आहे. कोणतेही संकट आले अथवा मन नैराश्याने व्यापून गेले असेल तर या पुस्तकाचे कोणतेही एक पान उघडा आणि वाचा. नक्कीच तुम्हाला तुमचा मार्ग सापडल्याशिवाय राहणार नाही. पुस्तक हाती लागलं नव्हे तर स्वतः लक्ष्मण जगताप सरांनी हे पुस्तक मला भेट दिले आणि मी ते पुस्तक वाचून काढले. या पुस्तकाचे मुखपृष्ठ दिसताक्षणीच खूप आवडणारे आहे. पुस्तकांशिवाय माणसांचे जीवन मी म्हणते अधुरच आहे.पुस्तक आणि मानव एकरूप झाल्याचे आत्मप्रेरणा पुस्तकाच्या मुखपृष्ठावर स्पष्ट होत आहे. आत्मप्रेरणा, मनगटातील ताकद ,अपयशाला तुडवत यशाचा रस्ता धुंडाळण्याची शक्ती, आकाशाला गवसणी घालण्याची जिद्द सारं काही या पुस्तकातून आपल्याला प्राप्त होतं .दैनिक सकाळचे लेखक व संपादक श्री संदीप रामराव काळे यांनी अतिशय सुंदर आणि साजेशी प्रस्तावना आत्मप्रेरणा पुस्तकाला दिलेली आहे . सदर पुस्तकात एकूण 39 पाठरूपी आत्मप्रेरणेचे झरे वाहताना दिसत आहेत.खाली दिलेल्या नावावरूनच त्यांचे शब्दवैभव आपल्याला समजून येते.
१. आत्मप्रेरणेचे झरे
२. मुलांशी संवाद साधूया
३. चांगुलपणा शोधूया.
४. व्यक्तिमत्त्वाचा आरसा
५. मन की शक्ती
६. होय, तुम्ही यशस्वी होऊ शकता
७. पहिला प्रभाव संभाषण
८. शब्दांच्या दुनियेत .
९. मोकळेपणाने बोला.
१०. हीच ती वेळ ....
११. जे देतो तेच परत येते.
१२. मुलांचे संगोपन करताना
१३. तुलना नको प्रेरणा हवी.
१४. किमया प्रोत्साहनाची.
१५. जबाबदारी लहान वयातच देऊ.
१६. गगनभरारी स्वप्नांची.
१७. यशाचा मार्ग सवयीतून गवसतो
१८. अशक्य ते शक्य.
१९. लोक काय म्हणतील २०. यशाची गुरुकिल्ली.
२१. संघर्षातून उजळलेली रत्ने,
२२. मोठी माणसे मोठी का होतात?
२३. आनंदी जगणे असते तरी काय ?
२४. गमक यशाचे.
२५. जगणे करुया टेन्शन फ्री
२६. अहंकार ठरतोय नात्यांतील दुरावा
२७. वेळेचे नियोजन.
२८. कौतुक आणि टीका. २९. मार्कांच्या पलीकडे.
३०. मोबाईल मुलांसाठी घातकच
३१. अतीलाड की प्रेम.
३२. मनाविरुद्ध एकदा वागून तर बघा एकटा येतो.
३३. राग.
३४. आयुष्यात यशस्वी होण्याचा राजमार्ग
३५. प्रेम..
३६. समंजसपणा हवाच
३७. सुख दडलंय तरी कशात
३८. ग्रेटाच्या ग्रेट वर्कला साथ देऊया
३९. सुटीचा आनंद घेण्यासाठी.
ज्यावेळेस एखाद्या वाचकाला ज्ञानार्जनाची खूपच तहान लागलेली असेल त्या वेळेस त्याने या पुस्तकाचे कोणतेही पान उघडावे आणि आपली तहान भागवावी ते अमृतप्राशन करावं आणि कृतार्थ व्हावं .
