मी अशी घडले
दिवस हे पाखरांसारखे असतात. भूर्रकन उडून जातात. आणि उरतात फक्त पिस, आठवणीची काही काळी, काही पांढरी, काही रंगीत, काही मऊ, काही खरबरीत खरं तर ही प्रिसव जपून ठेवायची असतात आणि ती गुंफून तयार करायची असते चटई आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बनण्यासाठी अशाच माझ्या जीवनातल्या माता घडवणान्या कडू गोड आठवणी, आशा निराशेचे क्षण मी शब्दरूपाने साकारत आहे. माझे शब्द आलंकारिक किंवा जड नाहीत. मनाच्या पडद्यावर जे उमटले तेच रेखाटन गेले. खेड्यातल्या प्रत्येक सामान्य मुलीच जे भावविश्व आणि जगण असत तेच माझंही होतं. त्यात असामान्य आणि जगावेगळ अस काहीच नाही. सहयाद्रीच्या कुशीत आणि दक्षिण काशी म्हणून
समजलं जाणाऱ्या वाई तालुक्यातील कृष्णा नदिच्या मुशीत वसलेल पसरणी' हे माझं गावं येथे भल्या पहाटे भैरवनाथाच्या आरतीसाठी वाजणाऱ्या ढोलाच्या आवाजाने जाग येते.
शिर्के घराण्यात माझा जन्म३१जुलै१९८२साली झाला.
माझ्या जन्माच्या अगोदर माझ्या पणजोबांनी वाघ मारल्याची आख्यायिका ऐकायला मिळायची. आजोबा वारकरी पंथातील असल्यामुळे घरातील वातावरण सकाळपासूनच विठ्ठलमय होऊन जायचं. रोजचं ऐकून ऐकून हरीपाठ, पसायदान तोंडपाठ झालेलं होत. माझ्या आजीचे नाव 'मंजूबाई, आजोबांचे नाव 'गणपत, वडिलांचे नाव प्रभाकर आणि माझ्या आईचे नाव 'चंद्रभागा 'होते घरची परिस्थिती बेताचीच असल्यामुळे माझे वडील कामा- करीता बाहेरगावी जायचे. मी आणि माझे दोन मोटे नाऊ आई. वडील, आजी- आजोबा असा आमचा परिवार. दोन भावांच्या पाठीवर नको असताना झालेल असे आम्ही कन्यारत्न पण शेंडफळ असल्यामुळे सर्वांनी माझा खूप लाड केला. माझ्या आजीनेच माझं नाव 'अंजली' ठेवल. बारसे तरं झालचं नाही. एक चुलता आहे पण असून नसल्यासारखा. आमच्याकडे त्याने कधीच लक्ष दिले नाही स्वताचा संसार आणि मुले एवढंच पाहिले.
आमचे आजोबा ह भ प व गावातील पुढारी असल्यामुळे त्यांच्या नावानेच आमची ओळख व्हायची 'शिक भाऊंची नात' आजोबांचे आमच्या शिक्षणावर खूप लक्ष होते. ते नेहमी म्हणायचे शिक्षणाला पर्याय नाही त्यांच्या प्रेरणेनेच उ पहिलीपासून शाळेतील प्रथम क्रमांक कधीच सोडलेला आठवत नाही आजोबांनी पहिलीपासून साठवून ठेवलेली प्रगती पुस्तक अजूनही माझ्या संग्रही आहेत भावंडाच्यात तीन नंबरला असल्यामुळे कायम त्यांची जुनी पुस्तके वापरली. वापरून शिल्लक राहिलेली वहीतील पाने शिवून नवीन वह्या तयार केल्या शाळेचे शर्टपण त्यांचेच घालायचे. खरोखरच.
भावनांना कागदावर उमटवणे तितकेसे सोपे नसते अश्रूंना लपवण्याइतके ते सुद्धा कठीण असते.
