🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
*स्मृतीगंधातील आठवणी*
*वाघबारस* 🐅🍲
नाव वाचून थोडं चकित झाला ना पण अहो वाघबारस म्हणजे काय आपण लहान बाळाचे नाव ठेवतो तसे वाघाच्या बाळाचे नाव ठेवण्याचा कार्यक्रम वगैरे नाही बर का ! या नावामागे मोठी गंमत आहे आताच्या जमान्यात आपल्याला पार्टी करणे ,फिस्ट करणे असे शुद्ध इंग्रजीमध्ये म्हणतो .
*वाघबारस म्हणजे शुद्ध मराठीत शेतात ,डोंगरात जाऊन सर्वांनी मिळून मसाले भात ,फोडणीचा भात, तिखट भाग, पुलाव ,बिर्याणी असे वेगवेगळ्या प्रकारची प्रांतानुसार नावे घेऊन एकत्र येऊन केलेला भात.*
शहरातल्या मुलांना या वाघबारशीची काय मजा असते हे माहीतच नसेल कदाचित .पण
*गावाकडच्या मुलांचा वाघबारस म्हणजे मौजमजेचा दिवस* .
वाघबारस कशी साजरी करतात ते मग तुम्हाला वाचून नक्की समजेल.
सहसा वाघबारस रविवारीच केली जाते किंवा सुट्टीच्या दिवशी कारण सर्वांनाच सुट्टी असते आणि सुट्टीच्या आदल्या दिवशीची रात्र लहान मुलांची बैठक होऊन दुसऱ्या दिवशीच्या पार्टी चे नियोजन ठरलेलं असतं .कधी एकदा रविवार उजाडतो असं मुलांना होतं. रविवारची सकाळ झाली की या लहान मुलांची लगबग उडायची. अंघोळ उरकून ठरलेल्या ठिकाणी सर्व जमले की सामान गोळा करायला सुरुवात केली जायची. फोडणीचा भात करण्यासाठी लागणारे सामान गोळा केले जायचे. मग प्रत्येकाच्या घरोघरी जायचे. तांदूळ, चटणी, हळद, मीठ, मोहरी, जिरे ,लसूण, कांदा, बटाटे, तेल ,शेंगदाणे हे सगळं गोळा करण्यासाठी भांड्याचे प्रमाण ठरवून घेतलं जायचं . ज्या घरातील माणसं किंवा मुलं जास्त तेवढे त्यांचे प्रमाण जास्त काढले जायचे . तेलासाठी तेलातील पळीच प्रमाण ठरवले जायचं .म्हणजे कसं कोणाचं जास्त नको आणि कोणाचे कमी नको प्रमाण हो की नाही ? हे सगळं सामान गोळा झालं की पातेले कुणी घ्यायचं? उलतन कोणी घ्यायचं? हे ठरवलं जायचं .
वाघबारशीची तयारी झाली की सारा लवाजमा शेताची वाट धरायचा .सोबत डोंगरात चरायला गुरे ही घेतली जायची .गोंधळ इतका की अख्ख्या आळीत समजायचे की आज बच्चेकंपनीची वाघबारस आहे .चालत चालत गप्पा मारत डोंगर कधी यायचा हे समजायचं नाही . जाता जाता कोणाचेही शेतातल्या पावट्याच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा हंगामानुसार भातात टाकायला घ्यायच्या . सावलीसाठी मोठं झाड शोधायचं .तीन दगडांची चूल मांडायची . एकाच आकाराची दगड शोधायची . झाडाच्या सावलीत ती छान पैकी मांडायची . मग सुरू व्हायची शोधाशोध . समजलं का कशाची ती ? अहो वाळकी लाकडं चुलीसाठी गोळा करायची . चुलीजवळ ठेवायची .भाताची तयारी सुरू .चार घरचे चार प्रकारचे तांदूळ ,चटणी ,मसाला, सगळे एकत्र केलेलं बाहेर काढायचं. तांदुळ स्वच्छ करायचे . लसूण सोलायचा. कांदे शिरायचे. भाताची तयारी झाली की त्या पातेल्यात भात करणारे त्याला बाहेरुन माती लावायची .ज्याला आपण बूड घेणे म्हणतो बूड घेतल्यामुळे चुलीवरचं भांड जास्त काळे होत नाही आणि घासले की लगेच स्वच्छ होते .पुन्हा पहिल्यासारखे ! कधीकधी डोंगरातील गारगोटे तोडून ते एकमेकांवर घासून अग्नी प्रज्वलित केला जातो. चुल एकदा पेटली की पातेले चुलीवर ठेवायचं. मस्तपैकी लसून चटणी तिथलाच रानातला कढीपत्ता यांची फोडणी दिली की त्याचा वास सगळीकडे खमंग पसरायचा . त्या वासानेच भुकेने कावळे पोटात जोरात ओरडायचे . तांदूळ टाकून झऱ्याचे पाणी भाताला वापरायचे .
*खुली हवा निसर्गाच्या सानिध्यात सूर्याची किरणं थेट भातावर . चुलीचा नैसर्गिक जाळ भाताला एक वेगळी चव आणायचा म्हणजे आताच्या भाषेत सेंद्रिय चव यायची. यामध्ये कोणत्याही रासायनिक कृत्रिम वस्तूंचा वापर नाही मग ते भातात असो नाहीतर जमलेल्या मुलांच्या मैत्रीच्या नात्यात*
*वाघबारशीच ध्येयच मुळी निखळ, निरपेक्ष, निरंतर आनंद ना कोणती अपेक्षा ना कोणती अपेक्षा.*
भात छान पैकी शिजल्यानंतर सर्वांनी गोलाकार एकत्र बसायचे .आपापल्या घरून आणलेल्या ताटल्या काढायच्या . घ्यायचा भात खायला. रानात भात केल्यामुळे शेतातील देवदेवतांना निवद ( नैवेदय ) दाखवून चारही बाजूला थोडा थोडा भात शिंपडायचा . खायचा पोट भरून भात . त्या भाताला एक वेगळी चव अगदी नैसर्गिक ! जणूकाही निसर्ग देवतेने आमच्यासाठी तो भात बनवून पाठवलाय.
*घरोघरच्या तांदूळ आणि मसाले गोळा करून बनवलेल्या त्या भाताला एकोप्याची चव असायची* .
भाताचा कार्यक्रम आटोपला की सगळी भांडी गोळा करायची . झऱ्यावरच्या पाण्यावर घेऊन जायची . मातीचा आणि वाळूचा साबण आणि घासणी करून सगळी भांडी स्वच्छ करायची . थोडी मौज मजा मस्ती झाली की मन हळूहळू घराकडे यायचं .गुरांची आठवण यायची . गुरांना शोधून घराकडे हाकलायला सुरुवात करायची. सोबत काही सापडली तर वाळकी लाकडं आणि गुरांचे वाळलेले शेण ( खांडे ) गोळा करून घरच्या चुलीसाठी घेतली जायची .
अशारीतीने रविवारचा एक दिवस मजेत जायचा . वाघबारशीचा कार्यक्रम मोठ्या जोशात आणि जेवणावळीत पूर्ण व्हायचा .
आज पुन्हा बऱ्याच दिवसांनी तो अनुभव घेतला . जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. बालपणीच्या आठवणींच्या गाठोडयातील एक एक आठवण बाहेर येऊन मला लिहिते करून गेली .धन्यवाद🙏🏻
✍🏻
*सौ .अंजली शशिकांत गोडसे* ( *शिर्के* )
*मर्ढे सातारा*

खूपच छान👌💐
ReplyDeleteThanks
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteVery nice 👍
ReplyDelete