Tuesday, December 14, 2021

कर्तव्याचे भान एक जोडी पायताण🥿

 



*कर्तव्याचे भान*                     
*एक जोडी पायताण*       

🥿👠👡    👢🥾👟

        आयुष्यात कधीच सर्व प्रश्नाची उत्तरे विधात्याला मागायची नसतात, काही उत्तरे आपणच शोधायची असतात. माणूस जन्माने नाही तर कर्माने मोठा होत असतो.                                        
 माणूस जन्माला आला त्यावेळेस ना कापड होते ना आभूषणे ना पायातलं पायताण. जशी माणसाची बुद्धी चालत गेली तशी प्रगती होऊन माणसाची गरजही  वाढत गेली .जशी प्रगती झाली तस पैसा हातात येऊ लागला आणि पैसा गरजेपेक्षा जास्त आला की  मागण्या ही जास्त होऊ लागल्या .विलासी जीवन आलं .अन्न, वस्त्र ,निवारा या प्राथमिक गरज भागूनही माणूस त्यापेक्षाही जास्त खर्च करू लागला. आणि एक नवा ट्रेंड निर्माण झाला ज्याच्याकडे जास्त पैसा आला तो अधिकच श्रीमंत होत गेला. नकळतच जसा समाज बदलला तशी माणसांची मानसिकता ही बदलत गेली .एक घर करुन राहणारा माणूस आता जाईल तिथे घर करून राहायला लागला. गावाकडचे घर शहराकडे घर .जमेल तिथे जागा घेऊन माणूस पैसा गुंतवू लागला. कपड्यांचं तर काही विचारूच नका .वापरा आणि टाकून द्या विचारसरणी असलेल्या या जमान्यात कपड्यांचे  घरोघरी ढीग लागलेले दिसतात .पूर्वी फक्त दिवाळी आणि  यात्रा असली की वर्षाला कुठेतरी एक ड्रेस मिळायचा. एका ड्रेसवर सगळे सण साजरे व्हायचे पण आता प्रत्येक सणाला नवीन ड्रेस लागतो नाहीतर आपले सण साजरे केल्यासारखे वाटत नाहीत .आणि हो ड्रेस नवीन आला कि त्याच्यावर नवीन चप्पल .जसा कार्यक्रम तशी चप्पल. शाळेत जायला वेगळी, कॉलेजला वेगळी, समारंभात वेगळी, फिरायला जायला वेगळी, शौचालयास जायला वेगळी. एवढ्या वेगवेगळ्या चपल्या वापरूनही माणूस घराबाहेर वेगळी चप्पल वापरतो आणि घरात वेगळी चप्पल वापरतो.जस की माणसाचं वागणं घरात एक आणि बाहेर एक. माणूस बदलत गेला पण अजूनही खेडेगावात काही घरं अशी आहेत की त्यांना एकाच रंगाचे दोन सारख्या चप्पल  वापरता येत नाही .मी ऐकलंय म्हणे शहरात वेगवेगळ्या रंगाचे बूट घालण्याची फॅशन आली पण ज्यांनी वेगवेगळ्या रंगाचे चप्पल घालून दिवस काढलेत त्याचं मोल हजारो किंमत असलेल्या बुटांना किंवा चप्पलला असणार नाही . प्रत्येक ड्रेस वर वेगवेगळे चप्पल घालून मिरवण्याचा हा जमाना कुठे आणि वेगवेगळ्या रंगाचे चप्पल घालून शिक्षण घेण्याचा अट्टाहास करणारे आजची चिमुकली पावले कुठे.माझ्या शाळेत येणाऱ्या त्या चिमुकलीच्या पायात मी वेगवेगळी चप्पल पाहिली आणि मन गलबलून गेलं. ही  तफावत कधी मिटणार माहीत नाही. या लेकीला तर चप्पल मिळाली पण अशी असंख्य मुले आज विना चप्पलची आपल्या अवतीभवती फिरत आहेत जमेल तशी त्यांना मदत करा एवढीच अपेक्षा.                       


 *गतिशील चपलांसाठी..* 

 *कृतिशील मदत*..!            