प्राथमिक शिक्षण गावातीलच 'जीवन शिक्षण विद्या मंदिर' म्हणजे आत्ताच्या जि. प. प्राथमिक शाळेत अले बालवयात सौ .कुलकर्णी मॅडम यांनी चांगली शिस्त लावली. वर्षात हुशार असल्यामुळे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला मला बसवायच्या. कधी कधी सणाला मला स्वतःच्या घरीसुद्धा घेऊन जायच्या. त्यावेळेस कसली गाईडस आणि कसल्या नोटस बाई शिकवतील तेच खरं. चौथीनंतर गावातीलच रयत शिक्षण संस्थेच्या श्री भैरवनाथ विद्यालय यामध्ये इ. ५वी ला प्रवेश घेतला त्यावेळी ५ वी पासून "इंग्रजी' हा विषय होता- हायस्कूलच्या शिक्षकांनीही अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. श्री भोसले सरांमुळे इंग्रजी विषय अतिशय चांगला झाला स्पेलिंग पाठांतर नसल्यास उलट्या हातावर छड्या पण माझ्यावर ती प्रसंग कधीच ओढावला नाही. रयत शिक्षण संस्थेत गुरुकुल- मध्ये हुशार मुलामुलींची निवड केली जायची. पण मी मुलीची जात बाहेरगावी राहणार म्हणून मला गुरुकुलला पाठवलं नाही. पाठवलं असतं तर आज मी निश्चितच चांगल्या पदावर गेले असते.... हे सगळे नंतर कळले त्यावेळेस काही समजत नव्हत घरच्यांनाही त्याच काही गांभीर्य नव्हतं. माझी चित्रकला चांगली असल्यामुळे रांगोळी, चित्रकला स्पर्धेतील पहिला नंबर कधीच सोडला नाही. आमच्या चित्रकलेच्या सौ. पाटील मॅडमनी मला एलिमेंटरी व इंटरमिजीएट परीक्षांना बसवून यशस्वी केले या परीक्षेला वाईला जाव लागत असे त्यावेळी शहरातून आलेल्या मुलांकडे त्यांच्या चित्रकलेच्या साहित्याकडे आम्ही मोठ्या कुतूहलाने पाहायचो कारण आम्ही ते विश्व कधीच. अनुभवलेल नव्हते.
खेड्यातील राहणीमान असल्यामुळे शेजारच्यांना माझ्या शिक्षणातली प्रगती कधीच आवडली नाही मला अजूनही मी आठवीत असतानाचा एक प्रसंग आठवतो दुसऱ्या दिवशी २६ जानेवारी असल्यामुळे शाळेचा गणवेश धुवायला टाकला होता आम्ही सर्वजन रंगीत कपडे घालून शाळेत गेलो होतो . आईने शर्ट व स्कर्ट स्वच्छ धुवून अंगणात जळणाचे पेटे ठेवले होते त्यावर सुकत घातला होता. माझ्या आळीतल्या मैत्रिणींचेही शर्ट तिथे ऊन लागत असल्यामुळे सुकत घातले होते. संध्याकाळी मी इस्त्री करण्यासाठी अंगणातील शर्ट आणण्यासाठी गेले आणि बघते तर काय माझ्या शर्टवर विघ्नसंतोषी अशा कोणीतरी हळद पाण्यात कालवून ओतली होती. हा सगळा प्रकार पाहून मी खूप मोठ मोठ्याने रडायला लागले आईने समजावलं, सगळ्यांनी समजावलं पण उद्या कपडे कोणती घालायची ? सर्वासमोर भाषण करायचं होतं. नवीन शर्ट आणण्याची ऐपत नव्हती आणि वेळही नव्हती. शेवटी आईने माझ्या गुरू मामाच्या घरी जाऊन त्याचा गठुड्यात बांधलेला शर्ट काढून आणला आणि घालायला दिला म्हणतात ना,
'जीवन किती खडतर आहे अनुभव तुला देत जाईल प्रयत्न करायला विसरू नको मार्ग तुला सापडत जाईल. '
