Thursday, June 9, 2022

चैतन्यवेल 7

 १} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.📚✒️

२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे

३} पुस्तक क्रमांक     :-  7

४} पुस्तकाचे नाव      :-  चैतन्यवेल

५ } कवी           :-  मनोज अग्रवाल

६} प्रकाशक   :- साहित्य प्रसार केंद्र नागपूर

७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021  

८} एकूण पृष्ठ संख्या :-  86

९} वाड् मय प्रकार    :- कवितासंग्रह

१० } मूल्य     :- ₹ 120 फक्त


मनमंदिरात स्फूर्तीचा झरा अखंड पाझरत असेल तर आपल्या जीवनात आपल्या कार्याचा चैतन्यवेल सतत बहरत राहतो. असाच जीवनरूपी प्रवासात बहरणारा ,फुलणारा वेल,नव्या उमेदीची पालवी फुटलेला तुम्हा आम्हा सर्वांना आनंदित करणारा चैतन्य वेल आपल्या शब्दातून मनोज अग्रवाल यांनी अतिशय सुंदर रित्या शब्दबद्ध केला आहे. मुखपृष्ठाकडे पाहिलं की आपल्या मनात चैतन्याचे धुमारे फुटू लागतात आणि नकळत आपण त्यावर विराजमान होऊन एका वेगळ्याच सृष्टीत निघून जातो. चैतन्यवेल काव्यसंग्रह वाचताना माझीही अशीच अवस्था झाली होती.


वाहतील नवस्फूर्तीचे वारे तेजाळतील नवतेज तारे निवळूनी विकार सारे उन्नत मार्ग उमगेल धरूनी धीर थोडा चैतन्यवेल स्फुल्लिंगेल


आपल्या पहिल्याच चैतन्य वेल या कवितेतून अतिशय मनाला प्रेरणा देणारे या काव्यपंक्ती आहेत .कितीही निराशजनक परिस्थिती असली तरीही पुन्हा एकदा नवस्फूर्तीचे वारे फिरणार आहेत असा आशावाद कवी या ठिकाणी दाखवत आहे.


महती नितळ प्रेमाची असे असीम अमर्यादित द्वेषास जिंकावे प्रेमाने असू द्यावे प्रेम सदोदित


स्वच्छ आणि नितळ प्रेम कस असावं याची अनुभूती प्रेम सदोदित या आपल्या कवितेतून देताना कवी असं म्हणतोय कितीही राग आला तरी त्या रागाला प्रेमाने जिंकून घ्यावं घ् आणि आपले प्रेम हे सदोदित ठेवावं. कारण प्रेम हे कसं नातं हे किती कधीच विसरल जात नाही. राग क्षणाचा असतो पण प्रेम हे युगांतराचं असतं.


अडीच अक्षरे प्रेमाची 

व्यापती आसमंत सारे 

स्थानोस्थानी अस्तित्व प्रेमाचे न सुटले चंद्र-तारे


प्रेमाच्या या कचाट्यातून निसर्ग चंद्र तारे हि सूटले नाहीत आपण तर सर्वसामान्य माणसं. प्रेम फक्त प्रेयसीने प्रियकराचा नसून साऱ्या सजीव सृष्टी वर आपण करत असलेल्या प्रेमाची परिभाषा आपल्या शब्दातून याठिकाणी मनोज यांनी मांडलेली आहे.


असण्याने सुस्त वाढे अस्वस्थता 

आळशी मन वाढवी अस्थिरता

 देतात कष्ट मान-सन्मान 

होई कष्टकरी सुजन ,महान


आपल्या कष्ट या कवितेतून कष्टाचे मोल अतिशय सुंदर शब्दात रेखाटताना मनोज जी म्हणतात आळशी असलं की आपलं मन अस्थिर होतं आणि आपण सतत प्रयत्नात आणि कामात व्यस्त असलो की हे कामच आपल्याला मान सन्मान देत राहतं आणि जो कष्ट करतो तोच महान बनतो.


निनादेलं उजाळा कर्तुत्वाचा घेऊनी कार्यसिद्धी चा वसा सोबत ज्योती चिकाटीची प्रत्यक्ष स्मृतींचा अमीट ठसा


प्रयत्न ,चिकाटी, कष्ट, जिद्द याच गोष्टींना नेहमी यश चिकटलेले असतं. कर्तुत्व मोठ होण्यासाठी त्यामागं केलेल्या कष्टाची परिसीमा आठवावी लागते .कोणतंही यश सहजासहजी मिळत नाही .त्यासाठी प्रयत्न तर केलेच पाहिजेत. आपल्या कवितेतून अतिशय सुंदर त्यांनी त्यांच्या स्मृतींचा  ठसा उमटवलेला आहे.


आपल्या शेवटच्या कवितेतून मृत्यूविषयी लिहताना ते म्हणतात मृत्यू एक अटळ सत्य आणि हा मृत्यू कधी ना कधीतरी आपल्यासमोर उभा राहणार आहे .त्यामुळे हे जीवन नश्वर आहे या ठिकाणी आपले जीवन सुंदररित्या जगून आपल्या शब्दांचा ठसा आपल्यामागे आपण सोडून गेलं पाहिजे.

जीवनाकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन खूपच विशाल आहे त्यांच्या लेखणीस माझ्या हृदयस्थ शुभेच्छा🙏🏻✒️ अशीच तुमची लेखणी बहरत जावो.📚✒️


        शब्दांकन✒️

सौ .अंजली शशिकांत गोडसे

       मर्ढे सातारा.



No comments:

Post a Comment