Saturday, November 21, 2020

वाघबारस


 


🍃🍂🍃🍂🍃🍂🍃


*स्मृतीगंधातील आठवणी*


*वाघबारस* 🐅🍲


नाव वाचून थोडं चकित झाला ना पण अहो वाघबारस म्हणजे काय आपण लहान बाळाचे नाव ठेवतो तसे वाघाच्या बाळाचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम वगैरे नाही बर का ! या नावामागे मोठी गंमत आहे आताच्या जमान्यात आपल्याला पार्टी करणे ,फिस्ट करणे असे शुद्ध इंग्रजीमध्ये म्हणतो .


 *वाघबारस म्हणजे शुद्ध मराठीत शेतात ,डोंगरात जाऊन सर्वांनी मिळून मसाले भात ,फोडणीचा भात, तिखट भाग, पुलाव ,बिर्याणी असे वेगवेगळ्या प्रकारची प्रांतानुसार नावे घेऊन  एकत्र येऊन केलेला भात.*


 शहरातल्या मुलांना या वाघबारशीची काय मजा असते हे माहीतच नसेल कदाचित .पण


 *गावाकडच्या मुलांचा वाघबारस म्हणजे मौजमजेचा दिवस* .


 वाघबारस कशी साजरी करतात ते मग तुम्हाला वाचून नक्की समजेल.


सहसा वाघबारस रविवारीच केली जाते किंवा सुट्टीच्या दिवशी कारण सर्वांनाच सुट्टी असते आणि सुट्टीच्या आदल्या दिवशीची रात्र लहान मुलांची बैठक होऊन दुसऱ्या दिवशीच्या पार्टी चे नियोजन ठरलेलं असतं .कधी एकदा रविवार उजाडतो असं मुलांना होतं. रविवारची सकाळ झाली की या लहान मुलांची लगबग उडायची. अंघोळ उरकून ठरलेल्या ठिकाणी सर्व जमले की सामान गोळा करायला सुरुवात केली जायची. फोडणीचा भात करण्यासाठी लागणारे सामान गोळा केले जायचे. मग प्रत्येकाच्या घरोघरी जायचे. तांदूळ, चटणी, हळद, मीठ, मोहरी, जिरे ,लसूण, कांदा, बटाटे, तेल ,शेंगदाणे हे सगळं गोळा करण्यासाठी भांड्याचे प्रमाण ठरवून घेतलं जायचं . ज्या घरातील माणसं किंवा मुलं जास्त तेवढे त्यांचे प्रमाण जास्त काढले जायचे . तेलासाठी तेलातील पळीच प्रमाण ठरवले जायचं .म्हणजे कसं कोणाचं जास्त नको आणि कोणाचे कमी नको प्रमाण हो की नाही ? हे सगळं सामान गोळा झालं की पातेले कुणी घ्यायचं?  उलतन कोणी घ्यायचं? हे ठरवलं जायचं .



वाघबारशीची तयारी झाली  की सारा लवाजमा शेताची वाट धरायचा .सोबत डोंगरात चरायला गुरे ही घेतली जायची .गोंधळ इतका की अख्ख्या आळीत समजायचे की आज बच्चेकंपनीची वाघबारस आहे .चालत चालत गप्पा मारत डोंगर कधी यायचा हे समजायचं नाही . जाता जाता कोणाचेही शेतातल्या पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा हंगामानुसार भातात टाकायला घ्यायच्या . सावलीसाठी मोठं झाड शोधायचं .तीन दगडांची चूल मांडायची . एकाच आकाराची दगड शोधायची . झाडाच्या सावलीत ती छान पैकी मांडायची .  मग सुरू व्हायची शोधाशोध . समजलं का कशाची ती ? अहो वाळकी लाकडं  चुलीसाठी गोळा करायची . चुलीजवळ ठेवायची .भाताची तयारी सुरू .चार घरचे चार प्रकारचे तांदूळ ,चटणी ,मसाला, सगळे एकत्र केलेलं बाहेर काढायचं. तांदुळ स्वच्छ करायचे . लसूण सोलायचा. कांदे शिरायचे. भाताची तयारी झाली की त्या पातेल्यात भात करणारे त्याला बाहेरुन माती लावायची .ज्याला आपण बूड घेणे म्हणतो बूड घेतल्यामुळे चुलीवरचं  भांड जास्त काळे होत नाही आणि घासले की लगेच स्वच्छ होते .पुन्हा पहिल्यासारखे ! कधीकधी डोंगरातील गारगोटे तोडून ते एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलित केला जातो. चुल एकदा पेटली की पातेले चुलीवर ठेवायचं. मस्तपैकी लसून चटणी तिथलाच रानातला कढीपत्ता यांची फोडणी दिली की त्याचा वास सगळीकडे खमंग पसरायचा . त्या वासानेच भुकेने कावळे पोटात जोरात ओरडायचे . तांदूळ टाकून झऱ्याचे पाणी भाताला वापरायचे .