घरातली कामे करून खूप खूप अभ्यास केला सुट्टीच्या दिवशी गुरे घेऊन डोंगरात जायचो लाकडे व शेणाची वाळलेली खांडे गोळा करायची कुणाची जास्त होणार याची स्पर्धा लावायची दिवाळीनंतर शाळेची सहल निघायची त्यामुळे घरच्यांना त्रास न देण्यासाठी दिवाळीच्या सुट्टीत दुसऱ्याच्या शेतात भांगलण करून पैसे मिळवायचो व सहलीला जायचो. आमची आजी आम्हाला नेहमी म्हणायची, " तुमच्या संपत्तीची वाटणी होते पण तुम्ही घेतलेल्या ज्ञानाची कधीच वाटणी होऊ शकत नाही. त्यामुळे भरपूर अभ्यास करा व शिका." हे तिचं वाक्य अजुनही माझ्या मनात घर करून आहे त्यामुळे मी माझं शिक्षण कधीच सोडले नाही दहावी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. आईला नेहमी वाटायच की मी
इतर मुलीप्रमाणे शिवणकाम शिकावे त्यामुळे तिच्या समाधानासाठी मी दहावी नंतर शिवणकामाचा तास लावला. पहिला ब्लाऊज आईसाठी शिवला तो तिने घातल्यावर तिला गगन ठेंगण झाल्यासारखे झाले आणि मलाही. शाळेमध्ये हुशार असल्यामुळे वडील र आजोबा यांना मी घरी राहणं पसंत नव्हते म्हणून यांनी आईच्या परवानगीने मला वाईच्या किसनवीर कॉलेज मध्ये घातलं. पण आईच्या आवडीसाठी मी माझ शिवणकाम चालूच ठेवल
कॉलेज जीवन काय असते याची काहीच माहीती नव्हती शाखा कोणती घ्यावी हेही समजत नव्हतं जिता व पूनम या दोन मैत्रिणींच्या सांगण्यावरून कला शाखेला प्रवेश घेतला. या दोघी अतिशय जीवलग मैत्रिणी झाल्या ज्यांच्यामुळे माझ्या जीवनाला खरी कला- टणी मिळाली. त्यामुळे त्यांच्याविषयी नेहमी वाटत -
आई म्हणजे
भेटीस आलेला देव
पती म्हणजे
देवाने दिलेली भेट मित्रमैत्रिणी म्हणजे
देवालाही न मिळणारी भेट
निता व पूनमच्या घरची परीस्थिती चांगली व सर्व सुशिक्षित होते. प्रत्येक गोष्टीत मला मदत करायला त्या सदैव तयार असायच्या मला करीअरचा मार्ग त्यांच्यामुळेच मिळाला. नाहीतर मी प्लेन BA च झाले असते. १२ वीची परीक्षा चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. निताच्या तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून आम्ही डी. एड चा फॉर्म भरायचे ठरवायें यामध्ये इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण असेल तर 3 गुण जास्त धरत होते माझे ते प्रमाणपत्र हायस्कूलमध्येच होते बऱ्याच वेळा पाठपुरावा केला तरी मिळत नव्हते. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आली निताने आधी मी शाळेत फोन केला तर. कपाटांचा नवीन क्लार्कने चार्ज घेतला नाही.
अशी उत्तरे मिळाली. मुख्याध्यापकांनी नंतर तर फोन उचलून बाजूला ठेवला. निता आणि मी STD बुथमधून तड़क पोलिस स्टेशनला गेलो. आम्ही रडत असल्यामुळे सर्वजण आमच्याभोवती जमले. आम्ही घडलेली हकीकत सांगितली त्यावेळेस शाळा सुटण्याची वेळ झाली होती. त्यामुळे फौजदाराने एका हवालदाराला छोट्या गाडीवर पुढे शाळा बंद न करण्यासाठी पाठवले. सर्व स्टाफला थांबवून ठेवण्यात आले होते. आम्ही पोलिसगाडीतून हायस्कूलवर पोहोचलो. एरव्ही फोनवरून उडवाउडवीची उत्तरे देणारे मुख्याध्यापक आमची प्रेमाने विचारपूस करत होते .कपाटाचे कुलूप फोडून त्याचा पंचनामा करून मला एकदाचे सर्टीफिकेट मिळाले. गावात आमची सर्वत्र चर्चा सुरू आली. अशा प्रकारे संकटाशी सामना करून आम्ही डी. एड चा फॉर्म भरला. झगडल्याशिवाय कधीच काही मिळाल नाही. पण खरचं
