१} वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य.
२} परिचय कर्ता नाव :- सौ.अंजली शशिकांत गोडसे (शिर्के)
३} पुस्तक क्रमांक :- 9
४} पुस्तकाचे नाव :- पसरणी गावची गौरव गाथा
५ } लेखक :- श्री.शिवाजीराव शिर्के
६} प्रकाशक :-प्रवीण प्रकाशन पुणे
७} प्रकाशन वर्ष व आवृत्ती :- 2021 प्रथमावृत्ती
८} एकूण पृष्ठ संख्या :- 104
९} मूल्य 150 :- ₹ फक्त
*पसरणी गावची वाचता गौरव गाथा*
*तिच्या चरणी होतो माझा लीन माथा*
सह्याद्रीच्या कुशीत आणि कृष्णा नदीच्या मुशीत वसलेलं पसरणी हे माझं माहेर . नावाप्रमाणेच चौफेर पसरलेलं आणि वस्ती केलेलं पसरणी हे गाव . घरांची वस्ती चहुबाजूने पसरली तशीच पसरणी च्या नावाची कीर्तीही सार्या जगतात पसरलेली आहे . अजूनही मराठी लोकसंस्कृतीत जागरण आणि गोंधळ घालताना पसरणीच्या भैरीदेवाला आठवणीने जागराला बोलवलं जातं आणि या गीताचे सारे श्रेय पद्मश्री आदरणीय शाहीर साबळे यांना दिलं जातं .
हे झालं लोकसंस्कृती आणि शाहीरीचं तसेचं आधुनिक बांधकाम क्षेत्रात पद्मश्री बी .जी. शिर्के यांचं नावही मोठ्या गौरवाने आणि अभिमानाने घेतले जात . हे नाव उच्चारताच अंगावर रोमांच उभा राहतो तो म्हणजे अभिमानाचा आणि शौर्याचा, कर्तुत्वाचा, कीर्तीचा.
*मा* मातृत्वाचं आणि पितृत्वाचं लेणं
जिथल्या कुशीत मिळतं ते ठिकाणं
*हे* हेवा वाटतो प्रत्येकिला आपल्या बालपणीच्या आठवणींचा
*र* रमतं जिथं मन आणि मिळतो चार दिसांचा विसावा असं हळवं घर
पसरणी गावची गौरव गाथा हे पुस्तक आदरणीय शिवाजीराव शिर्के यांच्या संकल्पनेतून साकार झालेला आहे तसं बघायला गेलं तर गावचा सारा इतिहास आणि गौरव ग्रंथ याला म्हणावे लागेल. अजूनही या पुस्तकात दिवसेंदिवस अनेक हिरे मानके जोडली जातील. असाच गौरवशाली इतिहास या गावाचा आहे .सुरुवातीलाच या पुस्तकासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि आदरणीय खासदार श्रीनिवास पाटील यांचे शुभेच्छा संदेश लाभले आहेत. हा गौरव ग्रंथ लिहिण्यासाठी पसरणी गावातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरिकांनी मदत केली त्यांनाही मानाचा मुजरा याठिकाणी करण्यात आलेला आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गावचे आराध्य दैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचा सुंदर फोटो तसेच श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी देवीची प्रतिमा याठिकाणी छापलेली आहे .गावातील साजरे होणारे उत्सव यांच्या प्रतिमाही पुस्तकात दिलेल्या आहेत. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखकांचा संक्षिप्त परिचय देण्यात आलेला आहे .हे पुस्तक प्रवीण प्रकाशन शिवसुमन फुगेवाडी पुणे या ठिकाणाहून प्रकाशित करण्यात आलेले आहे. या पुस्तकामध्ये एकूण 27 प्रकरण केलेली आहेत आणि त्यामध्ये गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, ठिकाण, महात्म्य, इतिहास यांचा इतिवृत्तांत देण्यात आलेला आहे.
पसरणी गावाचा नकाशा सुरुवातीला त्या पुस्तकात देण्यात आलेला आहे यामुळे पसरणी गावाचे पर्यटन करताना कोणती स्थळ कोणत्या ठिकाणी आहेत हे आपल्याला समजून येते. या गौरव ग्रंथाला प्रस्तावना आदरणीय जगन्नाथ बाबुराव मुळीक सर यांनी आपल्या खास शैलीत दिलेली आहे. तसेच सुप्रसिद्ध लेखक व निवेदक आदरणीय श्रीकांत चौगुले यांनी या पुस्तकासाठी आपला अभिप्राय लिहिलेला आहे.
सातारा जिल्ह्यात, वाई तालुक्यात असलेलं पसरणी हे माझं गाव, सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेलं गाव. ऐतिहासिक इतिहासाने गाजलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेलं, छत्रपती शाहु महाराजांनी, नबाब, रघुनाथ स्वामीला वास्तव्याला दिलेलं, आणि कृष्णा नदीचा परिसर लाभलेलं, सृष्टी सौंदर्याने बहरलेलं माई पसरणी गाव मला फार, फार मनापासून आवडते.
प्राचीनकाळी विराटनगरी, दक्षिण भारताची काशी अशी वाई प्रसिध्दीस आलेले शहर छ. शाहु महाराजांचे मातब्बर सरदार भिकाजीराव रास्ते यांनी • कृष्णातीरावर अनेक मंदिर बांधून पवित्र केलेले शहर. वाई शहराच्या पश्चिमेस ५ किलोमीटर अंतरावर पसरून वस्ती केलेलं पसरणी हे गाव. गावाला व गावच्या वैभवाला इतिहास आहे. गावामधील बहुसंख्य शेतकरी शेतात घरे बांधून वस्ती करून राहिलेले आहेत. गावांत रघुनाथ स्वामींनी बांधलेला रामाचा मठ आहे. गावाशेजारीच काही अंतरावर नबाबाचा बंगला आहे. या बंगल्यातून तो ४२ गावांचा कारभार पाहत होता. आता तो धोम धरणग्रस्तांनी विकत घेऊन त्यात ते राहत आहेत.
पसरणी गावाजवळच असणाऱ्या सोनगिरी व गाव डोंगराच्या घाटातून महाबळेश्वर, पांचगणीला जाणारा रस्ता आहे. वाई शहराची हद्द संपली की, पसरणी घाटाला सुरूवात होते. सुरूवातीलाच पसरणी घाट, वेडी वाकडी वळणे, “वाहने सावकाश हाका!" असा बोर्ड वाचावयास मिळतो. घाट पार करीत असतांना मध्यंतरी बुवासाहेबाचे मंदिर लागते. देवास नमस्कार करून रुपया, आठ आणे
टाकून प्रवासी पुढे प्रवासाला निघून जातात. या बुवासाहेब देवाबद्दल एक आख्यायिका सांगण्यात येते. एक इंग्रज आपल्या घोड्याच्या बग्गीमधून पैसे, दागिने, अनेक मौल्यवान वस्तू घेऊन महाबळेश्वरला चालला होता. त्याने या देवास लाथ मारली आणि पुढे प्रवास करू लागला. घाटातील मोठ्या मोरीजवळ येताच आकाशांत अचानक पावसाचे ढग जमा होऊन जोराचा पाऊस झाला व त्यात तो वाहून गेला. त्याच्या अनेक वस्तू अजूनही सापडतात, असे जुने, जाणकार लोकांकडून सांगितले जाते.
पुढे गेल्यावर डोंगराच्या माथ्यावर सपाट मैदान लागते. यास “थापा” असे नाव आहे. या थाप्यावरून वाई शहर आणि कृष्णानदीचे पात्र, पांडवगड, तसेच धोम धरणाचा सुंदर जलाशय, चमकणाऱ्या मोत्याप्रमाणे दिसतो. पसरणी गावातील घरे काड्यापेट्या विस्कटून टाकल्या प्रमाणे दिसतात. ऊसाची शेती निळसर, लाल तुऱ्यांनी खुलून दिसते. हिरवी, पिवळी भात खाचरे, हिरवेगार डोंगरातून शेतातून जाणाऱ्या पाऊलवाटा दिसतात. "महाराष्ट्राचे काश्मीर" 'म्हणून ओळखला जाणारा महाबळेश्वरचा भाग लाभलेल्या निसर्ग सौंदर्यामुळेच हा परिसर प्रत्येकाच्या मनाला खिळवून ठेवतो.
पसरणी गावाशेजारील गाव डोंगरामध्ये मी लहानपणी शाळेत असतांना शेळ्या, गुरे, बैले चारावयास घेऊन जात होतो. त्यावेळी प्राथमिक शाळा ही माझ्या घराशेजारीच गोपाळराव पानसे यांच्या वाड्यामध्ये भरत होती. नंतर ती मारुती मंदिराशेजारी भरू लागली. कालांतराने गाव ओढ्याजवळच गावकऱ्यांनी मोठी वास्तू बांधली. त्यांत १ ली ते इयत्ता ७ वी पर्यंत शाळा भरते. हनुमान मंदिरा पाठीमागे बारवेची विहिरीच्या ठिकाणी काळभैरवनाथ प्रगटले अशी आख्यायिका आहे.
एवढं सुंदर वर्णन आदरणीय शिवाजीराव शिर्के यांनी आपल्या गावाबद्दल केले आहे .याच पुस्तकात माझे आजोबा शिर्के भाऊ आणि पणजोबा यांचीही शौर्यगाथा लिहिली आहे.
१)पसरणी गावची पूर्वपीठिका
२)गावची मंदिरे-इतिहासाच्या पाऊलखुणा
३)काळभैरवनाथाचे माहात्म्य ४)निसर्ग सौंदर्य लाभलेले पसरणी गाव
५)माझे गाव पसरणी-बी.जी. शिर्के
६)शोध आदर्श व्यक्तिमत्त्वांचा (गावची व्यक्तिमत्त्वे)
७) क्षेत्र पसरणी काळभैरवनाथ माहात्म्य
८) पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे पसरणी गाव
९) पसरणी गावचा सांस्कृतिक इतिहास १०) पसरणी गावची भैरवनाथ यात्रा
११) पसरणी गावचे उज्वल भविष्य
१२) हिंदू-खाटीक यांचे भैरवनाथ श्रध्दास्थान
१३) माझ्या आठवणीतील पसरणी गाव
१४) पसरणी गावची कहाणी
१५)श्री क्षेत्रपाल भैरवाचे वैभव
१६) पसरणी ग्रामपंचायत माहिती
१७) गावातील पतसंस्था, ट्रस्ट, संस्था
१८) विकास सेवा सोसायटी- गावच्या विकासाची गंगोत्री १९) पसरणी गावची माहिती - काव्यात
२०) महाराष्ट्र राज्य माहिती
२१) गावची आदरणीय प्रभावी व्यक्तीमत्त्वे
२२)एक सत्यशोधकी कार्यकर्ता-वरखडे गुरूजी
२३) प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व- प्रदीपकुमार महांगडे
२४) पसरणी गावची ठळक वैशिष्टे
(२५) गावचा अभिमान-अभिनेत्री अश्विनी महांगडे
२६) पसरणी गावच्या यात्रेचं महत्व
२७)भैरवनाथ विद्यालय पसरणी जन्मकथा
एवढी विस्तृत माहिती या पुस्तकात देण्यात आलेली आहे ही सारी माहिती संकलित करण्यासाठी ज्यांनी मदत केली आहे या सर्वांचे शेवटी विशेष आभार मानण्यात आलेले आहेत यामध्ये गावातील सर्वांचा समावेश करण्यात आलेला आहे खरोखरच अभी अभिमान वाटावा अस माझं माहेर आणि असं हे पुस्तक साहित्य नगरी प्रसिद्ध होईल आणि गौरव गाथा दस देशातून सदोदित निनादत राहील सर्वांनी वाचावे समजून घ्यावं असे हे पुस्तक मी वाचलेले पुस्तक आणि थोडक्यात त्याचे परीक्षण याठिकाणी केले माझ्या परीक्षणापेक्षाही खूप मोठं गाव आणि त्यातील माणसं . या सर्वांना पुन्हा एकदा माझा हृदय पुर्वक मानाचा मुजरा.
🌹 *माहेर माझं पसरणी*🌹
माझ्या माहेराची वाट
झाडी हिरवीगार दाट
आठवते मला नित्यरोज
माहेराची रम्य पहाट
पाखरांची होते किलबिल
मंदिरात ढोलताशांचा नाद
घरोघरी प्रज्वलीत चूल
मंजूळ वारा घालतो साद
माझ्या माहेराला आहे
कृष्णाबाईचा भव्य काठ
साऱ्या जगतात आहे
माझ्या माहेराची मान ताठ
चौफेर पसरली आहे
माझ्या माहेराची अमृत वाणी
त्यावरूनच नाव गावाचे
निसर्गरम्य माझी पसरणी
माझ्या माहेराला आहे
मोठा ऐतिहासिक वारसा
दिमाखात उभा आहे
नबाबाच्या बंगल्याचा आरसा
उद्योगपती शाहीरांनी
पसरवली माहेराची किर्ती
दोन पद्मश्री असलेले
पहिल गाव माझं सत्कारमूर्ती
पांचगणी महाबळेश्वरला जाणारा
भव्य दिव्य पसरणी घाट
माझ्या माहेराचा दाखवतो
सुखसमृद्धिचा थाट
साऱ्या पंचक्रोशीत भरतो
माहेराचा मोठा दसरा
नाथसाहेबांच्या भक्तीरसात
आनंदून जातो गावसारा
माझ्या गावची यात्रा
जपे साहित्य संस्कृतीचा वारसा
नव्या युगातील घडतो तिथे
मायावी नगरीचा जलसा
परक्या मुलुखात राबतो
माहेराचा माझ्या कष्टकरी हात
वाट पाहतो त्यांची
जन्मदायी माता आणि तात
लक्ष ठेव साऱ्या गावावर
जागृत देवा माझ्या भैरोबा
सुखासमाधानाने नांदू दे
घराघरातील घरोबा
पून्हा पून्हा जन्मा यावे
पसरणीआईच्या काळया कुशीत
जीवन आपले सार्थ करावे
जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात
✍🏻 *अंजली गोडसे( शिर्के)*✍🏻
*मर्ढे ( सातारा)*