🙏🏻❤️🩴🥿👠👡👢👞👟🥾  


 *काळजातील शब्द* ✒️✒️
सौ . अंजली शशिकांत गोडसे
जि.प. प्राथ . शाळा बिरामणेवाडी
ता .जावली जि. सातारा


Sunday, June 13, 2021

विनोदी कथा चिंपांट....!!*


चिंपांट....!!*


पहाटेचं झुंजू मुंजू नुकतंच झालं होतं. कोंबड्यानं बांग देऊन आपलं चोख नित्य काम बजावलं होतं..

हळूहळू बाहेरील अंगणात चुली पेटल्या होत्या. तर कोणाचे पाण्याचे बंब. मधूनच कुत्र्यांचा अळोखेपिळोखे देत आवाज सुरु झाले. तर झाडांवर पक्षांचा किलबिलाट होत होता.
नुकतंच पूर्वेकडे तांबडं फुटलं होतं. गोट्यात गाय, म्हैस, शेळ्यांची चुळबुळ, बायाबापड्या,  गुरांची धार काढण्यात मग्न तर माणसं उठून चुलवाणासमोर बसून तंबाखूचा बार तोंडात भरत,तर बाया बापड्या मिश्रीचा तोबरा एक बोट हिकडं तर दुसर बोट तिकडं करीत भरीत होत्या.

प्रत्येकाला सकाळच्या प्रातर्विधी कामाला जायची गडबड..  पोरंबाळं तर अजून अंथरुणावरच लोळत होती. समदीकडं निसर्ग जागा व्हायला लागला व्हता, लेकराबाळांचाबी गलका ऐकू यायला लागला.  दोन चार घरं सोडली, तर काहीतरी विचित्र घडल्यागत आवाज कानी येत होता.

बाळी आपली डोळयावरील झापडं चोळत अंथरुणातच गुरगुटून हिकडून तिकडं अन तिकडून हिकडं कूस बदलत हलत होती. पण सकाळची शाळा म्हणून मग डोळं चोळत उठून अंथरुणावरच बसली तोच बाहेरील आवाज अधिकच वाढला होता.  तिने  दरवाजातून बाहेर जरा डोकावून पाहिलं. तर चांगल्या ठेवणीतल्या शिव्या कानावर पडल्या, अग बया बया,..आता..काय खरं नाय..असं म्हणत हिथच अडकवलं व्हतं, गेलं कुठं  कुणी नेलं .. म्हणून शिव्यांचा बार सुरू होता.

घराघरातुन एकच सूर ऐकायला मिळत होता. काय झालं व्हतं तर माणसांना सकाळच्या कामासाठी लागणारी घरामगाची सर्व चिंपाटं अचानक गायब झाली व्हती.  दोन चार घरातली फक्त तेवढीच खिळ्याला लटकवलेली दिसत व्हती. काय झालं असेल त्यांच्या चिंपाटांना ? सगळीच विचार करीत व्हती. बाळी आपलं शाळेचं उरकून मैत्रिणीच्या गोतावळ्यात  शाळेकडं निघाली मनातल्या मनात हास्याच्या उकळ्या फोडत खदखद हसत शाळेचा रस्ता धरला. आणि मग कालचा प्रसंग मनी आठवला *कुठं* *गेली हि  ' चिंपाट. " ???*

शोधली तर पाहिजेत ना !

गावाकडच्या या सगळ्या मित्र मैतरणी एकत्र सुट्टीत खूप मज्जा करायच्या . आया, बाया, शेजारानी, एकीमेकींना जीव लावायच्या दुखलं खुपलं बघायच्या लई एकी सगळ्यामधी कोणतंच काम एकटं करणं या मैत्रिणींना जमत नव्हतं;

सारखा  गोतावळा जाईल तिथं संगतीने शाळेत जाताना रानात जाताना एवढंच काय ? पण दोन नंबरला जाताना सुद्धा बरोबरच पण या कार्यक्रमाला दोन नंबर आणि पहिल्या कार्यक्रमाला एक नंबर का ?
  याचा अजून उलगडा काय झालाच नाही ..!