जे घडतं त्यातून आपल्याला एक मार्ग मिळती मिळालेल. मार्ग आपल्याला जीवनाची दिशा दाखवतो
अखेर डी. एड. ची गुणवत्ता यादी लागली. माझे नाव पहिल्याच यादीत होते. नंतरच्या यादीत मैत्रिणीची नावे आली. अँडमिशन घेण्यासाठी औरंगाबादला जावे लागले. त्यावेळेस वडील खूप आजारी होते. तरीही ते माझ्या बरोबर आले . लांबच्या प्रवासामुळे त्यांच्या पायावर सूज चढली. तिथे गेली तर समजल की, मुलाखतींना स्थगिती आली आहे. रास्ता रोको केल. घोषणबाजी केली. पण सार काही व्यर्थ. विनाकारण खर्च व त्रास झाला .पण आम्हाला अस सहजा सहजी काहिच मिळणार नव्हते. पुन्हा तब्बल एक महिन्याने औरंगाबादला जाऊन अॅडमिशन घेतले. व जिजामाता अध्यापक कॉलेज, सातारा येथे प्रवेश घेतला. हॉस्टेलला राहायची ऐपत नव्हती मग रोजचा प्रवास सुरू झाला. कॉलेजची शिस्त अतिशय कडक होती. शनिवारच्या कॉलेजला यायला खूप त्रास व्हायचा. वडील आणि मी सकाळी ५ वाजता पसरणीहून वाईपर्यंत चालत यायचो . कारण घरात गाडी नाही. एवढ्या सकाळी कोणाची गाडी मिळणार ना. पण मनात जिद्द होती खूप खूप शिकण्याची म्हणतात ना -
" मंजिले उन्ही को मिलती है जिनके सपनों से जान होती हैं। पंख होने से कुछ नहीं होता
होसलों से ऊँची उड़ान होती है।'
कॉलेजचे एक दोन महीने गेल्यानंतर आमच्याच नात्यातल्या एका शिक्षक मुलाचं स्थळ माझ्यासाठी आल. त्यांचं गाव साताऱ्याच्या शेजारी होते. माझे आजोबा व वडिलांनी विचार केला की स्थळही चांगलं आहे आणि पोरीला तिथून कॉलेजला जायला सोप पडेल. झालं सगळ्या मैत्रिणीच्या लग्नाच्या आधी आमच्या लग्नाचा बार १८ वर्षे १० महिने वय झाल की वाजला. १५ मे २००१ रोजी लग्नसोहळा दारातच वडिलांच्या ऐपतीप्रमाणे पार पडला. सासरच्या मंडळीकडून आजोबांनी शिक्षण पूर्ण करण्याचे वचन घेतले होते .आमचा संसार आणि शिक्षण सुरू झाले आणि खऱ्या अर्थाने एक स्त्री असल्याची जाणीव व्हायला सुरुवात झाली. माझं मन मला नेहमी म्हणायचं-
नको रडू
स्त्री जन्मा तुझी कहाणी म्हणत तू
शोध घे स्वतःचा
एक नवीन कहानी लिही तू '
कविवर्य बा. सी. मर्ढेकर यांचे गाव, कृष्णा नदीच्या ' तीरावर वसलेलं 'मर्ढे' हे माझे सासर, गावात एस. टी.ची सोय नाही. माझे पती कोल्हापूरला नोकरीला. आठवड्यातून एकदाच सुट्टीला घरी येणार . घरात आजसासू, सासू -सासरे, चुलत सासू-सासरे, चुलत दीर, मोठे दीर-जाऊ, पुतणी एवढा मोठा परिवार. घर फक्त ७ खणांचं. येता जाता माणसं एकमेकांना धडकायची. पसरणीतील घर मोठ असल्यामुळे माझी घरात खूपच कसरत व्हायची. मर्ढे गांव घोशा पद्धतीचे असल्यामुळे डोक्यावरून पदर घेऊन घरातून बाहेर पडावे लागे. कॉलेजला ड्रेसचा दिवस असला की. ओढणीही डोक्यावर घेऊन जावे लागत होते. एस. टी. साठी मर्ढे ते आनेवाडी दिड किलोमीटर चालायला लागायचे. पावसाळ्यात खूप पाऊस झाला आणि नदीच्या पुलावरून पाणी आले की, आमची वरात खडकी गावाच्या पुलावरून निघायची. किती ही अडचणी आल्या तरी डगमगायच नाही अशी जिद्द मनी ठेवली होती.
