आठवणीतील रामनवमी ! !
दक्षिण काशी वाई शहरापासून अवघ्या काही मिनीटांच्या अंतरावर वसलेलं गाव म्हणजे पसरणी .सह्याद्रीच्या पर्वतरांगांत वसलेलं , कृष्णेच्या पाण्यानं सजलेलं, घाटमाथ्यांनी नटलेलं , ऐतिहासिक वारसा असलेलं पसरणी माझं गाव .
पसरणी गावात अनेक ऐतिहासिक मंदिरे आहेत . काळभैरवनाथाचे पुरातन मंदिर असून तेच गावचे ग्रामदैवत आहे . दरसाल गावची यात्रा व दसरा हा सण मोठया उत्साहात साजरा केला जातो .पसरणी गावामध्ये महादेव मंदिर , मारूती मंदिर , अनेक छोटी मोठी मंदिरे आणि गावाच्या मधोमध दगडी बांधकामातील एक बारव आहे .
पसरणी गावामध्ये जुना श्रीरामाचा मठ आहे . या मठामध्ये पानसे कुटूंब राहायचे .पूर्वी छत्रपती शाहू महाराज हे गावातल्या पानसे ब्राम्हणांच्या विवाहाला आले होते असं म्हटलं जातं . छत्रपतींची पायधूळ पसरणी गावात झडली हेच मोठं भाग्य पसरणीकरांचं . या मठामध्ये श्रीराम , सीता , लक्ष्मण यांची विलोभनीय मूर्ती आहे . मंदिराच्या खाली मठाच्या मधोमध एक भुयार आहे . याचं कुतूहल अजूनही आम्हाला आहे . या मठामध्ये पानसे कुटूंब आनंदाने राहते . गावातील पहिला दूरदर्शन मठामध्येच आलेला असावा अस मला वाटतयं कारण आम्ही सगळेजण कार्यक्रम पाहायला मठात जायचो . मठात जे खांब होते त्या खांबाला मी नेहमी टेकून बसायचे . खांबावरून पण आमची लहानग्यांची भांडणं व्हायची . कधी कधी किती वेळ टिव्ही पाहतोय याचं भानचं राहायचं नाही मग घरी गेल्यावर सर्वांचे जोडे खायला लागायचे . लहानपणीचा तो काळचं मौजमजेचा आणि सुखाचा होता . मठातील पानसे बाईच आम्हाला बालवाडीला शिकवायला असल्यामुळे आम्हाला त्या कधीच काही बोलायच्या नाहीत . कधी कधी छान छान खायला पण दयायच्या . अजूनही ते दिवस डोळयासमोर जसेच्या तसेच तरळतात . श्रीरामाचा मठ हा पसरणी गावातील ओढ्याच्या काठावर दगडी तटबंदीमध्ये खूप पूर्वीच्या काळी बांधलेला असावा . ओढयावर कपडे धुवायला जाताना मठाच्या दारातूनच जायला लागायचे . मराठी शाळेत जायला तसा तो शॉर्टकटचा रस्ता होता पण ओढयाच्या पुलावरून उडया मारता नाही आल्या तर पाण्यातून जावं लागायचं . मठाकडे उतरताना खूपच उतार असून त्या उतारावर मोठमोठे दगड लावलेले आहेत . दगडांचांच रस्ता तो . लहानपणी ओले पाय घेऊन त्यावरून घसरायला खूप आवडायचं आणि मजा यायची. आणि मजा यायची . मठाच्या बाजूलाच पिवळ्या फुलांची बिट्ट्याची झाडे असून आम्ही सुट्टीत किंवा कपडे धुवायला गेल्यावर झाडाखाली पडलेल्या ,वाळलेल्या बिट्टया गोळा करून आम्ही मुली मुली काच कवडया खेळायचो आणि मजा करायचो . मठाजवळ पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी एक आडही आहे . कधी कधी पाणी आणायला आम्ही मठात जायचो.श्रीरामाच्या पूजेसाठी पानसे कुटुंबियांनी लावलेली अनेक फुलझाडे ही आहेत .त्या फुलांचा वापर श्रीरामाच्या पूजेसाठी नित्यनेमाने दररोज केला जातो . अनेक अविस्मरणीय आठवणी या मठाशी निगडीत आहेत .
लहानपणापासून आम्ही बघत आलोय की दरवर्षी रामनवमीचा उत्सव मोठ्या दिमाखात मठामध्ये साजरा केला जातो . मठामध्ये रामनवमीच्या दिवशी चांगलीच धामधूम असायची . मठाच्या मधोमध श्रीरामाचा पाळणा बांधला जायचा . श्रीरामाच्या जन्मोत्सवास सारा गाव गोळा व्हायचा . त्यातच आमच्या बच्चे कंपनीची नुसतीच लुडबूड चालायची.भजन ,किर्तन चालू असायचे पण आमचे कुठे लक्ष असायचे.आम्ही आपले मस्ती करण्यात दंग . बरोबर बारा वाजता *रामजन्मोत्सव* व्हायचा . गर्दी एवढी असायची की आम्ही कधी पाळण्यापर्यंत पोहचलोच नाही . पाळणा झाला की प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जायचा . मग तो खाण्यासाठी आणि घेण्यासाठी आमची एकच गर्दी व्हायची .आम्हाला तर सुंठवडा खाल्ला म्हणजे रामनवमी झाल्याचं समाधान मिळायचं . सगळा गाव घरी गेल्यावर मग आम्ही दर्शन घ्यायचो आणि सारा सोहळा निरखून पाहायचो . श्रीरामांच्या प्रतिमेची , पादुकांची मिरवणूक साऱ्या गावातून निघायची .पालखीच्या पुढे पानसे काका सोवळे नेसून हातात चिपळ्या घेऊन अखंड श्रीरामाचा जप करत जायचे . गावातल्या बायका पालखीचे स्वागत करून पानसे काकांचे पायही पूजले जायचे .पानसे कुटूंबातील सर्वजन या सोहळ्यात सहभागी व्हायचे . अजूनही रामनवमी म्हटलं की माझं मन गावातल्या श्रीरामाच्या मठामध्ये जातं आणि सुंठवडा पण खातं आणि कानावर पडतात पानसे काकांच्या मधुरवाणीतील श्रीरामाचे वर्णन करणारे भजनाचे बोल .......
रघूपति राघव राजाराम
पतित पावन सीताराम
सुंदर माधव मेघश्याम
श्रीराम जयराम जय जय राम ..!!
सौ.अंजली शशिकांत गोडसे(शिर्के)

छान लेखन.!!
ReplyDeleteछानच
ReplyDeleteबालपणीचा गाव छान रेखाटला आहे..!
ReplyDeleteअप्रतिम वर्णन व लेखन
ReplyDeleteखुपच छान मी सुद्धा लहानपणी जात असे
ReplyDeleteखूप छान लेखन👌👌👌🌹🌹🌹🙏🙏
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteमस्त
ReplyDeleteजय श्री राम
ReplyDeleteA lucid description, Jay Shri Ram!
ReplyDeleteखूपच छान, कारण वाचताना मी स्वतः ते आभासी अनुभव होते.
ReplyDelete