पामतेलाचे मोकळे डब्बे, रंगाचे डब्बे, याचा वापर दोन नंबरच्या कामाला पाणी नेण्यासाठी केला जायचा, त्याला चिंपाट म्हणायचे. प्रत्येकाच्या घराच्या मागे खिळ्याला अथवा खुंटीला चिंपाट अडकवलेलं असायचं, ज्याच्या घरात माणसं जास्त तिथं चिंपाट जास्त,
कोणाची गडबड नको व्हायला बया..!

  यासाठी डब्बे वापरले जातात. त्यामुळे गोऱ्या लोकांनी teenpot म्हणून नाव ठेवलं असावं आमच्या मराठमोळ्या माणसांनी teenpot चं चिंपाट केलं असेल..

चिंपाट मात्र आकाराने वेगवेगळी कुणाचं बारीक तर कुणाचं मोठं असू द्या पण घरातील खूप उपयोगी वस्तू नाही. वेळेला सापडलं नाही तर तांब्यावर काम भगवायचं पण खरंच सासुरवाशीण चिंपाट घेऊन गेल्या कि मनमोकळ्या गप्पा मारायच्या उनी धुनी काढायला बिचाऱ्यांना तेवढाच वेळ, विसावा घ्यायला.
गडी माणसे गप्पा मारायला याच निमित्ताने जाणारी तरुण पोर तरण्या पोरी चिंपाट घेऊन लांब लांब जायची अन मग प्रेम प्रकरण वाढायची त्या वयात कुणाला  काय कळतंय खरंच त्या चिंपाटाला बोलता येत असंत तर अनेक रहस्य उघडकीस आली असती..!

लई झालं चिंपाट पूरान खरी मजा तर पुढे हाय... तो रविवारचा दिवस होता. शाळकरी पोरींना   सुट्टी शेजारची बाय, अनी, रुपी, चिमी, बाळी, घट्ट मैत्रिणी  त्यात बाळी लई हुशार  सगळ्यांची लीडर आज्याच्या नावाच्या घुगऱ्या खाल्यागत सगळीच तिला ओळखायचे तिचा अज्जा सर्व गावातच प्रसिद्ध होता.

सुट्टीच्या दिवशी नुसतं हुंदडायचं उद्योग करायचे कमी आणि वाढवायचे जास्त हे बाळीच्या ग्रुपच ठरलेलंच. घरच्यांच्या डोक्याला ताप रानातली काम करायला घरातली लोक येरवाळीच रानात पोचली व्हती. या पोरींना  काय सर्व रान मोकळचं दुपारपर्यंत सगळ्या जणींनी, हुंदड हुंदड हुंदडल्या, तो पर्यंत गावात टंन टन  आवाज ऐकू  आला. बाळीसाहित सगळ्या पळत रस्त्याकड गेल्या.
पहातात तो काय ' बुड्डीकमाल" विकणारा होता.

बहुतेक सर्वांनीच खाल्लाय प्लास्टीकच्या कागदातला मऊ मऊ सशा सारखा दिसणारा लुसलुसीत गुलाबी हा गोळा  सायकलवर लटकलेलं दिसला की, तोंडाला पाणी सुटलंच. !
अन गुटक्या गिळायला सर्व पोरींनी सुरवात करीत  एक कटाक्ष टाकीत एकामेकींकडे  पाहिलं.
फक्त पन्नास पैसे पण  सर्वांचे मोकळे खिसे, ते गुलाबी गुलाबी रंगाचे कापसाचे गोड गोळे, आता काही चैन पडू देत नव्हते. काय होतं माहितेय का ते ? ते तर व्हतं. "

*बुड्डीकामाल ;* सगळ्यात आवडतं लहानग्यांचं नाही मिळालं तर रुसून बसायचं, आई बापाकडे पण कुठला आलाय पैसा..!! आता पैसे नाय मग कसा घेणार गुलाबी गोळा, ' बुड्डीकामाल; वाला तर म्हणे पोरीनो पैसे आना नाहीतर भंगार आता झाली ना पंचाईत, म्हणजे पैसा नसला तरी भंगार बी चालत हुतं, आत्ता करायचं काय! ?

या सगळ्यांत बाळीच पुढारीन तिचं डोकं सुपरफास्ट चालायचं कारण महाउद्योगी बाळ म्हणून फेमस होती.. डोक्यात सन्न झालं,तशी बाळीची ट्यूब पेटली, सर्व घरांच्या आळवंड्या  धुंडायला सुरवात झाली. बाळी पुढं मैत्रिणी मागं,असा हा लवाजमा फिरत होता,पण भंगार कुठंच मिळालं नाय.!