इरादे अगर नेक हो तो. सपने भी साकार हो जाते हैं।
मन में अगर सच्ची मेहनत की चाह हो
तो रास्ते भी आसान होते हैं।
मान मोडेपर्यंत खूप खूप अभ्यास केला. पहाटे 2.30 ते ५ वाजेपर्यंत अभ्यास करायचा. घरातल आवरायचं आणि कॉलेज गाठायचं. परीक्षाच्या दिवसात तरी काम करायचं अगदी जीवावर यायचं पण निभावून नेल सारं. चपाती, भाकरी करत करत पुस्तक वाचायची. का तर आपला वेळ वाया जावू नये, रस्त्याने जाता येताना, वाचण्यासाठी महत्त्वाचे मुद्दे हातावर लिहून घ्यायचे .कारण इतर मुलीपेक्षा मला वेळ कमी मिळत होता .म्हणूनच मिळालेल्या वेळेचं सोनंच करायच ठरवलं होत. कधी मनात काही विचार आलेच तर माझ्या सर्व पुस्तकांवर मी संत तुकाराम महाराजांची पुढील वाक्ये प्रेरणेसाठी लिहिलेली होती-
असाध्य ते साध्य । करीता सायास
कारण अभ्यास ।
तुका म्हणे ॥
अखेर माझ्या कष्टाच सोनं झाल .डी.एड् . चा निकाल लागला. फक्त १ गुणांनी माझा १ ला नंबर जाऊन दुसरा नंबर कॉलेजमध्ये आला. यानंतर शिक्षकांच्या भरतीची जाहिरात वाचून सातारा जिल्हा परिषदेचा अर्ज भरला. मुलाखतीचा कॉल येईपर्यंत घरातील, शेतातील काम केली. गावातील शाळेत शिक्षक रजेवर असताना अध्या- पनाचे कामही केले. त्यावेळेचे विद्यार्थी भेटल्यानंतर अजुनही मान देतात. ४ डिसेंबर २००४ रोजी सातारा जि. प. मध्ये मुलाखत झाली वाई तालुक्यातील कोचळेवाडी या शाळेत उपशिक्षक म्हणून नियुक्ती झाली. मांढरदेवच्या काळुबाईच्या छत्रछायेखाली माझं शिक्षक व्यक्तिमत्त्व बहरून नावारूपाला आले. द्विशिक्षकी शाळा असल्यामुळे शाळेशी निगडीत सर्व बाबींची माहिती झाली. निष्ठेने आणि कष्टाने केंद्रात शाळा १ नंबरला आली. त्यावेळेचे सातारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री जगदीश पाटील यांनी आमच्या कामाच कौतुक केले. डोंगराळ भागातील शाळा असूनही मुले खूपच हुशार आहेत असे प्रत्येकाचे म्हणणे होते. नोकरीची जबाबदारी सांभाळत सांभाळत एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पत्रकारीतेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण करून कॉलेज- मध्ये पहिली आले. शाळा व्यवस्थापन पदविकेमध्येही कॉलेजमध्ये पहिली येण्याचा मान मिळाला. लढायचं आणि खूप शिकायच हे ठरवलं होतंच.
वाई तालुक्यातून विनंती बदलीने जावली तालुक्यात आले. माझं मोठ भाग्य म्हणून मला कापसेवाडी ही मोठी शाळा मिळाली. आश्रमात राहणारी मुले या शाळेत शिकण्यासाठी येत होती. या मुलांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्या अनाथ, गरीब, होतकरू मुलांची आम्ही सर्व शिक्षक माय झालो. म्हणतात ना....
भरवी घास इवलासा तिच्या मायेची रीतच न्यारी
स्वतः उपाशी राहूनही
लेकरास ठेवी आहारी.....