 *खुली हवा निसर्गाच्या सानिध्यात सूर्याची किरणं थेट भातावर . चुलीचा नैसर्गिक जाळ भाताला एक वेगळी चव आणायचा म्हणजे आताच्या भाषेत सेंद्रिय चव यायची. यामध्ये कोणत्याही रासायनिक कृत्रिम वस्तूंचा वापर नाही मग ते भातात असो नाहीतर जमलेल्या मुलांच्या मैत्रीच्या नात्यात* 

 *वाघबारशीच  ध्येयच मुळी निखळ, निरपेक्ष, निरंतर आनंद ना कोणती अपेक्षा ना कोणती अपेक्षा.* 



भात छान पैकी शिजल्यानंतर सर्वांनी गोलाकार एकत्र बसायचे .आपापल्या घरून  आणलेल्या ताटल्या काढायच्या . घ्यायचा भात खायला. रानात भात केल्यामुळे शेतातील देवदेवतांना निवद ( नैवेदय ) दाखवून चारही बाजूला थोडा थोडा भात शिंपडायचा . खायचा पोट भरून भात . त्या भाताला एक वेगळी चव अगदी नैसर्गिक ! जणूकाही निसर्ग देवतेने आमच्यासाठी तो भात बनवून पाठवलाय. 


 *घरोघरच्या तांदूळ आणि मसाले गोळा  करून बनवलेल्या त्या भाताला एकोप्याची चव असायची* .


    भाताचा कार्यक्रम आटोपला की सगळी भांडी गोळा करायची . झऱ्यावरच्या पाण्यावर घेऊन जायची . मातीचा आणि वाळूचा साबण आणि घासणी करून सगळी भांडी स्वच्छ करायची . थोडी मौज मजा मस्ती झाली की मन हळूहळू घराकडे यायचं .गुरांची आठवण यायची . गुरांना शोधून घराकडे हाकलायला सुरुवात करायची. सोबत काही सापडली तर वाळकी लाकडं आणि गुरांचे वाळलेले शेण ( खांडे ) गोळा करून घरच्या चुलीसाठी घेतली जायची .

अशारीतीने रविवारचा एक दिवस मजेत जायचा . वाघबारशीचा कार्यक्रम मोठ्या जोशात आणि जेवणावळीत पूर्ण व्हायचा .

आज पुन्हा बऱ्याच दिवसांनी तो अनुभव घेतला . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीच्या आठवणींच्या गाठोडयातील  एक एक आठवण बाहेर येऊन मला लिहिते करून गेली .धन्यवाद🙏🏻


✍🏻


 *सौ .अंजली शशिकांत गोडसे* ( *शिर्के* )

 *मर्ढे सातारा*

Tuesday, August 11, 2020

Activities Z P School Biramanewadi during the lockdown period 2020

 

Activities in my school during the lockdown period
Activities in my school during the lockdown period

मोबाईल मित्र

आमच्या सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्याचा बराचसा भाग हा दुर्गम आणि डोंगराळ आहे . मार्च महिन्यात अचानक कोरोना महामारी मुळे सर्वांनाच लॉक डाऊनचा सामना करावा लागला . जास्त परिणाम घरातल्या चिमुकल्यांवर झाला आणि आपल्या शाळांवर ! शिक्षक आणि विद्यार्थी यांची ज्ञानाची नाळ तुटली गेली .शहरातील शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण प्रणाली सुरू झाली .शहरात सहसा प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतोच पण आमच्या खेडेगावातील मुलांचे शिक्षण कसं होणार ? माझ्या शाळेतल्या सर्वच पालकांकडे स्मार्टफोन नाहीत . ज्यांच्याकडे फोन आहेत त्यांची ऑनलाइन शिक्षण सुरू झाले पण अजूनही बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांच्याकडे फक्त साधे फोन आहेत फक्त कॉल करून मला माझ्या विद्यार्थ्यांशी बोलता येत होतं . पण मला त्यांच्याशी व्हिडिओ कॉल द्वारे समोरासमोरच संभाषण करणं आवश्यक वाटत होतं .

