Friday, April 1, 2022

माझे मातीतले पाय 5

 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य📚✒️


पुस्तक परिचय क्रमांक📗-5         *पुस्तकाचे नाव*

               *माझे मातीतले पाय*          

  *लेखक* 

 *प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर*                                                 

*परिचय कर्ता*- *सौ.अंजली शशिकांत गोडसे*

*मर्ढे सातारा*


प्रस्तावना


'माता' आणि 'माती' यांची बूज राखणाऱ्यांच्या अंगी 'प्रतिभा' ही प्रत्येक श्वासागणिक वाढणारी आणि बहरणारी असते. त्याचं 'प्रतिभे'च चित्र भावनारूपी शब्दांमधून व्यक्त होतं आणि त्यालाच कवितेचं देखणं रूप प्राप्त होतं. अशा अनेक काव्यरूपी शब्दमण्यांची एक भावनामय माळ तयार होते. त्या माळेचे आपण जेव्हा जेव्हा अंतःकरणापासून वाचन करतो त्यावेळेस आपल्या मनातील आंतरिक भावनेला साद घातली जाते. तेव्हाच त्यात प्रतिभा ओतप्रोत भरलेली असते. याप्रमाणेच 'माझे मातीतले पाय' या कवितासंग्रहातून कवी प्रा. अरूण कांबळे बनपुरीकर यांनी टिपलेल्या भावविश्वातल्या सुंदर कवितांची गुंफण केलेली आहे. 'ओढ' या कवितेमधून प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर व्यक्त होताना म्हणतात


'तुझ्या शहरीवासाच त्याचा नको रे सहवास


बरी माझी गां पांढरी


माझ्या मातीचा सुवास'


शहरापेक्षा आपलं गावं बरं! माझ्या गावच्या मातीचा येणारा सुवास हवाहवासा वाटतो प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांनी निसर्गातील विविध घटना आपल्या कवितेमधून दृश्य रूपात मांडल्या आहेत. कौटुंबिक नाते संबंधांवरचं त्यांचं काव्यही अतिशय सुंदर रेखाटलेले आहे. 'गावरान चव' या कवितेमधून व्यक्त होताना एका गरिबाच्या घरची ताजी भाजी कशी असते याचं सुंदर वर्णन करताना ते लिहतात -


"गरिबा घरची ताजी भाजी


तेलमिठाने मग जमून


जीभेवरच्या घासाला या


गावरान मग चव देते


शेती-भाती, आई-वडील, यांच्याविषयी लिहताना त्यांच्या मनातील भावनांचा बांध फुटतो आणि त्यातून त्यांची काव्यरूपी अश्रूफुले विविध छटांनी जन्म घेतात. वाचताना वाचकाच्या मनावर त्या भावनांचा आघात होतो. एवढं सामर्थ्य त्यांच्या

प्रतिभाशक्तीत सामावलेलं आहे.


'दुष्काळ' या कवितेमधून व्यक्त होतांना दुष्काळाच्या झळा एका शेतकऱ्याला किती दाहकरीत्या झोंबतात याच समर्पक वर्णन त्यांनी केलयं ते लिहतात.


"शेतात राबणारा बाप माझा


चारा छावणीत जातोय


गुरांना घालत चारा रोज


शिळ्या भाकऱ्या खातोय'


प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या कविता एकाच विषयावर केंद्रित न होता त्यांच्या लेखणीने अनेक विषयांना अगदी अलगद स्पर्श करून वाचकांना एक काव्यमैफिलीची सुंदर मेजवानीच दिली आहे.


सारं जग भाकरीचा चंद्र शोधण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत आहे. पण कवीला मात्र हीच भाकरी भासते ते आपल्या 'भाकरीचा सूर्य' या कवितेमधून व्यक्त होताना म्हणतात.


'भाकरीचा सूर्य गोल


रोज धावतो वेगात


आणि भूक पेटते


काळजांच्या ढगात'


या ओळी वाचताना खरचं पोटाला तिढा पडल्याशिवाय राहात नाही, पावसावरही त्यांनी आपलं काव्य अतिशय समर्पक केलेले आहे. आपल्या 'जीर्ण झालो असलो तरी या काव्यातून त्यांनी जगण्याची उर्मी दाखवली आहे ते लिहतात.


'जीर्ण झालो असलो तरी


फांद्याचे ओझे झेलतो आहे


हिरवळ पाहून अवतीभवती हिरवळीस या भूलतो आहे.


प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या सर्वच कविता अप्रतिम आहेत आणि या कवितेंना प्रतिभेची उंची लाभली आहे. कवितांच्या रूपाने त्यांचं हळवं मनं, मातीतल्या माणसांविषयीचे प्रेम, जीवनाकडे बघण्याची दृष्टी, समाजातील वास्तव त्यांच्या शब्दांमधून व्यक्त झालेलं दिसून येतं. सर्वच कविता अर्थपूर्ण असून रसिकप्रिय आहेत. स्वतः प्राध्यापक असूनही त्यांचे शब्द हे खोल गर्तेत न अडकता अगदी सहज-सोप्या भाषेत त्यांनी आपल्या कवितेचे आकर्षक पैलू निर्माण केले आहेत. 'माझ्या मातीतले पाय' या कवितासंग्रहाप्रमाणे त्यांच्या पायांनी मराठी साहित्याची वारी अखंडपणे चालू देत. त्यांचा कवितासंग्रह सर्व रसिकजनांच्या पसंतीस नक्कीच उतरेल. प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांची लेखणी उत्तरोत्तर बहरत जावो हीच शुभेच्छा !


 *माझे मातीतले पाय* 

 *समीक्षा प्रकाशन* 

 *पृष्ठसंख्या -९६* 

 *पुस्तकाची किंमत -१२० रुपये* 


✒️📚

सौ. अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)

मर्ढे

सातारा



No comments:

Post a Comment