पुस्तक वाचन केले की आपल्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते.एका ठिकाणी जगतात सर अस लिहितात
**सकाळी पडलेली सावली एका जागी राहत नाही.*
*त्याप्रमाणे माणसाच्या*
*आयुष्यात सुख, दु:खाचा खेळ चालूच राहतो. प्रश्न हा आहे हा खेळ आपण* *_खेळतो कसा याचा._*
*आनंदी जगायला खूप पैसा अथवा संपत्ती असावी असे नाही**
खरोखर आपल्या मनाला जर सकारात्मक विचारांची जोड असेल तर कितीही कठीण प्रसंग आला तरी आपण मोठ्या हिमतीने त्या प्रसंगाचा सामना करू शकतो. आपल्याला जर वाचन सुख हवे असेल तर आत्मप्रेरणा हे पुस्तक नक्कीच वाचलंच पाहिजे .
परिस पब्लिकेशन ने प्रकाशित केलेले हे पुस्तक आपल्या ध्येयाच्या वाटेवर आपल्याला नक्की घेऊन जाईल .आदरणीय लक्ष्मण जगताप सरांच्या लेखणीला त्रिवार सलाम ✒️🙏🏻
आत्मप्रेरणा या साहित्यकृतीच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐 तेव्हा सर्वांनी नक्की वाचा आत्मप्रेरणा. धन्यवाद🙏🏻📚
📚 *पुस्तकातील पृष्ठसंख्या* *१५२*
📚 *पुस्तकाचे मूल्य* *१६० रुपये*
*शब्दांकन* ✒️
*सौ . अंजली शशिकांत गोडसे*
*मर्ढे सातारा*
Sunday, January 2, 2022
सावित्रीबाई फुले 2
*सावित्रीबाई फुले*📚✒️
*लेखिका माधुरी साकुळकर* ✒️📚
⛳ *पुस्तक समीक्षा* ⛳
3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन आणि बालिका दिन म्हणून मोठ्या आनंदाने साजरा करतो . समस्त स्त्री वर्गासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे ज्या ठिकाणी या ज्योतीचा जन्म झाला त्याच ठिकाणी आम्ही या शिक्षण क्षेत्रात येऊन कर्तव्य बजावत आहोत याहून सुवर्णक्षण तो काय .आजच्या या दिनाचे औचित्य साधून एका सावित्रीच्या लेकींनी सावित्रीबाई फुले असे शीर्षक देऊन क्रांतीज्योतीला वाहिलेली शब्द पुष्पांजली पारखण्याचं भाग्य मला मिळालं यातच माझ्या जीवनाचं कृतार्थ झाले .
सावित्रीबाई फुले या माधुरी साकुळकर लिखित पुस्तकात एकूण बारा प्रकरणे आहेत . प्रत्येक प्रकरणात माधुरी ताईंनी त्यांचे लेखनशैलीतून स्वतःचे वेगळेपण जपले आहे . पहिले प्रकरण पार्श्वभूमी पासून सुरू होऊन ते शेवटचे प्रकरण अखेरचा श्वास इथपर्यंत सावित्रीबाईंचा सारा जीवनप्रवास आपल्या शब्दांतून त्यांनी अगदी ओघवता रेखाटला आहे .
माधुरीताई म्हणतात एखाद्याच्या आयुष्यात इतके पदर ! इतके पापुद्रे ! एक सोलावा तर दुसरा पापुद्रा निघतो . ही सर्व काही अशक्यकोटीतलं ! ज्या काळी स्त्री शिक्षणाची उदासीनता होती त्या काळात समस्त महिला वर्गात सावित्रीबाईरूपी ज्ञानाची ज्योत महात्मा फुले यांनी स्वतःच्याच घरात लावली . याच ज्ञानज्योतीची आता घराघरात ज्योत पेटली आणि समाजातील प्रत्येक क्षेत्रात आपल्या तेजाने ती दिवस-रात्र अखंड तळपत आहे .मातीची पाटी आणि झाडाच्या फांद्यांची लेखणी करून शिक्षण वसा घेतलेल्या सावित्रीबाईंना साक्षात त्यांच्या कुंकवाचे आणि काळ्या आईचे भरभरून आशीर्वाद पाठीशी होते.
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावात खंडोजीराव आणि लक्ष्मीबाई नेवसे पाटील या उभयतांचे पोटी सावित्री हे कन्या रत्न जन्माला आले .लहानपणापासूनच धाडसी ,दणकट असणारी सर्वांची लाडकी सावू धीट आणि जिद्दी होती. वयाच्या नवव्या वर्षीच सावू १८४० साली सौ.सावित्री ज्योतिबा फुले झाली. ज्योतीबांच्या संसारात रममाण होत सावित्रीबाई त्यांच्या साथीने ज्ञानाच्या अखंड महासागरात बुडून गेल्या . मातीवरची अक्षरे कधी हृदयात घुसून बसली हे कळलेच नाही .१८४०ते१८४८ या काळात त्या भरपूर शिकल्या. बहुश्रूत झाल्या. १८४८ साली पुण्यामधल्या तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली .पहिल्याच मुलींच्या शाळेत पहिली स्त्री शिक्षिका म्हणून काम करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. भारताच्या इतिहासात भारतीय थोर आद्य शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंचे नाव सुवर्णाक्षरात कोरले गेले.
सत्यशोधक समाजाची स्थापना करून सामाजिक कार्यामध्ये स्वतःच्या जीवनाची आहुती देऊन इतरांच्या घरामध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरला. शैक्षणिक कार्याबरोबरच सावित्रीबाई सामाजिक कार्यातही अग्रेसर होत्या. यावर विस्तृत लेखन माधुरी ताईंनी आपल्या लेखणीतून केलेले आहे. सावित्रीबाई या बहुगुणी होत्या.काव्यफुलें आणि बावनकशी सुबोध रत्नाकर असे दोन कवितासंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत.
काव्यप्रतिभा ही दैवी देणगी आहे आणि या देणगीच्या परिसस्पर्शाने काव्य निर्मिती होते ती तनमनापर्यंत पोहोचते.याच त्यांच्यातील दैवी देणगीचे दर्शन या त्यांच्या दोन्ही काव्यसंग्रहातून झाल्याशिवाय राहत नाही. काव्य कसे बहरते हे सांगणाऱ्या काही कविताही या संग्रहात आहेत ज्या रसिकांचे लक्ष वेधून घेतात. संसाराची वाट या कवितेत त्या ज्योतीरावांबद्दल म्हणतात
**माझ्या जीवनात ज्योतिबा स्वानंद*
*जैसा मकरंद कळीतला**
याच कवितेत शेवटी त्या म्हणतात
*करून प्रपंच | आहे तो कठीण*
*बोलून हा शीण I जाईल का?*
तसेच सावित्रीबाईंच्या पत्रांमधून त्यांची अभिव्यक्ती आपल्याला दिसून येते भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचे आदर्श सहजीवन तसे त्यांनी केलेला त्याग डोळ्यासमोर उभा ठाकतो .रुग्णांची सेवा करतच त्यांना मृत्यूने कवटाळले आणि एका क्रांती पर्वाचा अंत झाला . पण या ज्योतीने लावलेल्या ज्योतींनी सारा प्रदेश ज्ञान प्रकाशात लख्ख केलेला आहे .खरोखरच सावित्रीबाईं विषयी माधुरी ताईंनी लिहिलेले हे पुस्तक वाचनीय आणि संग्रही ठेवता येईल असंच आहे . सर्वांनी नक्की वाचावे असे हे आदर्शवत पुस्तक . माधुरीताईंच्या लेखनाला मनःपूर्वक शुभेच्छा🌹🌹 धन्यवाद🙏🏻🙏🏻
*पुस्तकातील पाने १०५*
*पुस्तकाची किंमत ७० रुपये*
*पुस्तक समीक्षण* ✒️📚
*सौ. अंजली शशिकांत गोडसे*
*मर्ढे सातारा*🌹🌹