पौष पौर्णिमा विशेष🌿🌿
*आमचा देव पारधीला गेला* ⛳⛳
*पौष पौर्णिमा विशेष* 🌝🌕
दक्षिण काशी वाई पासून अवघ्या तीन किलोमीटरवर अंतरावर असलेली *पसरणी* हे टुमदार गाव. पसरणी गावात दसरा आणि यात्रा दोन्ही उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरे करतात .पसरणी गावाच्या यात्रेपूर्वी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला गावात आणि गावाशेजारील आजूबाजूच्या गावातील पौष पौर्णिमा म्हणजेच मुदी पौर्णिमा उत्साहात साजरी केली जाते. पौष पौर्णिमेलाच *शाकंभरी पौर्णिमा* असंही म्हटलं जातं .
पौष पौर्णिमा हा हिंदू दिनदर्शिकेत पौष महिन्यात पौर्णिमेला येणारा महत्वाचा दिवस आहे. या दिवशी हजारो भाविक पवित्र गंगा आणि यमुना नद्यांमध्ये स्नान करतात. पौष पौर्णिमा ग्रेगरियन दिनदर्शिकेत डिसेंबर-जानेवारी महिन्यात साजरी केली जाते. पौष पौर्णिमेच्या निमित्ताने प्रयाग संगम (गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम) येथे हिंदू भाविक दूरदूरहून येऊन पवित्र स्नान करतात.
पौष पौर्णिमा संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आणि या दिवशी देशाच्या विविध भागातील हिंदू मंदिरांमध्ये विशेष विधी आयोजित केले जातात. या दिवशी देवी शाकंभरी (देवी दुर्गाचा अवतार) यांची पूजा केली जाते. नऊ दिवस चाललेल्या शाकंभरी नवरात्रोत्सवाची समाप्तीही पौष पौर्णिमेने होते.
अशाप्रकारे ही पौर्णिमा सर्वत्र साजरी केली जाते म्हणजेच आपल्या गावरान भाषेत *पुसाचा महीना* म्हटलं जातं. यावेळेस शेतात रब्बी हंगाम असल्यामुळे हरभऱ्याचे पीक सर्वत्र घेतले जाते .यावेळेस पसरणीमध्ये काळभैरवनाथाच्या मंदिरामध्ये लाकडाचा देव प्रतीकात्मक स्वरूपात बनवला जातो. याच काळभैरवनाथ देवाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते आणि पसरणी गावात शिवारात ज्याला खंडोबाचा माळ किंवा दरा म्हणतात याच शिवारात वाटेवर एक मोठ आंब्याचं झाड आहे त्याला देवआंबा म्हणतात. पौष पौर्णिमेला देव बसवला जातो म्हणून त्या आंब्याला *देव आंबा* म्हणतात हे माझ्या आईकडून समजलं कारण त्याच देव आंब्याच्या खाली आमचं शेत आहे ज्या शेताला आम्ही देवाची पटी असे म्हणतो. या मागचा इतिहास या मुळेच मला समजला. देव आंब्याचे झाड कोणीही तोडत नाही किंवा त्या झाडाचे आंबे ही तोडत नाहीत कारण तो देवाचा आंबा आहे. देवाचे या आंब्यावर एक महिना वास्तव्य असते. म्हणजेच आमचा देव शिकारीला त्यालाच पारधीला गेला असे म्हणतात .या दिवशी घरोघरी नैवेद्याला दही भात केला जातो. याच दही भाताचे मोदकाप्रमाणे मुदया केल्या जातात आणि त्यावर हरभऱ्याच्या पाल्याचा शेंडा रोवला जातो .अशा तयार केलेल्या मुदया घरोघरी शेजारीपाजारी वाटल्या जातात.हे वाटायचे काम घरातील लहान मुलांकडे असते. ही चिमुकली मुले मुदया वाटताना म्हणतात
*दहीभाताचा काला वर हरभऱ्याचा पाला आमचा देव पारधीला गेला*
आम्ही पण लहानपणी खूप मजा करायचो प्रत्येक घरातील मुदीची चव वेगवेगळी असायची . एक एक मुदी वाटताना हळूच आम्हीही एक मुदी तोंडात घालायचो .
देव पारधीला जाणे म्हणजे आमचा देव शेतशिवारात राहून गावावर येणाऱ्या अनिष्ट संकटाचे हरण करून गावाचे रक्षण करतो दृष्ट शक्तींची शिकार करतो अशी पूर्वापार चालत आलेली प्रथा आहे आंब्यावर बसलेला देव माघ पौर्णिमेच्या जिला आपण *नव्याची पुनव* असं म्हणतो त्याच्या आदल्या दिवशी माघ शुक्ल १४ चतुर्दशी ला वाजत गाजत मंदिरात आणला जातो माग पौर्णिमा मेला देवाला नवीन वस्त्र परिधान करून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो . माघ पौर्णिमेच्या नंतर पाचव्या दिवशी *औदुंबर पंचमी* ला पसरणीच्या काळभैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात साजरी केली जाते .अशी ही माझ्या काळीज कप्प्यात राहणारी पौष पौर्णिमा.
✍🏻✍🏻⛳⛳
©️®️ *सौ.अंजली शशिकांत गोडसे शिर्के*
*मर्ढे सातारा*
मस्तच👌👌🙏🙏🙏
ReplyDeleteअप्रतिम काळीज कप्प्याची अनुभूती..
ReplyDeleteKhupch bhari 👌👌👌
ReplyDeleteWonderful 👌👍
ReplyDeleteBest
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूपच छान���� एक जपलेली अनोखी परंपरा..��������
ReplyDeleteछान 👌👌
ReplyDelete👌🙏
ReplyDeleteखुपच सुंदर
ReplyDelete👌👌👍👍👍सुंदर लेखन..
ReplyDelete👌👌
ReplyDeleteखूप छान लेख पोटापाण्यासाठी बाहेर गावी गेल्यावर या सर्व गोष्टींचा विसरून जातो आज या सर्व गोष्टी लक्षात आणुन खूप आनंद होतो आहे धन्यवाद 🙏🚩
ReplyDeleteखुप सुंदर लेखन. 👌👌
ReplyDeleteअशी आपली गावाकडील जुनी पिढ्या न पिढ्या चालत आलेली परंपरा सर्वांना सांगितले बद्दल धन्यवाद.
खुप छान👌
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete