चिंपांट....!!*
पहाटेचं झुंजू मुंजू नुकतंच झालं होतं. कोंबड्यानं बांग देऊन आपलं चोख नित्य काम बजावलं होतं..
हळूहळू बाहेरील अंगणात चुली पेटल्या होत्या. तर कोणाचे पाण्याचे बंब. मधूनच कुत्र्यांचा अळोखेपिळोखे देत आवाज सुरु झाले. तर झाडांवर पक्षांचा किलबिलाट होत होता.
नुकतंच पूर्वेकडे तांबडं फुटलं होतं. गोट्यात गाय, म्हैस, शेळ्यांची चुळबुळ, बायाबापड्या, गुरांची धार काढण्यात मग्न तर माणसं उठून चुलवाणासमोर बसून तंबाखूचा बार तोंडात भरत,तर बाया बापड्या मिश्रीचा तोबरा एक बोट हिकडं तर दुसर बोट तिकडं करीत भरीत होत्या.
प्रत्येकाला सकाळच्या प्रातर्विधी कामाला जायची गडबड.. पोरंबाळं तर अजून अंथरुणावरच लोळत होती. समदीकडं निसर्ग जागा व्हायला लागला व्हता, लेकराबाळांचाबी गलका ऐकू यायला लागला. दोन चार घरं सोडली, तर काहीतरी विचित्र घडल्यागत आवाज कानी येत होता.
बाळी आपली डोळयावरील झापडं चोळत अंथरुणातच गुरगुटून हिकडून तिकडं अन तिकडून हिकडं कूस बदलत हलत होती. पण सकाळची शाळा म्हणून मग डोळं चोळत उठून अंथरुणावरच बसली तोच बाहेरील आवाज अधिकच वाढला होता. तिने दरवाजातून बाहेर जरा डोकावून पाहिलं. तर चांगल्या ठेवणीतल्या शिव्या कानावर पडल्या, अग बया बया,..आता..काय खरं नाय..असं म्हणत हिथच अडकवलं व्हतं, गेलं कुठं कुणी नेलं .. म्हणून शिव्यांचा बार सुरू होता.
घराघरातुन एकच सूर ऐकायला मिळत होता. काय झालं व्हतं तर माणसांना सकाळच्या कामासाठी लागणारी घरामगाची सर्व चिंपाटं अचानक गायब झाली व्हती. दोन चार घरातली फक्त तेवढीच खिळ्याला लटकवलेली दिसत व्हती. काय झालं असेल त्यांच्या चिंपाटांना ? सगळीच विचार करीत व्हती. बाळी आपलं शाळेचं उरकून मैत्रिणीच्या गोतावळ्यात शाळेकडं निघाली मनातल्या मनात हास्याच्या उकळ्या फोडत खदखद हसत शाळेचा रस्ता धरला. आणि मग कालचा प्रसंग मनी आठवला *कुठं* *गेली हि ' चिंपाट. " ???*
शोधली तर पाहिजेत ना !
गावाकडच्या या सगळ्या मित्र मैतरणी एकत्र सुट्टीत खूप मज्जा करायच्या . आया, बाया, शेजारानी, एकीमेकींना जीव लावायच्या दुखलं खुपलं बघायच्या लई एकी सगळ्यामधी कोणतंच काम एकटं करणं या मैत्रिणींना जमत नव्हतं;
सारखा गोतावळा जाईल तिथं संगतीने शाळेत जाताना रानात जाताना एवढंच काय ? पण दोन नंबरला जाताना सुद्धा बरोबरच पण या कार्यक्रमाला दोन नंबर आणि पहिल्या कार्यक्रमाला एक नंबर का ?
याचा अजून उलगडा काय झालाच नाही ..!
पामतेलाचे मोकळे डब्बे, रंगाचे डब्बे, याचा वापर दोन नंबरच्या कामाला पाणी नेण्यासाठी केला जायचा, त्याला चिंपाट म्हणायचे. प्रत्येकाच्या घराच्या मागे खिळ्याला अथवा खुंटीला चिंपाट अडकवलेलं असायचं, ज्याच्या घरात माणसं जास्त तिथं चिंपाट जास्त,
कोणाची गडबड नको व्हायला बया..!
यासाठी डब्बे वापरले जातात. त्यामुळे गोऱ्या लोकांनी teenpot म्हणून नाव ठेवलं असावं आमच्या मराठमोळ्या माणसांनी teenpot चं चिंपाट केलं असेल..
चिंपाट मात्र आकाराने वेगवेगळी कुणाचं बारीक तर कुणाचं मोठं असू द्या पण घरातील खूप उपयोगी वस्तू नाही. वेळेला सापडलं नाही तर तांब्यावर काम भगवायचं पण खरंच सासुरवाशीण चिंपाट घेऊन गेल्या कि मनमोकळ्या गप्पा मारायच्या उनी धुनी काढायला बिचाऱ्यांना तेवढाच वेळ, विसावा घ्यायला.
गडी माणसे गप्पा मारायला याच निमित्ताने जाणारी तरुण पोर तरण्या पोरी चिंपाट घेऊन लांब लांब जायची अन मग प्रेम प्रकरण वाढायची त्या वयात कुणाला काय कळतंय खरंच त्या चिंपाटाला बोलता येत असंत तर अनेक रहस्य उघडकीस आली असती..!
लई झालं चिंपाट पूरान खरी मजा तर पुढे हाय... तो रविवारचा दिवस होता. शाळकरी पोरींना सुट्टी शेजारची बाय, अनी, रुपी, चिमी, बाळी, घट्ट मैत्रिणी त्यात बाळी लई हुशार सगळ्यांची लीडर आज्याच्या नावाच्या घुगऱ्या खाल्यागत सगळीच तिला ओळखायचे तिचा अज्जा सर्व गावातच प्रसिद्ध होता.
सुट्टीच्या दिवशी नुसतं हुंदडायचं उद्योग करायचे कमी आणि वाढवायचे जास्त हे बाळीच्या ग्रुपच ठरलेलंच. घरच्यांच्या डोक्याला ताप रानातली काम करायला घरातली लोक येरवाळीच रानात पोचली व्हती. या पोरींना काय सर्व रान मोकळचं दुपारपर्यंत सगळ्या जणींनी, हुंदड हुंदड हुंदडल्या, तो पर्यंत गावात टंन टन आवाज ऐकू आला. बाळीसाहित सगळ्या पळत रस्त्याकड गेल्या.
पहातात तो काय ' बुड्डीकमाल" विकणारा होता.
बहुतेक सर्वांनीच खाल्लाय प्लास्टीकच्या कागदातला मऊ मऊ सशा सारखा दिसणारा लुसलुसीत गुलाबी हा गोळा सायकलवर लटकलेलं दिसला की, तोंडाला पाणी सुटलंच. !
अन गुटक्या गिळायला सर्व पोरींनी सुरवात करीत एक कटाक्ष टाकीत एकामेकींकडे पाहिलं.
फक्त पन्नास पैसे पण सर्वांचे मोकळे खिसे, ते गुलाबी गुलाबी रंगाचे कापसाचे गोड गोळे, आता काही चैन पडू देत नव्हते. काय होतं माहितेय का ते ? ते तर व्हतं. "
*बुड्डीकामाल ;* सगळ्यात आवडतं लहानग्यांचं नाही मिळालं तर रुसून बसायचं, आई बापाकडे पण कुठला आलाय पैसा..!! आता पैसे नाय मग कसा घेणार गुलाबी गोळा, ' बुड्डीकामाल; वाला तर म्हणे पोरीनो पैसे आना नाहीतर भंगार आता झाली ना पंचाईत, म्हणजे पैसा नसला तरी भंगार बी चालत हुतं, आत्ता करायचं काय! ?
या सगळ्यांत बाळीच पुढारीन तिचं डोकं सुपरफास्ट चालायचं कारण महाउद्योगी बाळ म्हणून फेमस होती.. डोक्यात सन्न झालं,तशी बाळीची ट्यूब पेटली, सर्व घरांच्या आळवंड्या धुंडायला सुरवात झाली. बाळी पुढं मैत्रिणी मागं,असा हा लवाजमा फिरत होता,पण भंगार कुठंच मिळालं नाय.!
प्रत्येकाच्या घरामागं शोधलं. एक खिळा सापडला तर शपथ .! शोधून शोधून दमल्या बिचाऱ्या. पण जिद्द सोडली नव्हती त्यांनी आणि मग *काळ्या कोळशात हिरा* *सापडावा तसा* *बाळीला खिळ्याला* *लटकवलेलं पत्र्याचं चिंपाट* दिसलं आणि तिच्या एकदम डोक्यात ट्यूब पेटली.. !
तिने सगळ्यांना एकत्र गोळा केलं. दुपारी कोणीच घरी नव्हते, पटापटा घरामागची सगळी चिंपाट गोळा केली. प्रत्येकीने स्वतःच्या घरातली तेवढी घेतली नाहीत. " तेवढी बाळी हुशार होती. ; तिनं फक्त आळीतील स्वतःचं व मैत्रिणीची घरं सोडुन देत बाकीच्या घरांतील सर्व चिंपाट गोळा केली होती..
चिंपाट तशीच बुड्डीकामाल वाल्याला दिली तर ती ओळखून येणार म्हणून
एक आयडीया केली, आता सर्व चिंपाट एकत्र करीत सगळ्यांनी त्याचा दगडांनी लगदा केला. सर्व सर्व चिंपाट आता चिंबून त्याचा पत्रा तयार झाला होता. बाळीच्या ग्रुपने तो पत्रा उचलून बुड्डीका मालवाल्याला दिला. ज्यासाठी हा उद्योग केला त्या गुलाबी कापसाच्या पिशव्या आमच्या हातावर ठेवल्या होत्या. त्या घेऊन आम्ही धुमचकाट घरामागच्या रानात शाळात जाऊन त्याचा फडशा पडला होता.. पिशव्या तिथंच टाकून पुन्हा घराकडे वळलो..
चिंपाट फोडल्याची कसलीच सल मनी नव्हती..तर बुडडीकमाल खाल्ल्याची तृप्ती पोट भरून होती..!!
*लेखप्रपंच*
*सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)*
*मर्ढे*
No comments:
Post a Comment