 आपल्या बाईंचा चेहरा समोर दिसल्यावर विद्यार्थ्यांना जो आनंद होतो ना तो अवर्णनीय असतो माझ्या शाळेतला एक विद्यार्थी खूपच गरीब परिस्थिती मध्ये आहे त्या मुलाची आई वडील पांचगणीतील एका हॉटेलवर कामाला आहेत आणि त्या हॉटेलमध्ये ते दोघे जण राहतात .बिरामणेवाडीत तो आजीकडे शाळेसाठी राहत होता .पण तो लॉक डाऊनमुळे  आई-वडिलांकडे हॉटेलवर राहिला गेला . माझ्यापुढे मोठा प्रश्न पडला की त्याचा अभ्यास कसा घ्यायचा मग त्या हॉटेलमध्ये काम करण्याऱ्या स्वयंपाक करणाऱ्या कुकचा  स्मार्टफोन अभ्यासासाठी त्या विद्यार्थ्याला मिळवून देण्यात आला . दररोज सकाळी एक तास व संध्याकाळी एक तास स्वयंपाकी स्वतःचा फोन विद्यार्थ्याला देऊ लागला अशा रीतीने त्या स्वयंपाक  करणाऱ्यालाच त्या विद्यार्थ्याचा *मोबाइल मित्र* केला तसेच गावांमधील एका विद्यार्थिनीला तिच्या मुंबईवरून सुट्टीला आलेल्या नातेवाईकांना मोबाईल मित्र करून ऑनलाइन शिक्षण प्रवाहात सामील करून घेतलं मोबाईल मित्र बनवले . मोबाईल मित्र या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मला समक्ष पाहून अध्यापन करता आले . मुले  मोबाईल मित्र व माझी ऑनलाइन शिक्षणाच्या वेळेत वाट पाहू लागली . मोबाईल मित्र या उपक्रमामुळे पालकांना आपली मुले शिक्षणापासून वंचित न राहता ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात याचा आनंद झाला कोणत्याही संकटकाळात एकमेकांना सहकार्य करण्याची वृत्ती निर्माण झाली त्यामुळे माझा हा उपक्रम बघून अनेक मोबाईल मित्र विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी धावून आले . विद्यार्थी अगदी सहजपणे स्मार्टफोन हाताळू  लागली त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद ओसांडुन वाहु लागला .

 नियमितपणे दिलेला अभ्यास आनंदाने करू लागली सर्व विषयांचा अभ्यास मला घेता येऊ लागला मोबाईल मित्र मुळे माझे शिक्षण छान सुरू झाले . सर्व विद्यार्थ्यापर्यंत मला पोहचता आले . काही शिक्षकांना माझ्यासारखी अडचण येत असेल तर त्या मुलांच्या आईवडिलांशी संपर्क करून त्यांच्या जवळपास स्मार्टफोन असणाऱ्या व्यक्तिला संपर्क करून मोबाईल मित्र उपक्रमाची माहिती देऊन त्यांना मदत करण्याचे आवाहन आपण करू शकतो . आपल्या पण जवळपास असे काही विद्यार्थी असतील तर आपण पण त्यांचा मोबाईल मित्र बनून त्यांच्या शिक्षणात भाग घेऊ शकतो . राष्ट्र उभारणीत तुमचा सहभाग अमूल्य ठरेल .

मुख्याध्यापक
सौ अंजली शशिकांत गोडसे
शाळा बिरामणेवाडी
 ता. जावली  जि. सातारा

Sunday, May 17, 2020

Introduction of Samidha Book

🍃🍂🍃🍂🍃🍂🍃

    📚 पुस्तक परिचय📚
   
             समिधा


 सौ.अंजली गोडसे मर्ढे सातारा

      पुस्तक असतात अशी जी वाचायला लळा लावतात आणि आपल्या साहित्य विचारांचा मळा फुलवतात . जगण्याला नवी दृष्टी देतात आणि भरकटलेल्या जीवांची सृष्टी सजवून जीवन जगण्याचा नवा मार्ग दाखवतात . मनातले भाव अक्षरांच्या वाटे उतरतात आणि स्वतः बरोबरच वाचणाऱ्याचे जीवनही घडवतात .

       आदरणीय साधनाताई आमटे यांच ' समिधा  हे आत्मकथन आहे . पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील त्यांच्या निरागस , साध्या सरळ आत्मतेजाने तेजोमय झालेल्या चेहऱ्याकडे पाहूनच त्यांचा सारा जीवनप्रवास आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो .

    *काळ्या कातळातून आनंदवन फुलवणाऱ्या निर्मिकांस __
 या त्यांच्या अर्पणपत्रिकेवरून त्यांच उभं आयुष्य किती कठीण आणि संघर्षमय झाले असेल याची प्रचिती येते . समिधा या शब्दाचा अर्थच समर्पण असा होतो . यज्ञकुंडात अग्नी पेटवण्यासाठी सृष्टीवरील विविध वृक्षवल्ली ज्या शुभ आहेत त्यांच्या आणलेल्या , वाळून सुकून गेलेल्या लाकडांना 'समिधा ' असं संबोधल जातं . समिधा त्या यज्ञकुंडात अग्निच्या तोंडी समर्पित करून सत्कर्माची याचना व मनोकामना केली जाते .
     
       नागपूरमधील जुन्या वेदशास्त्रसंपन्न घराण्यातील सोवळे वळण असलेली एक तरुण सुंदर मुलगी एके दिवशी दाढी जटा , कफनी व दंडधारी अशा एका व्रतस्थ तपस्व्याला पाहते आणि सारं आयुष्य त्याच्या हवाली करते . त्या दोघांमध्ये वयाचे , रंगरूपाचे , स्वभावाचे , जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टीचेही अंतर तरीही दोघे एका विलक्षण ओढीने एकत्र येतात . इंदू घुले म्हणजेच साधनाताई आमटे आणि मुरली आमटे म्हणजेच बाबा आमटे . ती कमालीची सुंदर , असामान्य रूपवती आणि तो लोकसेवेचा पुजारी या दोघांच्या सहजीवनाची त्यांच्या आयुष्यातील खडतर प्रसंगांची ही कहाणी . स्वतःचा संसार कोणीही थाटात मांडत पण गरीब , आजारी , कुष्ठरोगी , समाजापासून कोसो दूर असलेल्या लोकांचा संसार सांभाळव्यासाठी स्वतःच्या देहाची या दिव्यकार्यात आहुती देणं वाटतं तितकं सोपी गोष्ट नाही . जीवनाच्या या प्रवासात ज्यांनी ज्यांनी आयुष्याच्या जाळीवर स्वतःला जाळून घेऊन समाजासाठी आहुती दिली तेच थोर झाले . खरचं एखादया सामर्थ्यवान पुरुषाच्या मागे एका स्त्रिचा हात असतो तसचं बाबांच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या संपूर्ण तारुण्याचा , आभासी जीवनाचा त्याग करून जे समर्पण केलं त्याचं यथार्थ चित्रणं त्यांच्याच तोंडून या आत्मचरीत्रात हृदयस्पर्शी मांडल आहे .
   
      लग्न झालं की स्त्रिचं आयुष्य एका परपुरूषाच्या हातामध्ये कायमस्वरूपी समर्पित करते . हे सर्मपणच प्रत्येक स्त्रिची अनामिक शक्ती असते . या समर्पणाची जाणीव प्रत्येक पुरुषाने ठेवली तरच ती स्त्री संसाररूपी विस्तवावरून चालताना होरपळून न जाता स्वतःला त्या अग्निदिव्यातून काढून अधिकच सोनाप्रमाणे चमकवते .

 समर्पणाच्या परिसावरती जीवन घे घासुनी
 प्रेम हे *उजळे त्यागातुनी I
 रविकांती अन् चंद्रप्रभेच्या विभोर त्या संगमी
 निघती हे भविष्य उधळत  वनीI


बाबा आमटेंनी किती समर्पक वर्णन केलयं त्यागाचं आणि समर्पणाचं . साधनाताईंच सर्मपण आणि या पुस्तकाचं वर्णन करण थोडक्या शब्दात जमतचं नाही त्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे आणि अनुभवलंही पाहिजे .

 साधनाताई म्हणतात , " स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलतांना जे हाती गवसले ते तुमच्यासमोर ठेवित आहे जे विस्मृतींच्या गर्तेत गेले ते प्रभुचे देणे होते त्याचे त्यानेच सव्याज परत नेले . "
   
मग नक्की वाचाच 'समिधा ' स्त्रिच्या अग्निदिव्याची धगधगती तेजोमय मशाल !

पुस्तकाचे नाव - समिधा
लेखक - साधना आमटे
प्रकाशन - पॉप्युलर प्रकाशन
पृष्ठसंख्या - १९६
किंमत - २७५ / -रुपये