प्रत्येकाच्या घरामागं शोधलं. एक खिळा सापडला तर शपथ .! शोधून शोधून दमल्या बिचाऱ्या. पण जिद्द सोडली नव्हती त्यांनी  आणि मग *काळ्या कोळशात  हिरा* *सापडावा तसा* *बाळीला खिळ्याला* *लटकवलेलं पत्र्याचं चिंपाट* दिसलं आणि  तिच्या एकदम डोक्यात ट्यूब पेटली.. !

तिने सगळ्यांना एकत्र गोळा केलं. दुपारी कोणीच घरी नव्हते, पटापटा घरामागची सगळी चिंपाट गोळा केली.  प्रत्येकीने स्वतःच्या  घरातली तेवढी घेतली नाहीत. " तेवढी बाळी  हुशार होती. ;  तिनं फक्त आळीतील स्वतःचं व मैत्रिणीची घरं सोडुन देत बाकीच्या घरांतील सर्व चिंपाट गोळा केली होती..
चिंपाट तशीच बुड्डीकामाल वाल्याला दिली तर ती ओळखून येणार म्हणून
एक आयडीया केली, आता सर्व चिंपाट एकत्र करीत सगळ्यांनी त्याचा दगडांनी लगदा केला. सर्व सर्व चिंपाट आता चिंबून त्याचा पत्रा तयार झाला होता. बाळीच्या ग्रुपने  तो पत्रा उचलून बुड्डीका मालवाल्याला दिला. ज्यासाठी हा उद्योग केला त्या गुलाबी कापसाच्या  पिशव्या आमच्या हातावर ठेवल्या होत्या.  त्या घेऊन आम्ही धुमचकाट घरामागच्या रानात शाळात जाऊन त्याचा फडशा पडला होता.. पिशव्या तिथंच टाकून पुन्हा घराकडे वळलो..
चिंपाट फोडल्याची कसलीच सल मनी नव्हती..तर बुडडीकमाल खाल्ल्याची तृप्ती पोट भरून होती..!!

*लेखप्रपंच*
*सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)*
         *मर्ढे*


Saturday, June 12, 2021

पाझर मातृत्वाचा 1


 



































































 


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य📚✒️


पुस्तक परिचय क्रमांक📗-1          *पुस्तकाचे नाव*

               *पाझर मातृत्वाचा*            

  *संपादक* 

 *श्री-गणेश सिंधुबाई भगवान तांबे*                                                     

*परिचय कर्ता*- *सौ.अंजली शशिकांत गोडसे*

*मर्ढे सातारा*


🍂🍃🍂🍃🍂🍃     

   *संपलं माझं जीवन जरी* 


 *तुझे ऋण फिटत नाहीत*


 *तुझ्याशिवाय लेकराला* 


 *क्षण कोणतेच आठवत नाहीत*


       खरोखरच आपल्याला जन्म देणारी आई जिथून आपलं जीवन सुरू होतं आणि जिथं आपलं जीवन संपून जातं ती काळी माती दोन्ही आपल्या जिवलग आणि जीवन देणार्‍या! जन्म देणारी आई दुध पाजते तर ही धरणी माय आपल्याला खाऊ पिऊ घालते. भरभरून दान आपल्या पदरात टाकते.


       बरेच दिवस झालं या पुस्तकाविषयी लिहायचं होतं पण आई विषयी लिहिण्यासाठी आपण एवढे मोठे नक्कीच झालो नाही .माझ आई विषयी वाटणारे प्रेम माझ्या प्रत्येक शब्दातून पाझरत जाईल हे नक्की! आई ज्यांनी अनुभवली त्यांना ती कळली ज्यांना आई लाभली नाही त्यांनी ती आई इतरत्र शोधली पण त्यांना हे दोन्ही मिळालं नाही त्यांनी स्वतः आईपण अनुभवावं आणि इतरांना त्याचा अनुभव द्यावा .