आम्ही सर्वजण मिळून त्यांच्यासाठी पैसे गोळा करून वेगवेगळे उपक्रम राबविले. मुलांच्यात खिलाडू वृत्ती चांगली असल्यामुळे खेळाच्या माध्यमातून शाळा नावा- रूपाला आणली. पण या मुलांची जास्त सेवा करणे नशिबात नसल्यामुळे प्रशासकीय बदली होऊन सोनगांव शाळेत हजर झाले. सन २०१५-१६ चा पंचायत समिती जावलीचा 'आदर्श शिक्षक पुरस्कार' याच शाळेत मिळाला .
आपल्या शालेय जीवनातल्या गुरुजींना बाईना आपण कधीच विसरत नाही. बाई, मॅडम होण्याचं भाग्य मला मिळालं. जीवंत कलाकृती यशस्वीपणे घडवण्याच बळ मला चिरंतन मिळो एवढीच इच्छा आहे .मला खेळाची आवड असल्यामुळे शिक्षकांच्या सर्व क्रीडास्पर्धेत भरपूर बक्षीसे मिळवली. खो खो, कबड्डी , दोरउडी खेळाची राज्यपंचपरीक्षा ही चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाले. महिला पंच म्हणून अनेक सामने खेळविले. यावेळेस खरच असे वाटले-
आपली संकटे ही आपली ओळख
असता कामा नये.
आपला झगडा ही आपली ओळख
असता कामा नये. आपल यश हीच आपली ओळख असली पाहिजे.
सोनगाव शाळेतून माझी बदली बिरामणेवाडी शाळेत झाली सुरुवातीला दोन शिक्षकी असणारी ही शाळा नंतर मात्र चार वर्ष मी एकटीने सांभाळली . त्या शाळेचे मी सर्वस्व झाली . गावकरी ,तिथल्या महिला यांच्याशी एकरूप झाले आणि शाळेचे नाव आणखीनच सर्व स्पर्धेत उंचावलं गेलं या शाळेने ही मला सर्वस्व दिले .या शाळेत अजूनही मी ज्ञानदानाचे कार्य करत आहे .छोटीशी वाडी असूनही या शाळेतील या गावातील लोकांची निष्ठा आणि प्रामाणिकपणा आपल्या गावच्या विकासाप्रति असलेली निष्ठा अतुलनीय आहे.
आपण इतरांपेक्षा कशातही मागे राहू नये अस नेहमी वाटायचं. मोठ्या जिद्दीने दोन चाकी व चार चाकी वाहने चालवायला शिकले . अजूनही माझं शिक्षण मी सोडले नाही.पुणे विद्यापीठात Phd साठी मराठी विषयातून प्रवेश घेतला आहे.सदैव प्रेरणा देण्यासाठी माझे पती व कुटूंबिय सदैव पाठीशी आहेत .माझ्या दोन मुलांनी मला मातृत्वाचं सुख दिलं. माझं हे यश, सुख पाहण्यासाठी आई वडील मात्र नाहीत याची मनाला सतत हूरहूर राहील .अशा प्रकारे कडू गोड अनुभवातून माझे आत्तापर्यंतचे जीवन साकारत आले. अनेकांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.
प्रत्येकातून चांगलं तेच वेचलं. मला यशस्वी करण्यासाठी प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या हातांची मी शतशः ऋणी आहे ..शेवटी एवढंच वाटतं की,
आकाशात झेप घ्यायची असेल तर,
त्याची उंची कधी मोजू नये.
सागरात झेप घ्यायची तर, त्याची खोली कधी मोजू नये. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या माणसांनी ध्येय साध्य करताना वादळवाऱ्याची, संघर्षाची कधीच पर्वा करू नये......








नमस्कार
ReplyDeleteखरं तर आयुष्यात घडलेल्या सर्व गोष्टी समाजासमोर मांडायच्या नसतात, असा एक प्रघात आहे. मात्र आपण निर्धास्तपणे ज्या पद्धतीने आपली जीवन यात्रा या ठिकाणी मांडली ती प्रेरणादायी आहे. छोट्या छोट्या घटनांतून आपण घेतलेले अनुभव आणि त्याचे केलेले वर्णन अनेकांचे आयुष्य घडवू शकते .धन्यवाद!