           आईच्या उत्कट प्रेमातूनच साकारलेलं *आई प्रतिष्ठान* वाठार निंबाळकर आणि याच प्रतिष्ठानच्या उपक्रमातून जन्माला घातली गेली पुस्तकरूपी आई 📗🙏 मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतून बसली .जेव्हा जेव्हा सत्कार्य घडतं तेव्हा तेव्हा ती आत्म प्रेरणा देऊन बळ देत राहते.पाझर मातृत्वाचा नावही किती समर्पक! प्रत्येक शब्दा शब्दांमधून हरवलेली आई भेटत राहते आणि तिच्यासोबतचे क्षण डोळ्यांवाटे एक एक करत आठवणींच्या वाटेवरून वाहत जातात .आई जरी सोबत नसली तरी हि पुस्तकाई सदैव सोबत राहते .


         प्रत्येकाच्या मनाला भावलेली आई शब्दातून व्यक्त झाली आणि पुस्तकात सामावली .आई हा शब्द विषय एवढा अथांग आणि अफाट आहे की ती कशातच सामावू शकत नाही ज्यांना आपल्या आईविषयी काहीतरी वाटतं त्यांनी ही *पुस्तकाई* वाचलीच पाहिजे. पुस्तकाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत आईच्या प्रेमाचा ओलावा ठासून भरलेला आहे. कुणी आईला शब्दरूप गुंफलं ,कोणी काव्यरूपी ,कोणी चित्ररूपी ,कोणी कर्तव्यरुपी आणि जन्माला आली पाझर मातृत्वाचा घेऊन या *गणेशाची आई* ! हो मी या पुस्तकाला गणेशाची आई म्हणेन !आईला आपणं वात्सल्य सिंधू म्हणतो . या नावासारखचं या पुस्तकाचे संपादक आदरणीय श्री. गणेशजी तांबे यांच्या आईचं नावही *सिंधूबाईंच* ! याचं कुशीतून गणेशजी सारखा हिरा जन्माला आला आणि आईचे ऋण व्यक्त करण्यासाठी आई प्रतिष्ठानची स्थापना केली. पुस्तक जर पाहिलं तर उत्तरार्धात आई प्रतिष्ठानच्या कर्तव्यपारायणाचा लेखाजोखा माहितीस्तव सादर केलेला आहे . पुस्तकाचा *सुवर्णयोग* बघा यामध्ये पहिलीतल्या चिमुरड्या मुलांपासून  ते अबाल  वृद्धांपर्यंत  आणि विषयीचे  प्रेम रुपी शब्द  अवतरले आहेत  या पुस्तकाचे प्रकाशन  तेही  आई प्रकाशनचे ! पुस्तकाची *प्रथम आवृत्ती* आपल्या सर्वांची  ज्ञानमाऊली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिवशी तर *प्रकाशन सोहळा* आपल्या लाडक्या आऊसाहेब ज्यांनी छत्रपती शिवरायांना घडवून आपल्या राज्यातील लेकरांची होणारी आबाळ बंद करून हिंदवी स्वराज्य निर्माण केले त्या राजमाता जिजाऊ साहेबांच्या जयंती दिवशी ! अर्पणपत्रिका ही सिंधुबाई  आणि विश्वातील  तमाम आईंच्या चरणी समर्पित 🙏🌹संपूर्ण पुस्तकचं आईपणाणं भारलेलं आणि ह्रदयात साठवलेलं .म्हणजेच या गणेशाच्या आईच्या रूपात तुम्हाला तुमची आई नक्की भेटेल . सर्वांनी अवश्य वाचावे असे हे पुस्तक .📗🌹🌹


 *आई कुणा भेटेल* 


 *सांगता येत नाही* 


 *पाझर तिच्या मातृत्वाचा* 


 *अविरत वाहत राही .*                     


पुस्तकाचे नाव-पाझर मातृत्वाचा


पृष्ठसंख्या -१२६


 पुस्तकाची किंमत -*१२५ रुपये


आई प्रतिष्ठानच्या कार्याचे फोटो पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी माझ्या ब्लॉगला अवश्य भेट द्या .    

    

https://anjaligodase31.blogspot.com/2021/06/blog-post.html

                          ✍️

*शब्दांकन*-

 *सौ.अंजली शशिकांत गोडसे* 


 *मर्ढे सातारा.*